पणजी: गोव्यातील प्रमुख पीक म्हणजे काजू. आजही अनेक घरांमध्ये काजूच्या पिकावरच संपूर्ण वर्षाचा खर्च भरून काढला जातो. डिसेंबर महिन्यात असणाऱ्या गार वातावरणामुळे काजूच्या झाडांना मोहोर यायला मदत होते मात्र यंदा अजूनही पावसाळी वातावरण असल्याने काजूचे पीक काढणारे गोवेकर चिंतेत आहेत.
थंडी नसल्याने मोहोर यायला उशीर होतोय सोबतच आलेला मोहोर सुद्धा गळून पडण्याची भीती वाढली आहे. गोव्यातला पाऊस जर का असाच सुरु राहिला तर काजूच्या पिकाला नक्कीच फटका बसेल असे कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई म्हणाले आहेत.
वातावरणात थंडी असल्याने डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात झाडांना मोहोर यायला मदत मिळते आणि असे न झाल्यास मोहोर तयार होत नाही आणि काजूचे उत्पादन घटते. सध्या गोव्यातील वातावरणात गारवा नाहीच मात्र, काहीवेळा पाऊस आणि ऊन असा खेळ सुरु आहे.
या वातावरणातील बदलाचा फटका काजूच्या उत्पादनाला बसण्याची शक्यता वाढली आहे. गेल्या वर्षीच्या काजू हंगामात ६० ते ७० टक्केच काजूचे पिक तयार झाले होते.
गोव्यात दरवर्षी सरासरी २५ हजार ते २६ हजार टन काजूचे उत्पादन तयार होते. गेल्यावर्षी खराब वातावरणामुळे पीक कमी झाले होते. यंदा डिसेंबर महिना संपेपर्यंत वातावरणात अनुकूल बदल झाल्यास घाबरण्याची गरज नाही मात्र पाऊस यापुढेही सुरूच राहिल्यास काजू आणि आंबा दोन्ही पिकांना जबरदस्त फटका बसू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.