पणजी: भोम येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचा विषय आता बगलमार्गावर घसरला आहे. उड्डाणपुलाऐवजी बगलमार्ग हवा अशी मागणी भोमवासीयांनी पुढे आणली असून बगलमार्ग बांधणे शक्य नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
भोममधील ७० जणांनी आज मंत्रालयात येऊन सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेले सादरीकरण पाहिले. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचा सविस्तर आराखडा गावकऱ्यांना दाखवला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची शनिवारी साखळी येथे भेट घेतल्यानंतर त्यांनी या सादरीकरणाचे आयोजन केले होते.
केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ७ एप्रिल रोजी जाहीर केले की, भोम ते जुने गोवे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७४८ वरील ७ कि. मी. लांबीच्या चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने १ हजार ६०.२१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानंतर या विषयाला तोंड फुटले आहे.सादरीकरणानंतर झालेल्या चर्चेवेळी ४० घरे पाडली जाणार नाहीत असे लेखी आश्वासन देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली. मात्र, ते आश्वासन तेथल्या तेथे भोमवासीयांनी स्वीकारले नाही.
सादरीकरणावेळी चार बांधकामे हटवावी लागतील. सरकारी जमिनीवर उभारण्यात आलेले रस्त्यालगतचे गाडे मंदिर परिसरात हलवावे लागतील. बांधकामे हटविण्यात येणाऱ्यांना पुनर्बांधणीचा खर्च व भूखंड देण्याची तयारीही सरकारकडून दाखवण्यात आली. मात्र, भोमवासीय बगलमार्ग बांधून गाडे व चार बांधकामे वाचवा या म्हणण्यावर ठाम राहिले. त्यानंतर उद्या भोम येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जातील व उड्डाणपूल कुठे बांधला जाणार ते दाखवतील, असे सांगण्यात आले.
ही चर्चा पुढे नेण्यासाठी पूर्वीच्या नियोजनानुसार उड्डाणपूल हा ६० मीटर नव्हे, तर २५ मीटरच रुंद असेल असेही सांगण्याचा प्रयत्न सरकारकडून या सादरीकरणावेळी केला. केंद्र सरकारने राज्य सरकारला या उड्डाणपुलाबाबत काय कळवले आहे त्याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी अशी मागणी भोमवासीयांनी केली. उद्याच्या पाहणीनंतर काय ते सांगू असे सांगून भोमवासीयांनी हा विषय पुढे ढकलला आहे.
बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही केवळ २५ मीटर रुंदीचा रस्ता बांधत आहोत, ६० मीटरचा नाही. पर्यायी मार्ग जैवसंवेदनशील आणि खाजन जमिनीवरून जात असल्यामुळे तो बांधणे व्यवहार्य नाही. भोममधील ४० घरे या प्रकल्पामुळे पाडली जाणार नाहीत, याची लेखी हमी सरकार देण्यास तयार आहे, असे त्यांनी जाहीर केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.