Bardez Water Supply Dainik Gomantak
गोवा

Bardez: बार्देशमधल्या 'पाणीबाणी'बाबत धक्कादायक माहिती; 'तिळारी'मुळे नाही तर 'जलसंपदा'च्या निष्‍काळजीपणामुळे टंचाई

Bardez water shortage: आमठाणे धरण ते अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प यांच्यामध्ये असलेल्या ‘गेट’कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ते उघडणे कठीण बनले.

Sameer Panditrao

Water Supply Crisis In Bardez

पणजी: बार्देश तालुक्‍यातील सध्‍याची ‘पाणीबाणी’ ही तिळारीचा कालवा फुटल्यामुळे नव्हे तर गोवा जलसंपदा खात्याच्या निष्काळजीपणामुळे निर्माण झाली आहे, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे.

आमठाणे धरण ते अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प यांच्यामध्ये असलेल्या ‘गेट’कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ते उघडणे कठीण बनले. त्‍यामुळेच गेले चार दिवस बार्देश तालुका पाण्याविना राहिला आहे.

विश्‍‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाला दररोज १०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. तर, १० दशलक्ष लिटर पाणी पर्वरी येथील प्रकल्पाला हवे असते. सध्या साळ येथील बंधाऱ्यातून उपसून पुरविले जाणारे पाणी हे ३० दशलक्ष लिटर असल्याने ते बार्देशची तहान भागवण्यास अपुरे पडते. एकदा ते गेट उघडले गेले की बार्देशची तहान लगेच भागवणे शक्य आहे. तिळारीचे पाणी पंधरा दिवस आले नाही तरी पाणीटंचाई भासणार नाही, एवढा साठा आमठाणे धरणात सध्या आहे.

तिळारीच्या कालव्यातून अस्नोडा जलप्रकल्पाला थेट पाणीपुरवठा होतो. पंपाने ते पाणी उपसून प्रकल्पात घेतले जाते. दुसरा मार्ग हा साळ बंधाऱ्यात साठवलेले पाणी प्रकल्पापर्यंत पोहोचविण्याचा आहे. तिळारीचे पाणी बंद झाल्यानंतर तो कार्यान्वित करण्यात आला आहे.

मात्र या मार्गाने केवळ ३० दशलक्ष लिटर पाणी प्रकल्पापर्यंत पोचत असल्याने ते पाणी पूर्ण बार्देश तालुक्याची तहान भागवण्यासाठी अपुरे पडत आहे. तिसरा मार्ग हा आमठाणे धरणातील पाणी अस्नोडा प्रकल्पापर्यंत पाणी आणण्याचा आहे.

या तिसऱ्या मार्गावर प्रवाह सुरू व बंद करण्यासाठी पाण्यात खोलपर्यंत असलेले फाटक (गेट) बसवण्यात आले आहे. ते फाटक वर उचलून पाण्याचा प्रवाह सुरू करण्याची व्यवस्था आहे. आमठाणे धरणातून आपत्कालीन स्थितीत अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी नेण्याची वेळ आली तरच हे फाटक उघडावे लागते.

तशी स्थिती आल्यास ते फाटक उघडले जाणे आवश्यक असते. जलसंपदा खात्याने ते फाटक उघडून बंद करण्याचा सरावच न केल्याने सदर फाटक गंजले आहे. ते उघडत नाही. त्यामुळे आमठाणे धरणात मुबलक पाणी असूनही ते अस्नोडा प्रकल्पापर्यंत पोचू शकत नाही. जलसंपदा खात्याच्या हलगर्जीपणामुळे बार्देशच्या माथी पाणीबाणी लादली आहे. आमठाणे धरणात जलसाठा आणि बार्देशातील नळ कोरडे ही स्थिती याचमुळे उद्‍भवली आहे.

अखेर नौदलाने स्‍वीकारले आव्‍हान

१.तिळारीचा कालवा फुटल्यानंतर आमठाणे धरणातील पाणी आणण्याचे कागदोपत्री नियोजन करण्यात आले. मात्र हे पाणी अस्नोड्यात पोहोचलेच नाही.

२. याबाबत माहिती मिळताच खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात हे फाटक उघडण्यासाठी आपले अभियांत्रिकी ज्ञान पणाला लावले. पण पाण्याच्या दाबामुळे ते फाटक कलल्याने ते उघडले जात नसावे असे वाटून ते उघडण्याची व्यवस्था करण्यात आली.

३. फाटक पाण्यात खोलवर असल्याने ते उघडण्यासाठी पाण्याखाली जाऊन दुरुस्ती करणे आवश्यक बनले होते. हे काम कोणी करू शकेल का, याची चाचपणी शेजारील महाराष्ट्रात करण्यात आली.

४. अनेक कंपन्यांनी आपल्याकडे तसे काम करणारे तंत्रज्ञ नसल्याचे सांगत हे काम नाकारले. त्यातच दोन दिवस गेले. अखेर एक कंपनी तयार झाली, पण त्यांच्याकडे पाणबुडे नव्हते.

५.शेवटी नौदलाने ही तयारी दर्शविली. आज दुपारी नौदलाचे पाणबुडे आणि त्या कंपनीचे तंत्रज्ञ घटनास्थळी दाखल झाले. कामाची तयारी सुरू झाली आहे.

आता शुक्रवारनंतरच तिळारीतून पाणी शक्‍य

तिळारीच्या कालव्यातून आता शुक्रवारनंतरच पाणीपुरवठा सुरू होऊ शकतो. कालव्याला तीन मीटर रुंद आणि दहा मीटर रुंद भगदाड पडले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी कालव्याखाली घातलेल्‍या पाईपमधील लोखंड गंजल्याने तो पाईप आणि कालवा खचला आहे. आज मंगळवारी कालव्याच्या तळाशी काँक्रीट घातले आहे. उद्या पाईप बसवून वर काँक्रीट घातले जाईल. त्यानंतर शंभर ट्रक भराव घातला जाईल. त्यावर फिल्म बसवल्यानंतरच पाणीपुरवठा सुरू करता येईल.

-विजय जाधव,

(कार्यकारी अभियंता-तिळारी पाटबंधारे प्रकल्प, महाराष्ट्र)

आमठाणे धरणाच्या फाटकाचे नटबोल्ट मंगळवारी रात्री १० वाजता काढण्यात आले. याबाबत तेथे उपस्थित जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉल करून माहिती घेतली आहे. आता २२० घनमीटर दराने अस्नोड्याला पाणी पोचत आहे. उद्या १०० दशलक्ष लिटर पाणी मिळाले तर पूर्ण बार्देशला पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.
संतोष म्हापणे (मुख्य अभियंता-साबांखा)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT