Bhutani Infra Project Sancoale Premanand Naik Fast
वास्को: ‘भूतानी’ प्रकल्पाविरोधात सांकवाळ पंचायतीसमोर आमरण उपोषणाला बसलेले माजी सरपंच तथा ज्येष्ठ नागरिक प्रेमानंद पुरुषोत्तम नाईक यांच्या प्रकृतीबाबत राज्य सरकार गंभीर नाही. त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला तर संपूर्ण राज्य पेटून उठेल, असा इशारा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य तथा गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला.
नाईक हे गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. मात्र अजूनही दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या प्रमुखांना माहिती दिली नसल्याने चोडणकर यांनी आश्चर्य व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही, असे ते म्हणाले.
प्रेमानंद नाईक उपोषणाला बसल्याची माहिती स्थानिक सरकारी यंत्रणेने अजूनही दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाला न दिल्याने चोडणकर यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु स्थानिक सरकारी यंत्रणेने हा विषय गांभीर्याने घेतलाच नाही. सरकार प्रेमानंद नाईक यांना न्याय देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.
सावळफोंड-सांकवाळ गावात येणाऱ्या भूतानी इन्फ्रा प्रकल्पाविरोधात प्रेमानंद नाईक यांच्या उपोषणाचा आज मंगळवारी नववा दिवस. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. भूतानी प्रकल्प भविष्यात सांकवाळबरोबरच संपूर्ण मुरगाव तालुक्याला धोक्याचा ठरणार आहे. त्यामुळे सरकारने या प्रकल्पाला दिलेले सर्व परवाने रद्द करणे आवश्यक आहे असे सांगून सांकवाळ पंचायतीच्या सत्ताधारी पंचसदस्यांनी ग्रामस्थांवर अन्याय केल्याचा आरोप चोडणकर यांनी केला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.