Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज, रवींनी मारली बाजी

Khari Kujbuj Political Satire: चर्चिल आलेमाव हे गोव्यातील राजकारणातील एक मुत्सदी व्यक्तिमत्व आहे.

Sameer Panditrao

रवींनी मारली बाजी

नुकतीच फोंडा भाजपची जी कार्यकारणी समिती जाहीर झाली, त्यात नव्वद टक्के सदस्य कृषिमंत्री रवी नाईक यांचे समर्थक आहेत. रवी बरोबर काँग्रेसमधून जे भाजपमध्ये आलेत, त्यांचीच अधिकांश वर्णी लागल्याचे दिसत आहे. यामुळे सध्या तरी रवींनीच बाजी मारल्याचे चित्र दिसते आहे. तशी चर्चाही फोंड्यात सुरू झाली आहे. रवींची ही चाल म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची ‘नांदी’ असेही मानले जात आहे. आता ही ‘नांदी’ का ‘भैरवी’ हे लवकरच कळेल, पण या नवनिर्वाचित समितीतून रवींचा वरचष्मा स्पष्टपणे अधोरेखित होत आहे, एवढे मात्र नक्की. ∙∙∙

चर्चिलबाबाचे बाणावली

चर्चिल आलेमाव हे गोव्यातील राजकारणातील एक मुत्सदी व्यक्तिमत्व आहे. ते आमदार, खासदार, मुख्यमंत्री सुद्धा झाले. सध्या ते ७६ वर्षांचे आहेत तरीही त्यांचा राजकारणातील मोह जात नाही. विधानसभा निवडणुका केवळ दोन वर्षांवर येऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे आपले अस्तित्व दाखविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यातीलच चर्चिल आलेमाव गणले जातात. २०२७ साली बाणावलीतून आपण निवडणूक लढविणार, अशी गर्जना त्यांनी केली आहे. त्यांचा पुतण्या वॉरन आलेमावही याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. हल्लीच झालेल्या जिल्हा पंचायत पोट निवडणुकीत त्याने आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला व आता तर ते या मतदारसंघात क्रियाशील आहेत. जर चर्चिलबाब लढतात म्हटल्यावर वॉरनबाबाचे काय होईल? हा प्रश्न बाणावलीकरांना पडणे साहजिकच आहे. ∙∙∙

सरदेसाईंची शाब्दिक कोटी

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई अधिवेशनात मंत्र्यांना, सत्ताधारी आमदारांना शाब्दिक कोटी करीत आपला संदेश द्यायचा तो देतात. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांची कॉलर ताठ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भूमिका चांगली पार पाडताय, असे सांगत टोला लगावला. त्यानंतर त्यांनी सरकारकडून बिहारी दिवस साजरा करण्याच्या कार्यक्रमावरही नेकमेपणाने बोट ठेवलेच. प्रमोद मुतालीक यांच्या गोवा प्रवेशावर त्यांनी पर्रीकर यांनी घातलेल्या बंदीची आठवण करून दिली. त्याचबरोबर महाराष्ट्रात ‘छावा’ चित्रपटामुळे औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी वाढली आणि नागपूरमध्ये हिंसाचार घडल्याचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस सांगतात, मग हिंसाचार भडकवण्यासाठी कारणीभूत ठरलेला ‘छावा’ गोव्यात दाखविला जात आहे, अशी कोटी करीत सरदेसाईंनी सरकारच्या कामकाजाची चिरफाड केली. ∙∙∙

गिरीश यांची पकड

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समितीचे कायम निमंत्रित म्हणून गिरीश चोडणकर यांची नियुक्ती झाली आहे. पुद्दुचेरी आणि तमिळनाडूचे ते प्रभारी आहेत. तरीही राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद सोडलेला नाही. ते पणजीत आले की, त्यांना मुद्दामहून भेटण्यासाठी येणाऱ्यांची काही कमी नसते. सोमवारी ते पणजीत एका खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे महत्वाचे स्थानिक पदाधिकारी होते. यावरून आजही पक्षावर त्यांची असलेली पकड दिसून आली. राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळूनही त्यांनी स्थानिक पातळीवरील संपर्क जपला आहे, हे विशेष. त्याचीच तर धास्ती काही जणांना वाटू लागली आहे. ∙∙∙

आलेक्सने दरबार का रद्द केला?

सद्या राज्य मंत्रिमंडळातील बदलाचे वारे वाहू लागले आहे. सभापती धरून सर्वच जण लवकरच मंत्रिमंडळात बदल होतील, असे सांगतात. प्रदेशाध्यक्ष बदल होणार, असे स्पष्ट सांगत नाहीत किंवा नाकारतही नाहीत. ते मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवतात. मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल व कोणाला डच्चू मिळेल या बद्दलच्या रसभरीत गोष्टी कानावर येत आहेत. ज्यांना डच्चू मिळेल त्यात आलेक्सबाबचा समावेश आहे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. एरव्ही दर शुक्रवारी मडगावात जिल्हाधिकारी इमारतीत लोकांसाठी दरबार भरवणाऱ्या आलेक्स बाबांनी शुक्रवारचा दरबार अकस्मात रद्द केल्याने लोकांत तो एक चर्चेचा विषय ठरला. या पूर्वी मंत्रीमंडळातून डच्चू मिळेल, अशी चर्चा रंगली होती. नंतर ते मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या त्या त्यांनी यशस्वी करूनही दाखवल्या. पण आता परत एकदा त्यांचे नाव घेतले जाते. त्यांना मंत्रिमंडळातून खरोखरच डच्चू तर मिळणार नाही, अशी चर्चा सध्या रंगली आहे. ∙∙∙

दामू यांचे नियोजन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दोनच महिन्यात संघटनेवर चांगली छाप पाडली आहे. सध्या मंडळ पातळीवरील समित्या निवडून जाहिर केल्या जात आहेत. त्यावेळी कोण कुठे उपस्थित राहील याची तजवीज दामू यांनी केली आहे. प्रत्येकाला अशा महत्वाच्या वेळी सहभागी होण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. आपणाला सर्वांना सोबत घेऊनच पुढे जायचे आहे असा संदेश त्यांनी दिला आहे. दामू यांनी राज्यभरातील नियोजन एकहाती करत प्रदेशाध्यक्षपदी आपली निवड सार्थ असल्याचेही दाखवून दिले आहे. ∙∙∙

पर्राच्या कलिंगडाची भेट

मायकल लोबो यांची पर्रा येथे कलिंगडाची शेती केली आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर अनेकदा कलिंगडाची कथा सांगायचे. चांगल्या कलिंगडाच्या वाणाची जोपासना करण्यासाठी गावातील मुलांना कलिंगड कसे मोफत खायला दिले जात असे आपला समावेश त्या मुलांत कसा असे अशी ती कथा होती. आता त्यांच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी लोबो कलिंगड लागवडीकडे वळले आहे. लोबो यांच्या पत्नी आमदार दिलायला लोबो यांनी सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कलिंगड भेट म्हणून दिले आणि लोबो कलिंगडाचे शेतकरी झाल्यावर जणू शिक्कमोर्तब केले. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT