काणकोण: काणकोणात स्पप्नपूर्ती कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांना भवानी तलवार देण्यात आली. तलवार पाहताच उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. खरंच डॉक्टरांना तलवारीची गरज आहे काय, असेही काहीजण बोलून गेले म्हणे. मुख्यमंत्र्यांनी मात्र हा आपल्या आयुष्यातील मोठा सन्मान असल्याचे म्हटले. भवानीची तलवार ही तुम्हा सगळ्यांसाठी काम करताना मोठी ऊर्जा देईल, काणकोणवासीय अनेक योजनांपासून दूर राहिले आहेत. आता रमेश तवडकरांच्या प्रतिनिधित्वात हा तालुका कुठेही कमी पडणार नाही, असेही डॉक्टर यावेळी म्हणाले. डॉक्टरांच्या बोलण्यातून कमालीचा आत्मविश्वास झळकत होता. आता ही कमाल या तलवारीची आहे का, हे मात्र ठाउक नाही.
तणावाचा वणवा न पेटो
शांत गोव्यात दोन धर्मियांत तेढ निर्माण होण्याइतपत तणाव निर्माण होऊ लागला आहे. या प्रकरणावरून निपचित पडलेले राजकारणी अचानक खडबडून जागे झाल्याचे चित्र पाहायला मिळू लागले आहे. या प्रकरणाचा शेवट काय होणार ते देव जाणे, पण निवडणुकीनंतर काम नसलेल्यांना आपला चेहरा लोकांपुढे उजळ करायला वेलिंगकर सरांनी एक प्रकारे संधीच दिली आहे. गोव्यातील अडचणी असो वा सामाजिक संकटे हे राजकारणी लोक कधीच एकत्र येत नाहीत. मात्र, घोंघावत जाणाऱ्या वादळाप्रमाणे नव्याने पेटणारा विषय गोवा भर पोहचला. सरकार याविषयी काय भूमिका घेणार यावर सरकारचा कस लागणार आहे. जर तणाव वाढत गेला, तर बेकार झालेले राजकीय पुढारी पेटणाऱ्या वणव्यात आपली पोळी भाजून घेण्याची संधी सोडणार नाहीत. त्यातून दोन धर्मियांत दरी निर्माण झाल्यास भाषिक वादाचे पर्यावसन न होवो हेच योग्य वाटते. ∙∙∙
उपप्रबंधक पळाले?
नागरी प्रबंधक खात्याच्या संचालकांकडे काणकोण कार्यालयातील गैरप्रकारांबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर म्हणे संचालक आशुतोष आपटे यांनी स्वतः त्याची पडताळणी करण्याचे ठरवले व अधिकाऱ्यांना त्याची कोणतीच कल्पना न देता त्यांना सोबत देऊन ते काणकोणकडे रवाना झाले.
तेथील शासकीय संकुलात हे पथक दाखल झाले, तेव्हा दुपारचा प्रहर उलटला. त्या पथकाने उपप्रबंधक कार्यालयात प्रवेश केला तेव्हा उपप्रबंधक कार्यालयात नव्हते तसेच त्यांनी अनुपस्थितीची नोंद ठेवली नव्हती. त्याबाबत ठपका ठेवून त्यांची पणजी कार्यालयात बदली केली गेली. पण मुद्दा तो नाही, उपप्रबंधकांना कुठूनतरी या छाप्याची कुणकुण लागली व हे पथक दाखल होताच त्यांनी पोबारा केला. मात्र, त्यामागील कारण जरी स्पष्ट झाले नसले, तरी चावडीवर ते चवीने चघळले जात होते.∙∙∙
कदंब बसस्थानकाचे राजकारण?
‘करतो कोण आणि भरतो कोण’ अशी मराठीत एक म्हण आहे. राजकारणी मंडळी एकमेकांवर कुरघोडी करण्यात तरबेज. कुंकळळ्ळी कदंब बसस्थानकाची दुरुस्ती करण्यासंदर्भात आमदार युरी आलेमाव यांनी पुढाकार घेऊन कदंब बसस्थानकाची पाहणी केली होती. बसस्थानकाची दुरुस्ती करण्यासाठी आलेमाव यांनी पुढाकारही घेतला होता. बसस्थानक दुरुस्तीचे भिजत पडलेले घोंगडे आलेमाव यांनी दूर केले होते. आता या दुरुस्तीचे श्रेय आलेमाव यांना जाणार म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी कदंब महामंडळाची पाहणी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांना आमंत्रित केले आहे. आता पाहुया युरी कदंब बसस्थानकाचा विषय जाग्यावर घालतात की उल्हास कदब बसस्थानक चकाचक करतात ते.∙∙∙
गोवा डेअरीचे फिके आइस्क्रीम
गोवा डेअरीच्या माजी सरकार नियुक्त चेअरमनांनी आपल्या कारकिर्दीत झालेल्या आर्थिक कारभाराचे ऑडिट करून घेतले खरे, परंतु त्यातसुध्दा हातचलाखी केली आहे असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. गोवा डेअरीने मोठा गाजावाजा करून आइस्क्रीम प्रकल्प सुरू केला होता, पण 2020-21 या आर्थिक वर्षात आइस्क्रीम विक्रीवर डेअरीला फक्त साडेनऊ हजार उत्पन्न आले असून या प्रकल्पातील कर्मचाऱ्यांवर खर्च 38 लाख दाखवलेला आहे. ही किमया आकड्यांची फेरफार करण्यात माहीर असलेल्या यशवंतरावांकडून करून घेतली आहे असे वाटते.
ही सर्व किमया दुर्गेश शिरोडकर हे डेअरीचे अध्यक्ष असताना झाली आहे. कदाचित त्यांना वाटले असेल की शेतकऱ्यांना काहीही कळणार नाही, परंतु शेतकरी काय चीज आहे हे यशवंतरावांना वार्षिक सर्वसाधारण सभे दिवशी समजले असेलच. परंतु काहीही म्हणा दुर्गेशरावांच्या आइस्क्रीमची चव शेतकऱ्यांकडून कडू करण्यात आली हे खरे. ऑडिटच्या आर्थिक वर्षांत आइस्क्रीम फॅक्टरी बंद असूनसुद्धा लाखो रुपयांचा दैनंदिन कर्मचाऱ्यांवर झालेला खर्च कुणाकडून वसूल करून घेणार असे शेतकऱ्यांकडून विचारले जाते. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असले असते, तर सहकार खात्याने लगेच बडगा उचलला असता. आता सहकार खाते त्यावर काही करणार की गप्प बसणार? हे पाहावे लागेल.
खनिजानंतर रेती तस्करी
गोव्यातील खनिज घोटाळ्याचा मुद्दा अजून तडीस गेलेला नाही की बंद झालेल्या खाणी पूर्ववत सुरू झालेल्या नाहीत व आता रेती उत्खनन व्यवसायही त्याच दिशेने तर मार्गक्रमण करत नाही ना असे वाटू लागले आहे. त्यामागील कारण आहे रेती काढणाऱ्या असंख्य होड्या या पोलिसांच्या मालकीच्या असल्याची उघड झालेली माहिती. यापूर्वी खाण घोटाळ्यातही असेच घडले होते. त्या घोटाळ्यात अडकलेले केवळ खाण खात्याशी संबंधितच नव्हते, तर अनेक पोलिसही होते. त्यामुळे त्या प्रकरणाचा केवळ तपाणसच रखडला असे नव्हे, तर तत्परतेने कारवाई झाली नाही. बेकायदा रेती उपसा प्रकरणाचेही असेच झाले आहे. ‘कुंपणच शेत खाऊ लागले तर...’ या म्हणीची येथे आठवण होते.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि लोकार्पण!
सरकारी निधीतून समाजासाठी उभारणारे प्रकल्प हे समाजाला थेट लोकार्पित करायचे असतात, पण ते लोकार्पण करताना काहीजणांना आपल्या नावाने मिरविण्याची मात्र हौस मोठी असते. मये मतदारसंघात पिळगाव पंचायतीच्या एका वॉर्डमध्ये आरडीएमार्फत स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. तिचे काम पूर्ण होताच गावात एका महिलेचा मृत्यू झाला. तिचा अंत्यसंस्कार तेथेच झाला आणि त्याचवळी या स्मशानभूमीचे लोकार्पणही झाले. आता अशा प्रसंगीही या कामाचे श्रेय घेणाऱ्या स्थानिक पंचाला उद्घाटनाचे मोठेपण हवेच होते. उद्घाटन सोहळाही ठरला, पण आदल्याच दिवशी वाड्यावर आणखीन एका वृध्द महिलेचे निधन झाले. तिच्यावरही त्याच स्मशानभूमीत अंतिमसंस्काराचा बेत.
सकाळी स्मशानभूमीत अंतिमसंस्काराची तयारी, तर दुसऱ्या बाजूने पंच स्मशानभूमी पताका लावून, रंगवून, मंडप उभारून उद्घाटन करण्याच्या तयारीत. गावावर शोककळा, तर पंच मात्र आपल्याच ऐटीत. संध्याकाळ झाली, उद्घाटनाची घडी समीप आली. मंत्री, आमदार फिरकलेच नाहीत, झेडपी आले आणि तेही तेथील परिस्थिती पाहून माघारी फिरले. पंचायत निवडणुकीपूर्वी स्मशानभूमीचे उद्घाटन करून श्रेय आणि मोठेपण घेण्यासाठी उत्सुक असलेल्या पंचाची मात्र फजिती झाल्याची रंगतदार चर्चा गावात रंगली.
सुदिनांच्या दरबारात गर्दी...
सुदिन ढवळीकर हे वीजमंत्री झाल्यापासून त्यांच्या महालक्ष्मी देवळानजीकच्या निवासस्थानी परत एकदा गर्दी जमायला लागली आहे. असतील शिते जमतील भुते या उक्तीचा या ठिकाणी प्रत्यय येत आहे. गेल्या तीन वर्षांत ठराविक कार्यकर्ते सोडल्यास सुदिनच्या दारात विशेष गर्दी दिसत नसे, पण आता परत एकदा ती दिसू लागली आहे. विविध कामांसाठी नागरिकांची आणि नोकरी मिळावी यासाठी तरुणांचीही गर्दी होताना दिसत आहे. आता सुदिनराव कोणत्या नोकरी देतात ते बघावे लागेल.
काहींना सुदिंननी तसा शब्दही दिला आहे म्हणे. सुदिन हे शब्दाचे पक्के असल्यामुळे ज्यांना शब्द दिला आहे त्यांची नोकरी निश्चीत आहे असेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे या नोकरीमध्ये फोंडा, शिरोडा व प्रियोळ मतदारसंघातील लोकही आहेत. आता सुदिनराव कोणा कोणाला नोकऱ्या देतात हे बघावे लागेल. यामुळे सध्या सुदिनाचा दरबार गर्दीने फुलून जात आहे एवढे मात्र खरे.
रात्रीस खेळ चाले..!
रोम जळत होते तेव्हा निरो राजा सारंगी वाजवत होते. कुंकळळीकर सध्या मूलभूत सुविधांपासून वंचित असून कुंकळ्ळी पालिका मंडळ मात्र मूक प्रेक्षक बनून जनतेचे हाल उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. पालिकेकडे शहरातील गटारे साफ करण्यासाठी निधी व कामगार नसल्याचे तुणतुणे वाजवितात. जनता मॉन्सूनपूर्व कामे सुरू न केल्याबद्दल पालिकेच्या नावाने बोटे मोडतात. दुसऱ्या बाजूने पालिका मंडळाचे नगरसेवक एनआयटी इमारतीच्या प्राकारातील पाण्याचा निचरा व्हावा म्हणून रात्रीच्या वेळी कोणतीही पूर्वपरवानगी व ना हरकत दाखला न घेता रस्ता खोदून एनआयटीसाठी गटार खोदून दुवा घेण्याचे काम नगरसेविका व पालिका मंडळ करीत असल्याचा आरोप होत आहे. आता हे गटार रात्रीचे का खोदण्यात येत आहे व यात काय गौडबंगाल आहे याचा छडा लावण्याचे काम मोराईस नावाचे गृहस्थ करीत आहेत. पाहुया काय होते ते.
काम आणि श्रेय
सध्या केपे मतदारसंघात जी विकासकामे सुरू होत आहेत त्याचे उद्घाटन नवीन आमदार एल्टन डिकोस्टा करत असल्याने ते बाबूंनी केलेल्या कामाचे फुकाचे श्रेय ते घेत असल्याचा आरोप कवळेकर यांचे समर्थक करू लागले आहेत. खरे तर एक आमदार गेल्यावर त्याचे काम नव्या आमदाराने करणे हे कायद्यानेच होणारे काम. 2002 साली बाबू निवडून आले, त्यापूर्वी केपेचे आमदार प्रकाश वेळीप होते आणि त्यांनी मंजूर करून आणलेल्या केपे क्रीडा संकुल आणि आरोग्य केंद्राचे उद्घाटन नंतर बाबूंनी केले नव्हते का? त्यावेळी प्रकाश वेळीप यांनी अशी खळखळ कधीच केली नाही.
मिकी- चर्चिलचे जुळले
मिकी व चर्चिल ही गोव्याच्या राजकारणातील दोन टोके. आजवर कोणत्याच मुद्यावर या आसामी एकत्र आल्याचा दाखला नाही. मात्र, सुभाष वेलिंगकरसरांनी सेंट फ्रांसिस झेवियरचे जे मढे उरकून काढले आहे त्या प्रकरणामुळे या दोघांना तारस्वरात डरकाळ्या फोडण्याची संधी मिळाली आहे. मिकी असो वा चर्चिल, त्यांना इतिहास भुगोल वगैरेचे काहीच पडून गेलेले नाही. त्यांचे चालते ते केवळ मतांचे राजकारण. त्या बाहेर जाण्याची वा विचार करण्याची त्यांची तयारीच नसते हे या निमित्ताने पुन्हा दिसून आले आहे.∙∙∙
पंचायती राजकारण मुक्त
पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर नकोत असे जे मत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी मांडले आहे त्याबद्दल त्यांच्या भाजपमधील अनेकांनी नापसंती व्यक्त केली असल्याने ते या भूमिकेपासून कोणत्याही क्षणी घूमजाव करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे पाहिल्यास प्रत्येकाला या निवडणुका पक्षीय पातळीवर होऊ नये असेच वाटते, पण निवडणुकीनंतर पंचायती आपल्या कह्यात असाव्यात असा त्यांचा अट्टाहास असतो. ही निवडणूक महिनाभरावर आलेली असताना विविध पंचायतीत आलेले वा येत असलेले अविश्वास ठराव हे त्याचेच उदाहरण आहे. मग पंचायतमंत्री ताकाला जाताना भांडे का लपवता असा सवाल करावासा वाटतो.
शिक्षकांनाही धडे
देशाचे भविष्य मुलांच्या रूपाने सुशिक्षित, सक्षम बनवण्याचे महान कार्य शिक्षकवर्ग नियमित करत असतो. त्यांच्या कार्याला निश्चितच तोड नाही. सध्या अनेकजण शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीवर देशातील महत्त्वाच्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण पदांवर पोहोचले आहेत आणि अजूनही अनेक विद्यार्थी घडत आहेत. हे कार्य निरंतर चालणार आहे. मात्र, हल्लीच एका तालुक्यात शिक्षकांसाठी व्याकरण आणि शुद्धलेखन कार्यशाळा पार पडली. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या, त्या विचार करायला लावणाऱ्या होत्या. खरे तर शिक्षक म्हणजे हा शिक्षणाचा पाया मानला जातो. जेथे शिक्षकांनाच व्याकरणाचे धडे घ्यावे लागत असतील, तेथे विद्यार्थ्यांचे काय हाल असेल, असाही सूर व्यक्त होत होता. शुद्धलेखनकला आत्मसात करणे, हे समजू शकते; पण व्याकरण प्राथमिक इयत्तेपासूनच आपण शिकत असताना ते कच्चे कसे? असाही प्रश्न केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.