पर्ये सत्तरी: पर्ये येथील श्री भूमिका देवस्थानचा राखणदार म्हणून परिचित असलेल्या साखळेश्वर देवस्थानात माजिक बांधवांनी एकतर्फी पूजा केल्याने वाद उद्भवला होता. स्थानिकांनी साखळी-पर्ये मुख्य रस्ता रात्रभर बंद ठेवल्याने कामगार वर्गाची तसेच चोर्ला घाट मार्गावर वाहतूक करणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. यावर तात्पुरता उपाय म्हणून वाहतूक मोर्ले - होंडातून वळवण्यात आली होती पण वाहतूकीसाठी रस्ता खुला करण्याचा पोलिसांनी मुळीच प्रयत्न केला नाही.
साखळेश्वर देवस्थानात उठलेल्या वादावरून चौघांवर गुन्हे दाखल करण्यासोबत देवस्थान २४ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाने दिला, त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने रात्री पर्ये-साखळी मार्गावर टायर्स जाळून वाहतूक अडवली होती, तसेच पोलिसांवर दगडफेक केली होती. यात पोलिस उपनिरीक्षक सोहन मळीक गंभीर जखमी झाले आणि त्यांना तत्काळ उपचारांसाठी जीएमसीत दाखल करण्यात आले.
गावकर घोलकर व राणे बांधवांनी शुक्रवारी (२० डिसेंबर) दुपारी वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून परस्पर पहाटे पूजा करणाऱ्या चौघांच्या अटकेची मागणी केली. उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशान्वये वाळपई पोलिसांनी चौघांवर गुन्हे दाखल केले मात्र त्यानंतर रात्री वातावरण तंग झाले.
देवस्थानचे गावकर (घोलकर) राणे, माजिक, च्यारी, म्हाळशेकर, रवळो सावंत, लिंगाचा गुरव, पोडोशे गावकर, माऊलीचे गुरव, रवळनाथाचे गुरव, वाठेदेव सावंत, पांझणकार असे बारा कुटुंबातील मंडळी लोकं आहेत. तरीही शुक्रवारी (दि. २० डिसेंबर) पहाटे माजिक बांधवांकडून पूजा करण्यात आली. यावरून गावकर घोलकर, व राणे बांधवांनी संतप्त होऊन दुपारी वाळपई उपजिल्हाधिकारी कार्यालय गाठले, यावेळी दोन्ही बांधवांनी माजिक समाजाच्या पूजा केलेल्या चौघांना अटक करावी, अशी जोरदार मागणी केली. यावरून सहदेव वासू माजिक अरुणवाडा पर्ये, शंबा अर्जुन माजिक, माजिकवाडा पर्ये, पांडुरंग तुकाराम माजिक, माजिकवाडा पर्ये, अजय म्हसकर, पर्ये या संशयितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी वाळपई पोलिसांना दिले.
त्यानंतर सायंकाळी वरील चार संशयितांवर वाळपई पोलिसांनी यूएसईसी २२३(ए) आणि (बी) ३(५) अंतर्गत गुन्हे दाखल केले. यावेळी मोठा पोलिस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. सायंकाळी उपजिल्हाधिकारी पल्लवी मिश्रा यांनी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून योग्य त्या कारवाईचे आश्वासन दिले. पुढे होणारा भूमिका मंदिराचा सप्तक उत्सव होणार नसल्याचा आदेश जारी केला. त्यामुळे २४ डिसेंबरपर्यंत श्री भूमिका मंदिर बंद राहणार आहे.
"उपजिल्हाधिकाऱ्यांनी पूजेविषयी निर्णय देण्याआधीच माजिक बांधवांनी चोरवाटेने पहाटे अन्य बांधवांना विश्वासात न घेताच पूजा अर्चा केली. त्यामुळे माजिक बांधवांनी चूक केली आहे. शुक्रवारी श्री भूमिका देवीचा सप्तक सुरू होणार होता. पण आता माजिक बांधवांमुळे वाद निर्माण होऊन पुढील दोन दिवस चालणारे भूमिका देवीचे उत्सवही उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे होणार नाहीत. गत वर्षही माजिक बांधवांनी अशीच पहाटे पूजा केली होती. पण आम्ही वाद नको, म्हणून गप्प बसलो होतो. व माजिकांनी गत वर्षी पुन्हा असे होणार नाही, असे आश्वासन दिले होते. पण यावर्षीही त्यांनी आम्हाला फसवून एकट्याच बांधवाने पूजा करून वाद सुरू केला", असा दावा गावकर कुटुंबीयांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.