subhash shirodkar : तिलारी क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढला असला, तरी शापोरा, साळ, वाळवंटी नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेलेले नाही. त्यामुळे उत्तर गोव्याला तूर्तास पुराचा धोका नाही, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी विधानसभेत दिली. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी विचारलेल्या लक्षवेधीवर मंत्री शिरोडकर बोलत होते.
तिलारी धरणातील पाण्याचा साठा सांडवा पातळीवर पोहोचल्याने सोमवारी (ता.२४) सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. यासाठी नदीकाठच्या गावांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने दिला आहे.
राज्यातील शापोरा, साळ, वाळवंटी नद्यांचे पाणी पात्राबाहेर नाही. त्यामुळे उत्तर गोव्याला तूर्त पुराचा धोका नाही, असे शिरोडकर म्हणाले.
‘तिलारी’ 85 टक्के भरले
तिलारी धरणातून २२ जुलैपासून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यावेळी विसर्ग कमी प्रमाणात होता. मात्र, सोमवारी त्यात वाढ झाली आहे. कारण, तिलारीच्या खोऱ्यात अजूनही पावसाचा जोर कायम आहे.
सोमवारी सकाळी ८ वाजता धरणाची पातळी ४०.७० मीटर इतकी होती. इशारा पातळी ४१.६० मीटर आहे तर, धोक्याची पातळी ४३.६० मीटर आहे. म्हणजे धरण ८५ टक्के भरले आहे.
"तिलारीतून पाणी सोडले तरी उत्तर गोव्यात पुराची भीती नाही. गोव्यात भरतीची वेळ असते, तेव्हा तिलारीचे पाणी कमी सोडण्यासाठी सिंधुदुर्ग पाटबंधारे खात्याशी आमचा सातत्याचा संपर्क आहे. त्यामुळे भरतीवेळी पाण्याचे योग्य नियोजन केले जाते."
- सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.