Revolutionary Goans Party Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: प्रस्‍थापित राजकीय नेत्यांच्या हृदयात भरली मोठी धडकी!

‘आरजी’च्‍या पारड्यात 10 टक्के मते: मगो आणि ‘आप’च्‍या पुढे मुसंडी

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

फोंडा: रिव्होल्युशनरी गोवन्स म्हणजे ‘आरजी’ या पक्षाने राज्‍यात धडाकेबाज सुरुवात केली आहे. मनोज परब निमंत्रक असलेल्या या पक्षाचा एक आमदार सध्या विधानसभेत पोचला असून इतर मतदारसंघांतही लक्षणीय मते घेतली आहेत. वाळपई, थिवी, बाणावली, कळंगुट, कुडचडे, कुडतरी, नावेली, प्रियोळ, मडकई, वेळ्ळी, शिवोली, सांताक्रुझ, कुठ्ठाळी या मतदारसंघांत ‘आरजी’च्या उमदेवारांनी दोन हजारांहून अधिक मते घेतल्यामुळे भल्या भल्या प्रस्‍थापित राजकीय नेत्यांच्या हृदयात धडकी भरली आहे.

फोंड्यातील प्रियोळ, मडकई व शिरोडा या मतदारसंघांत आरजीने भरघोस मते घेतली. शिरोड्यात तर पाच हजाराचा उंबरठा पार केला. कमाल म्हणजे विश्वजीत राणेंच्या बालकिल्ल्यात म्हणजे वाळपईत या पक्षाने 6600 मते प्राप्‍त केली असून, ती काँग्रेसपेक्षा जास्त आहेत. विशेष म्हणजे मतांच्या टक्केवारीत आरजीने, मगोप वा ‘आप’सारख्या पक्षांनाही मागे टाकले आहे. या पक्षाने जवळजवळ 10 टक्के मते घेतली असून मगो 7 टक्के व आप 6 टक्‍क्‍यांच्‍या सीमारेषेवरच घुटमळताना दिसला. याचा अर्थ ‘आरजी’ भविष्याची नांदी ठरू शकतो.

सांत-आंद्रेत ‘आरजी’च्या विरेश बोरकर यांनी भाजपचे धुरंधर आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा 72 मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश केला आहे. सिल्वेरा हे या मतदारसंघातून चारवेळा जिंकून आलेले आमदार. पण त्यांची डाळ ‘आरजी’समोर शिजू शकली नाही. खरेतर आरजीचा कोठेही बोलबाला नव्हता.

काही मतदारसंघांत तर ते अभावानेच दिसत होते. मात्र या निवडणुकीवेळी आढावा घेताना आरजीची सुप्त ताकद दिसून येत होती. काही दुकानांवर आरजीच्या उमदेवारीची चर्चा सुरु असलेली बघायला मिळत होती. ‘गोमन्‍तक’ने मतदानाच्या पूर्वी आयोजित केलेल्या युवा वर्गाच्या चर्चेतही आरजीचा उल्लेख झाला होता. त्यामुळे युवा वर्ग या पक्षाच्‍या मागे असल्याचे प्रतीत होत होते आणि याचा प्रत्यय या निवडणूकीत आला. या वर्गानेच सोशल मीडियावरून म्हणा किंवा माऊथ पब्लिसिटीने म्हणा प्रचार करून आरजीला लोकांपर्यंत पोहोचवले.

या निवडणुकीत काही उमदेवारांनी खर्चापोटी १० कोटीचा उंबरठा ओलांडला असल्याचे सांगितले जातेय. आरजीच्या उमेदवाराचा खर्च मात्र काही लाखांचा असल्याचे समजते. मनोज परब यांनी वाळपई व थिवी या दोन मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती आणि त्यांना फक्त दीड लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते. हे पाहिल्यास आपण परत एकदा मगोच्या जुन्या जमान्यात जात तर नाही ना असे वाटायला लागले आहे. आता ‘आरजी’ला काहीजण भाजपची ‘बी टीम’ असे संबोधतात. आरजीमुळेच भाजप परत सत्तेवर येऊ शकला असाही आरोप केला जातो. मतदानाचे आकडे पाहिल्यास हे आरोप खरेही वाटतात. पण प्रत्येक पक्षाला निवडणूक लढविण्याचा अधिकार असतो हेही तेवढेच खरे आहे.

काँग्रेसने ‘आरजी’ला ‘नजर-अंदाज’ केले हे विसरता कामा नये. आरजीच्या उमेदवारांना ५०० हून जास्त मते मिळणार नाहीत असे बऱ्याच काँग्रेस नेत्यांना वाटत होते. इतर पक्षांचीही तशीच विचारधारणा होती. पण ती साफ चुकीची ठरली आहे. मगोपचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर यांनी तर आरजीमुळेच मगोची पिछेहाट झाली असे म्हटले आहे. पण हा आरोप तथ्यहीन वाटतो. याचे कारण म्हणजे आज मतांच्या दृष्टीने आरजी हा मगोपेक्षा बळकट पक्ष ठरला आहे. त्यामुळे भविष्यात आरजी हाच एक मोठा पर्यायठरू शकेल. परवा फोंड्यातील एक भाजप नेता हेच सांगत होता. आपण भाजपचा कट्टर समर्थक असलो तरी आपला मुलगा आरजीचा समर्थक आहे. यातूनच भविष्याची दिशा स्पष्ट होते.

‘आरजी’ ठरू शकतो मगोला सक्षम पर्याय

मगोसारखा पक्ष आता कालबाह्य झाला असून त्यांनी आपले दुकान बंद करणे योग्य ठरेल असे परवा मला एक आरजी समर्थक युवक म्हणाला. आणि विचार केल्यास त्यांचे म्हणणे पटू लागते. ‘गोवा फॉर गोवन्स’ हा आरजीचा मूलमंत्र अनेकांना खास करून कॅथलिक वर्गाला लुभावतो आहे यात शंकाच नाही. म्हणूनच तर विदेशात राहणारे आरजीचे गोमंतकीय ‘पाठीराखे’ म्हणून गणले जातात. आरजीच्या निवडणुकीचा आर्थिक भार भाजपने उचलला अशी वंदता असली तरी ते खरे नाही. त्यांचा जो काही खर्च आला आहे तो या विदेशात राहणाऱ्या गोमंतकीयांनीच उचलला आहे हे असे मला काही आरजीच्या नेत्यांनी सांगितले.

हे खरे असेल की खोटे असेल या वादात न जाता आपण एवढेच म्हणू शकतो की आरजीही गोव्याची भविष्याची नांदी ठरू शकते. मगो या पक्षाची तत्वे आता मोडीत निघायला लागली असल्यामुळे आरजी हा एक बळकट स्थानिक पक्ष ठरू शकतो. 2027 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची मुख्य लढत आरजीशी झाली तर आश्चर्य वाटायला नको. याचा ‘ट्रेलर’ त्यांनी या निवडणुकीत दाखवला आहेच. आता खरेच हा ‘ट्रेलर’ सिनेमात बदलतो की काय याचे उत्तर येत्या काळात मिळणार हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT