Tanvi Vasta Bank Fraud Case
मडगाव: बँकेत येणाऱ्या ज्येष्ठ ग्राहकांना लुबाडून कोट्यवधींची माया जमविणारी ठकसेन तन्वी वस्त ही बांधकाम व्यावसायिकांना व्याजाने पैसे देत होती, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काही बिल्डरही गाेत्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र, यासंबंधी पोलिसांशी संपर्क साधला असता, अजून तरी आमच्यासमोर संशयितांनी याची कबुली दिलेली नाही, असे सांगण्यात आले.
आज तन्वी वस्त आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या काकोडा शाखेचा व्यवस्थापक आनंद जाधव या दोघांना केपे न्यायालयात हजर केले असता, तन्वीच्या पोलिस कोठडीत तीन, तर जाधवच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली. आता तन्वीला सोमवारी, तर जाधवला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
कुडचडेतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आतापर्यंत १.४० कोटी रुपयांचा गफला झाल्याची बाब पुढे आली असून यातील बहुतेक पीडित वृद्ध आणि मोबाईल बँकिंगची माहिती नसलेले आहेत. नेट बँकिंगची माहिती नसलेल्या ग्राहकांना हेरूनच तन्वी वस्त त्यांना गंडा घालायची, असे तपासात पुढे आले आहे.
या वृद्धांच्या खात्यातून वळविलेले पैसे तन्वी स्वत:च्या खात्यात जमा करायची. हेच पैसे नंतर ती बिल्डरांना व्याजाने देत होती, अशी माहिती कुडचडेतील काही व्यावसायिकांनी दिली. नाव न छापण्याच्या अटीवर एका व्यावसायिकाने सांगितले, या घाेटाळ्याची व्याप्ती फार मोठी आहे.
कॉस्तांसियो यांनी दिलेल्या तक्रारीत, ते काकोडेच्या सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असता, त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने तन्वी त्यांच्या संपर्कात आली.
त्यांना २० हजार रुपयांची गरज होती, ते तन्वीच्या मदतीने त्यांनी काढले. यावेळी त्यांच्या नकळत तन्वीने चेकबुकमधील पाच चेक काढून ठेवले.
कॉस्तांसियो यांच्या खात्यात २० लाख रुपये असल्याचे कळल्यावर तन्वी तीन-चार वेळा त्यांच्या घरी जाऊन भेटली.
तन्वीच्या विरोधात बुधवारी सहाव्या ‘एफआयआर’ची नोंद झाली असून या प्रकरणात तिने पांगुणा-सांगे येथे राहणारे कॉस्तांसियो फर्नांडिस या अर्धांगवायूने ग्रस्त ७९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला १५.५० लाखांना गंडा घातल्याचे पुढे आले आहे. त्याच्या खात्यातील १४ लाख रुपये ‘एफडी’त गुंतविल्याचे सांगून त्याला ‘एफडी’ची बनावट पावती देऊन १४ लाख रुपये लुबाडले. त्याचप्रमाणे नेट बँकिंगच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून दीड लाख रुपये स्वत:च्या खात्यात वळविले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.