म्हापसा: बार्देशात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत वरील तालुक्यातून, एकूण ९ जागांसाठी रिंगणात उतरलेल्या ४३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य शनिवारी मतपेटीत बंद झाले. बार्देशात सरासरी ६७.९० टक्के मतदान झाले असून, मतदारांनी नेमका कौल कोणाच्या बाजूने दिला आहे, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
गेल्या दोन जिल्हा पंचायत निवडणुकीत बार्देशात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व राहिले होते. त्यामुळे हीच विजयी घोडदौड अबाधित ठेवण्याचे भाजपासमोर तसेच सत्ताधारी विधानसभा लोकप्रतिनिधींवर यावेळी आव्हान आहे. कारण, गोव्यातील राजकीय स्थिती तसेच इतर घडामोडीमुळे तालुक्यात, बऱ्यापैकी ‘सायलंट वोटिंग’ झाले.
मतदानानंतर मतदारही मोकळ्यापणाने बोलत नसल्याने अंदाज बांधणे कठिण बनले आहे. मतदानदिवशी पर्यंत बार्देशातील काही मतदारसंघात ‘अंडर करंट’ मोठ्या प्रमाणात होता. अशावेळी मतदान आपल्याच बाजूने झाले, असे जो-तो नेतेमंडळी मतदानानंतर जरी माध्यमांसमोर सांगत असले तरी प्रत्येकांच्या मनात निकालाबाबत धाकधूक आहे. एकूणच बार्देशात चुरशीच्या राजकीय लढतीने सस्पेन्स वाढला आहे.
बार्देशात नऊपैकी पाच ते सहा मतदारसंघात अटीतटींचा राजकीय सामना अपेक्षित आहे. यातील अधिकतर मतदारसंघांत भाजपा व काँग्रेस अशीच थेट लढत आहे. तर कोलवाळमध्ये थेट दुरंगी लढत आहे. विशेष म्हणजे, आरजीपी तालुक्यात पुन्हा एकदा आपले वेगळे अस्तित्व दाखवतील, अशी दाट चिन्हे आहेत.
बार्देश तालुक्यात मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिलायला लोबो, मायकल लोबो, अॅड. कार्लुस फेरेरा, केदार नाईक तसेच माजी आमदार किरण कांदोळकर, ग्लेन टिकलो यांच्यासाठी ही प्रतिष्ठीची लढत आहे. एकप्रकारे या सर्वांसाठी विधानसभा निवडणूकीपूर्वी ही झेडपी निवडणूक सेमी-फायनल सारखीच आहे. त्यामुळे निकालाकडे मतदासंघातील लाेकांचे लक्ष लागले आहे.
शिवोली मतदारसंघात आम्ही भरपूर विकासकामे करून दाखवली आहेत. लोकांना आमचे काम सर्वश्रुत आहे. शब्दांपेक्षा कृती अधिक बोलकी असते. मुळात ज्या व्यक्तींना झेडपीचे अधिकार काय, हेच माहिती नाहीत ते लोक मंत्र्यांच्या अधिकाराबाबत बोलत आहेत. त्यामुळे शिवोली व हणजूण ही दोन्ही झेडपी मतदारसंघात आमचे भाजपचे उमेदवार जिंकतील.
सरकार विरोधी लाटेचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. आम्ही राजकारणात लोकांचे अस्तित्व व स्थानिकांचे व्यवसाय राखून ठेवण्यासाठी आलो आहोत. मात्र, काही राजकारणी मंडळी, राजकारण हे आपले कायमस्वरूपी व्यवसाय करू पाहताहेत. त्यांचा विरोध अन् पाडाव करण्यासाठी आम्ही राजकारणात उतरलो आहोत. मतदार आमच्या पाठीशी उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे.
- योगेश गोवेकर, काँग्रेस झेडपी उमेदवार, हणजूण मतदारसंघ
हणजूण मतदारसंघात मिंगेल क्वेरोझ (आरजीपी), नारायण मांद्रेकर (भाजपा), योगेश गोवेकर (काँग्रेस), पूजन मालवणकर (आम आदमी पक्ष), बलभीम मालवणकर (अपक्ष) यांच्यात चुरशीची लढत झाली. तसेच शिवोली मतदारसंघात डिओनिझिया ब्रिटो (आम आदमी पक्ष), जयंद्रथ पाडोळकर (आरजपी), महेश्वर गोवेकर (भाजपा), प्रेमानंद मांद्रेकर (अपक्ष), रोशन चोडणकर (काँग्रेस), शिवा चोडणकर (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात होते. या दोन्ही मतदारसंघात भाजपाचे उमेदवार जिंकून आणण्याची जबाबदारी विधानसभेच्या शिवोलीच्या भाजपाच्या आमदार दिलायला लोबो यांच्यावर आहे. यंदा सर्वाधिक उमेदवार हे शिवोली व हळदोणा मतदारसंघात उभे होते. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी सहा उमेदवार रिंगणात होते. तर हणजूण, रेईश-मागूश, सुकूर या मतदारसंघात प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.