Mahadayi Water Dispute
पणजी: म्हादईची पाहणी करण्यासाठी आपण कर्नाटकच्या सभापतींकडून परवानगी मागू शकत नाही असे गोव्याचे सभापती रमेश तवडकर यांनी स्पष्ट केल्याने, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकार पाणी प्रश्नावर वेळ वाया घालवत असल्याची टीका केली आहे.
‘‘सभापती रमेश तवडकर यांच्या वक्तव्यामुळे म्हादई प्रश्नावर वेळ वाया घालवणाऱ्या गोव्यातील अकार्यक्षम भाजप सरकारचा पर्दाफाश झाला आहे. पाणी वळवण्याच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसलेल्यांना विनंती करून भाजप सरकारने आपली अकार्यक्षमता दाखवून दिली आहे. गोव्याची जीवनवाहिनी असलेल्या म्हादई प्रश्नाची त्यांना काहीच फिकीर नाही,’’ असे आलेमाव म्हणाले.
जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी ८ जानेवारी रोजी सभागृह समितीची दुसरी बैठक घेतल्यानंतर सभापतींना कर्नाटकातील आपल्या समकक्षांना पत्र लिहून म्हादई पाहणीसाठी मंजुरी घेण्याची विनंती करू असे म्हटले होते. या विधानाची आठवण करून देताना युरी आलेमाव म्हणाले की, सध्या सभापतींनी जी भुमिका घेतली आहे ती पाहता भाजप सरकारचा पर्दाफाश झाला आहे.
‘‘सभागृह समितीकडून आपल्याला कोणतेही पत्र आले नसल्याचे तवडकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले असून म्हादई वादाच्या प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ भाजप सरकार टाईमपास करत आहे,’’ असे आलेमाव म्हणाले.
‘‘रमेश तवडकर यांच्या कृतीतून विरोधकांनी केलेले आरोप त्यांना मान्य झाले आहेत. भाजपने म्हादई कर्नाटकला विकली आहे. म्हादईच्या रक्षणासाठी भाजपचे नेते गंभीर नाहीत, त्यामुळे म्हादई वाचवण्याच्या प्रक्रियेला उशीर करण्यासाठी अनेक डावपेच अवलंबले जात आहेत,’’ असा आरोप आलेमाव यांनी केला.
‘‘म्हादईचे पाणी वळविण्याच्या कर्नाटकच्या प्रयत्नांवर पर्यावरणप्रेमी आणि गोमंतकियांनी चिंता व्यक्त केली आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे भाजप सरकारला कर्नाटकच्या कारवायांची फिकीर नाही. भाजप सरकारने त्यांना जे हवं ते करण्याची मोकळीक दिली आहे, ते ठीक नाही,’’ असे आलेमाव म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.