पणजी: भाजप व मगो यांच्यात नेतृत्वाच्या पातळीवर कोणतेही वाद नाहीत. त्यामुळे भाजप-मगो युती धोक्यात आलेली नाही, ती कायम राहील. दोन्ही पक्षांची युती तुटणार, असे मी कधीही म्हणालो नाही. हा निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मांद्रे व प्रियोळ मतदारसंघ भाजपकडे राहतील, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात सुरू सुरू झाल्याकडे लक्ष वेधल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. २०२७च्या निवडणुकीतील युतीचा निर्णयही तेच घेतील. तोपर्यंत युती आहे असाच अर्थ होतो. प्रत्येक पक्षाला आपल्या कामाचा विस्तार करण्याचा लोकशाहीत अधिकार आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला स्वबळावर लढावे असे वाटणे यात गैर काही नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मांद्रेत आज मगोचे आमदार जीत आरोलकर आहेत, तरीही भाजपकडे हा मतदारसंघ असेल असे कसे म्हणता? असे विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, २०२७च्या निवडणुकीला अद्याप बराच अवकाश आहे. भाजपचा उमेदवार त्या मतदारसंघात असेल असे मी आज ठामपणे सांगतो व त्यावर कायम आहे.
युतीत कोण कुठे लढणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. त्यावेळी त्याचा विचार होईल. प्रत्येक गोष्ट त्या-त्यावेळी घडत असते. हा निर्णयही त्यावेळी घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. पण मुख्यमंत्र्यांनी ही चर्चा सरळ नाकारली. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही आपल्यासोबत दिल्लीत नव्हते, असे त्यांनी सांगितले. केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे सांत्वन करण्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो. प्रधान यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.
त्यानंतर दुपारी १ वाजताचे विमान पकडून मी हुबळी येथे आलो. तेथील जवळच असलेल्या वरूर नवग्रह तीर्थ येथे जैन समाजाचा कार्यक्रम होता. त्याला उपस्थित राहून रस्तामार्गे गोव्याला निघालो आहे. मंत्रिमंडळ फेरबदल ज्यावेळी व्हायचा आहे, तेव्हा तो होईल. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार तो केला जाईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.