Boat accident  Dainik Gomantak
गोवा

Boat accident : जलवाहतूक आजही असुरक्षित; ग्रामीण अर्थशास्‍त्राची शोकांतिका

Boat accident : शेतकरी देशोधडीला : श्रीमंत शहरांवर पैशांची खैरात

गोमन्तक डिजिटल टीम

Boat accident :

पणजी, चाळीस वर्षापूर्वी मडकई येथील होडी दुर्घटनेत बळी गेलेल्‍या ग्रामस्‍थांच्‍या कुटुंबीयांना ‘गोमन्‍तक’सह समविचारी व्‍यक्‍तिमत्त्‍वांनी मदतनिधी उभारून सावरलेच; सोबत ग्रामीण पातळीवर सलणाऱ्या प्रश्‍‍नांचा समग्र अभ्‍यास करून सरकारला उपाययोजना सुचविल्‍या. दुर्दैवाने, समस्‍या सुटण्‍याऐवजी अधिक उग्र बनल्‍या.

शहरीकरणाच्‍या रेट्यात आदिवासी, गरिबांचे जीवनमान खालावले. ग्रामीण अर्थशास्‍त्राची ही भयावह शोकांतिका आहे, अशा शब्‍दांत डॉ. नंदकुमार कामत यांनी वास्‍तवकथन केले.

१३ जून १९८४ला मडकई येथे घडलेल्‍या होडी दुर्घटनेतील मृतांना आदरांजली वाहण्‍यासाठी दैनिक गोमन्‍तकच्‍या पणजी कार्यालयात गुरुवारी आयोजित कार्यक्रमात डॉ. नंदकुमार कामत यांनी उपस्‍थितांना संबोधित केले. ‘गोमन्‍तक’चे संपादक-संचालक राजू नायक, मुख्‍य प्रतिनिधी अवित बगळे, ‘गोमन्‍तक-तनिष्‍क’च्‍या प्रमुख मनस्‍विनी प्रभुणे नायक व कर्मचारीवृंद या प्रसंगी उपस्‍थित होता.

डॉ. कामत यांनी सामाजिक स्‍थित्‍यंतरावर परखडपणे भाष्‍य करताना, तथाकथित विकासरूपी मुखवट्याची अक्षरशः चिरफाड केली. ‘गोमन्‍तक’ने जपलेल्‍या सामाजिक बांधीलकीविषयी आठवणींना उजाळा देत त्‍यांनी अनेक मुद्यांना स्पर्श केला.

गरजा विचारात घेऊन केली मदत

मडकई येथील होडी दुर्घटनेनंतर ‘गोमन्‍तक’चे तत्‍कालीन संपादक नारायण आठवले यांनी आपल्‍यासह समविचारी व्‍यक्‍तिमत्त्‍वांना सोबत घेऊन भरीव मदतनिधी उभारला.

धनदांडग्यांसमोर हात न पसरता रिक्षावाले, हमाल, सामान्‍य जनांकडून लाखोंचा निधी जमा झाला. तो रोख स्‍वरुपात वितरित न करता त्‍यांच्‍या गरजा विचारात घेऊन धान्‍य, कडधान्‍य, तांदुळ, चटया अशा वस्‍तुरूपात तसेच मुदतठेव स्वरूपात रकमा दिल्‍या.

‘गोमन्‍तक’ने’ त्‍यापूर्वी रायबंदर होडी दुर्घटना व तद्नंतर लातूर, किल्‍लारी भूकंपग्रस्‍तांना सामाजिक पातळीवरून मोठी मदत केली आहे, या आठवणींना कामत यांनी उजाळा दिला.

नंदकुमार कामत यांचे सामाजिक वास्‍तवावर जळजळीत भाष्‍य

१ कालौघात ७३वी, ७४वी घटनादुरुस्‍ती झाली; पण दीनांचा उद्धार झाला नाही. आज दोन समांतर समाज अस्‍तित्‍वात असून, ७० टक्‍के श्रीमंत समाजाला सरकारकडून आर्थिक पाठबळ दिले जात आहे. ३० टक्‍के ग्रामीण गरीब जनतेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.

२ पणजी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर असूनही त्‍यावर हजारो कोटींची उधळण होते; त्‍याचवेळी राजधानीपासून २० किमी अंतरावरील मडकई भागातील काही घरांना आजही झापांचे दरवाजे आहेत. हा विरोधाभास बरेच काही सांगून जातो.

३तेथील लोक भूमिहीन आहेत. शेतकरी राबत असलेली सुमारे ५ हजार हेक्‍टर जमीन पाण्‍याखाली गेली आहे. तर शिल्‍लक इंच इंच जमिनीवर बाहेरून येणाऱ्या भांडवलदारांचा डोळा आहे.

४ मद्य व्‍यवसायावर मोठी अर्थव्‍यवस्‍था उभारली; तर दुसरीकडे त्‍यामुळेच समाजाचे अधःपतन होत आहे. ‘जीएमसी’त मद्यपि रुग्‍ण वाचविण्‍यासाठी कोट्यवधींची सुविधा उभारली जाते. नेमके भले कशात आहे?, असेही कामत म्हणाले.

'ती' होडी दुर्घटना म्‍हणजे बार्जमधील डिझेलचोर माफियांनी पाडलेले खून

१ डॉ. कामत म्‍हणाले, बार्जमधील डिझेलची चोरी पूर्वीपासून होत आली आहे. २००६मध्‍ये बार्ज मालक संघटनेने ३२ कोटींची डिझेल चोरी उघडकीस आणली होती.

२ कुंभारजुवा कालव्‍यातून बार्ज चालत. ‘त्‍या’ बार्जमधील डिझेलची चोरी व्‍हायची. तशाच उद्देशाने आगंतूकपणे वाटेत उभारलेल्‍या बार्जच्‍या दोराला शेत मजुरांची वाहतूक करणाऱ्या होडीचा धक्‍का लागला आणि पुढे अनर्थ घडला. ही घटना म्‍हणजे डिझेलचोर माफियांनी पाडलेले खून आहेत.

३‘त्‍या’ बार्ज मालकाने लाल दिवा न लावता बार्ज नांगरली नसती तर रोजच्‍या मार्गावरून जाणारा होडीचालक बावचळला नसता.

४ दुर्घटनेतून वाचलेल्‍या ‘त्‍या’ होडी चालकाचे पुढे काय झाले? त्‍याचा जबाब घेतला का? याची कुठेही नोंद नाही, जे धक्‍कादायक आहे.

५ कदंब ते विजयनगर काळात अशी कधीही घटना घडलेली नाही. कुंभाजुवा कालव्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंचे काठ आज धोकादायक स्‍थितीत आहेत.

आढळली व्यसनाधीनता आणि आरोग्‍य सुविधांची आबाळ

‘गोमन्‍तक’ने मदत देण्‍यासोबत मडकई भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्‍यांचा प्रत्‍येक घराला भेट देऊन अभ्‍यास केला होता. ते वास्‍तव धक्‍कादायक होते. घरोघरी ‘टीबी’चे रुग्‍ण होते. अनेकांना तंबाखूचे व्‍यसन होते.

नोकरी न करता मुली घरीच राहात. शिक्षण, आरोग्‍य सुविधांची आबाळ होती. या संदर्भात अहवाल सरकारला सुपूर्द करण्‍यात आला होता. परंतु पुढे कृती काही झाली नाही, असेही डॉ. कामत म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT