BITS Pilani Campus Goa Dainik Gomantak
गोवा

BITS Pilani: प्रेयसीने उचलले टोकाचे पाऊल, हैद्राबादहून गोव्यात आला; ‘बिटस पिलानी’तील विद्यार्थ्याच्या मृत्युचे गूढ कायम

BITS Pilani Student Death: बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये मृतावस्थेत आढळलेला कुशाग्र जैन (२०) याच्या मृत्युसंबंधीच्या चर्चला विराम मिळण्यापूर्वी ऋषी नायर याच्या मृत्युमुळे संपूर्ण कॅम्पस हादरले आहे.

Sameer Panditrao

वास्को: वैयक्तिक कारणांमुळे तणावाखाली असलेला आणि हैदराबाद बिट्स पिलानी कॅम्पसमधून गोवा कॅम्पसमध्ये आलेला ऋषी नायर हा २० वर्षीय विद्यार्थी त्याच्या खोलीमध्ये मृतावस्थेत सापडल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये १६ ऑगस्ट रोजी मृतावस्थेत आढळलेला कुशाग्र जैन (२०) याच्या मृत्युसंबंधीच्या चर्चला विराम मिळण्यापूर्वी ऋषी नायर याच्या मृत्युमुळे संपूर्ण कॅम्पस हादरले आहे.

गेल्या नऊ महिन्यांत बिट्स पिलानी गोवा कॅम्पसमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शिक्षक, पालक आणि नागरिकही धास्तावले आहेत.

ऋषी नायर याच्या मृत्यूप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. यापूर्वी चार विद्यार्थ्यांच्या मृत्युसंबंधीही अनैसर्गिक मृत्युची नोंद केली होती. यापैकी कोणत्याच विद्यार्थ्याने मृत्युप्रकरणी चिठ्ठी लिहून ठेवली नसल्याने त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण उघड झालेले नाही. तथापि, कुशाग्र जैन वगळता इतरांनी विविध तणावामुळे जीवन संपविल्याची चर्चा सुरू आहे.

याप्रकरणी वेर्णा पोलिसांना कळविल्यावर पोलिस निरीक्षक आनंद शिरोडकर घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविला आहे.

कुशाग्रच्या मृत्यूचेही गूढ कायम

१६ ऑगस्टला मृतावस्थेत सापडलेल्या कुशाग्र जैन याचा मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यापूर्वी ओम प्रियान सिंग याने डिसेंबर २०२४ मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर मार्च २०२५ मध्ये अथर्व देसाई याच्या आत्महत्येमुळे कॅम्पस हादरला होता. दोन महिन्यांनंतर म्हणजे मे २०२५ मध्ये कृष्णा कासेरा याने आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबाने काही आरोप केले होते. ऑगस्ट २०२५ मध्ये कुशाग्र जैन हा कॅम्पसमधील हॉस्टेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळला होता.

राज्यपालांनी घेतली होती दखल

बिटस पिलानी कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची तत्कालीन राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी दखल घेताना संपूर्ण अहवाल मागितला होता. विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी बिट्स पिलानी व्यवस्थापन मंडळाने निरनिराळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. निरनिराळ्या सूचनांचा त्यांनी स्वीकार करून त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे.

व्यवस्थापनाकडून विविध उपाययोजना

विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी बिटस पिलानी व्यवस्थापनाने निरनिराळे उपाय योजले आहेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या संख्येने लावले आहेत. विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात येते. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाते. एकंदर विद्यार्थ्यांनी वाईट पाऊल उचलू नये, यासाठी पुरती खबरदारी घेण्यात येत आहे.

ऋषीने केल्या उलट्या

ऋषीचा मृतदेह ज्या ठिकाणी होता, तेथे त्याने उलट्या केल्याचे पोलिसांना आढळल्या. ऋषीने सकाळपासून आपल्या खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. यावेळी ऋषी खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. बिट्स पिलानी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित वेर्णा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्यांना ऋषी बेशुद्ध अवस्थेत असल्याचे आढळले. तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी

बिटस पिलानीसह विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणांची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. पत्रकारांनी बिटसच्या संकुलात ९ महिन्यांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या ५ घटना घडल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, या प्रकरणात दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी चौकशी करून अहवाल सादर करतील. यापूर्वीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर तेथील संकुल चालकांना बोलावून घेतले होते आणि त्यांच्याशी चर्चा केली होती.

अभ्यासाचा तणाव नाहीच! ‘बिट्स पिलानी’चे स्‍पष्‍टीकरण

१. बिट्स पिलानीत अभ्यासाचे वेळापत्रक महाविद्यालय ठरवत नसून, विद्यार्थी ठरवतात. त्‍यामुळे अभ्‍यासाच्‍या तणावातून विद्यार्थी आत्‍महत्‍या करतात, असे म्‍हणता येणार नाही. याशिवाय महाविद्यालयात रॅगिंगसारखेही प्रकार घडत नाहीत. तरीही विद्यार्थी आत्‍महत्‍या का करीत आहेत, त्‍यांचे संशयास्‍पद मृत्‍यू का होत आहेत, याची कारणे शोधण्‍यासाठी समिती स्‍थापन केली आहे. ही समिती लवकरच अहवाल सादर करेल. त्‍यानंतर पुढील उपाययोजना केल्‍या जातील.

२.बिट्स पिलानीच्‍या कॅम्‍पसमध्‍ये गुरुवारी झालेल्‍या ऋषी नायर मृत्यू प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. काही दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थ्याचा संशयास्‍पद स्‍थितीत मृतदेह झाला होता.

९ महिन्यात मृत पावलेले पाच विद्यार्थी असे...

१ ओम प्रियान सिंग

- डिसेंबर २०२४

२ अथर्व देसाई

- मार्च २०२५

३ कृष्णा कासेरा

- मे २०२५

४ कुशाग्र जैन

- ऑगस्ट २०२५

५ ऋषी नायर

- ४ सप्टेंबर २०२५

पुरेपूर खबरदारी घेतली; पण...

ऋषीचे वडील हे आयटी क्षेत्रातील अधिकारी आहेत, तर आईही सरकारी खात्यामध्ये उच्च पदावर आहे. आपल्या मुलासाठी ते त्याच्यासमवेत गोव्यात आले होते. त्याने जीवाचे काही बरे-वाईट करू नये, यासाठी त्यांनी पुरेपूर खबरदारी घेतली होती; परंतु दुर्दैवाने ते त्याला वाचवू शकले नाहीत.

हैदराबाद ते गोवा घटनाक्रम असा...

मूळ बंगळूर येथील ऋषी नायर हा गेल्याच महिन्यात गोवा कॅम्पसमध्ये आला होता.

तो हैदराबाद येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये फर्स्ट इयरला होता.

तेथे त्याचे एका युवतीशी प्रेमसंबंध होते.

त्या युवतीने काही कारणास्तव जून महिन्यामध्ये आत्महत्या केली होती.

त्याचा ऋषीवर मोठा परिणाम होऊन तो तणावाखाली होता.

या तणावातून बाहेर काढण्यासाठी त्याच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार सुरू होते.

तेथे राहिल्यास तणाव आणखी वाढण्याची भीती असल्याने मानसोपचारतज्ज्ञांनी त्याच्या पालकांना त्याची दुसरीकडे शिक्षणाची सोय करण्याची सूचना केली होती.

त्यानुसार त्यांनी हैदराबाद बिट्स पिलानी कॅम्पसमधून गोवा कॅम्पसमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, येथेही तो तणावाखाली होता.

त्याला तणावातून बाहेर काढण्यासाठी आणि त्याच्याशी संवाद साधण्यासाठी

आई-वडिलांनी विद्यानगर-झुआरीनगर येथे एक फ्लॅट भाड्याने घेतला होता.

त्याचे पालक दररोज सायंकाळी येऊन त्याच्याशी बोलत होते. दररोज त्याला त्या दिवसाचे औषध देऊन ते फ्लॅटवर परतत असत.

बुधवारीही नेहमीप्रमाणे त्याला पालक भेटले होते. त्यावेळीही तो तणावाखालीच होता.

त्यानंतर तो हॉस्टेलवरील खोलीवर परतला. मात्र, गुरुवारी (ता. ४) तो आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT