Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबज; पेले... एव्‍हरी डे ईज गुड डे!

Goa Latest Political News: चिंबलमध्ये सध्या ‘हात हलके ठेवायचे’ हा सल्ला कुणीच ऐकत नाही, उलट हात जरा जास्तच चालू लागलेत, अशी चर्चा गल्ली-गल्लीत सुरू आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पेले... एव्‍हरी डे ईज गुड डे!

दक्षिण गोव्‍यातील सेलेब्रिटी मच्‍छिमार असलेले पेले फर्नांडिस हे या ना त्‍या कारणाने समाज माध्‍यमांवर व वृत्तपत्रांत नेहमी चर्चेत असतातच. कधी कासवांना जीवदान दिल्‍यामुळे त्‍यांचे नाव बातमीत झळकते तर सेलेब्रिटी क्रिकेटर्सबरोबर संवाद साधणारे त्‍यांचे व्‍हिडिओ सोशल मीडियावर झळकतात. पेलेची एक सवय म्‍हणजे, त्‍यांना कुणी हॅलो म्‍हटले तर त्‍यांच्‍याकडून उत्तर येते, ‘हॅलो एव्‍हरी डे ईज गुड डे’ काल विधानसभा अधिवेशनात या पेलेंचे नाव विजय सरदेसाई यांच्‍यामुळे चर्चेत आले. दृष्‍टी मरिनच्‍या जीवरक्षकांनी पर्यटकांचे जीव वाचविल्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदन करण्‍याचा ठराव गोवा विधानसभेत आला हाेता. त्‍याला आक्षेप घेऊन विजय सरदेसाई यांनी दृष्‍टी मरीन कंपनी ही पैसे घेऊन ही सेवा देते त्‍यामुळे त्‍यांचे अभिनंदन करण्‍याची गरजच काय? असा सवाल करतानाच त्‍यापेक्षा कुठल्‍याही सन्‍मानाची आस न बाळगता आपला जीव धोक्‍यात घालून मच्‍छिमारांचे जीव वाचविणाऱ्या पेलेचे काम त्‍याहून श्रेष्‍ठ आहे, असे सरदेसाई म्‍हणाले. आणि या वक्‍तव्‍याची दखल घेत मुख्‍यमंत्र्यांनी पेले यांचे नावही अभिनंदनाच्या यादीत समाविष्‍ट केले. ∙∙∙

अंत पाहू नका!

चिंबलमध्ये सध्या ‘हात हलके ठेवायचे’ हा सल्ला कुणीच ऐकत नाही, उलट हात जरा जास्तच चालू लागलेत, अशी चर्चा गल्ली-गल्लीत सुरू आहे. पंच सदस्यावर उगारलेला हात म्हणजे आंदोलन तापलेय याचं थेट प्रमाणपत्रच, असं जाणकार सांगतात. आता गंमत अशी की, जर पंचायत सदस्यालाच सुटका नाही, तर आमदार आले तर काय? असा सवाल गावात चर्चेत आहे. काहीजण तर म्हणतात, आमदारांनी तिकडे तोंड दाखवायच्या आधी हेल्मेट आणि बॉडीगार्ड दोन्ही तयार ठेवावेत! पूर्वी संवाद साधायला वेळ होता, तेव्हा सगळेच व्यग्र होते; आता संवादाची आठवण येतेय, पण वेळ मात्र निसटून गेलीय, असं ग्रामस्थ म्हणताहेत. संतप्त ग्रामस्थांचे ‘आम्हाला समजून घ्या’ असं सांगण्याऐवजी ‘आमचा अंत पाहू नका’ असा इशारा देणं, म्हणजेच चिंबलमध्ये आंदोलनाचं तापमान वाढलंय. ते इतकं की, थर्मामीटरही घामाघूम झालंय आणि राजकीय मंडळी मात्र सावलीत उभी राहून हवामानाचा अंदाज घेतायत! ∙∙∙

हडफडेतील अस्वस्थता

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या क्लबला आग लागली आणि तेथे सरपंचाविरोधातील अनेकांना आपला राजकीय मार्ग सुकर झाल्याचे भासू लागले. वरून आशीर्वाद असलेले ते आता सरपंच गजाआड झाल्यावर आपलाच गावावर वरचष्मा असे आडाखे योजत होते. मात्र सरपंचांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. तेथून आता सरपंच उच्‍च न्यायालयात पोचला आहे. त्याने हातपाय हलवणे सुरु ठेवल्याने त्याचा राजकीय पट उलटवण्याचे स्वप्न साकार होताना दिसत नाही. त्यामुळे हवालदील झालेल्यांना आता या प्रकरणी पोलिस तपास संथ होत गेल्याचे भासू लागले आहे. ∙∙∙

आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दा

संसदेत आदिवासी आरक्षणासंदर्भातील विधेयके मंजूर झाली आणि सर्वांना आता राज्यातील आदिवासींना राजकीय आरक्षण मिळाल्यातच जमा झाल्यासारखे वाटले. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने तो विषय पून्हा चर्चेचा ठरत आहे. आदिवासी समाज पून्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. आम्ही आदिवासी समाजासाठी काय काय केले याची उजळणी करून आदिवासी समाजाला आता समाधानी करता येणार नाही. राजकीय आरक्षण हवेच अशी मागणी पुढे येणार आहे. विधानसभा अधिवेशन काळात आंदोलन करून हा विषय अद्याप संपला नसल्याचे दाखवून दिले जाणार असले तरी आदिवासी समाजाकडून दीर्घ लढ्याची तयारी सुरू असल्‍याचे दिसते. ∙∙∙

मांद्रेतील ‘बर्च फायर’

हडफडे येथील बर्च बाय रोमिओ लेन या नाईट क्लबला आग लागली. त्या आगीत २५ जणांनी जीव गमावले. त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. असे कुठे कुठे क्लब आहेत त्याची चर्चाही सुरू झाली होती. आता मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी आपल्या मतदारसंघातही बर्च फायर व्हायचे आहे, असे सांगून उत्सुकता वाढवली आहे. त्यांनी आपण मुख्यमंत्र्यांना त्याची माहिती दिली आहे असे सांगितले आहे. यामुळे आता मांद्रे मतदारसंघातील कोणत्या क्लबवर कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. कारवाई झाली नाही तर चर्चा होईल ती वेगळीच. ∙∙∙

मुख्‍यमंत्री ‘नेमके’ काय बोलणार?

गत महिन्‍यात हडफडेतील बर्च बाय रोमियो लेन क्‍लबला लागलेल्‍या आगीवर आपण येत्‍या शुक्रवारी भाष्‍य करू, अशी हमी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी सभागृहाला दिल्‍यानंतर या विषयावरून आक्रमक झालेले विरोधक काही प्रमाणात शांत झाले. या प्रकरणी सरकारने स्‍थापन केलेल्‍या उत्तर गोवा जिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या अध्‍यक्षतेखालील समितीने सादर केलेला अहवाल अजूनही सरकारने सार्वजनिक केलेला नाही. त्‍याबाबत जनतेत संभ्रम आहे. त्‍यामुळे शुक्रवारी यावर मुख्‍यमंत्री नेमके काय बोलणार? आणि या प्रकरणी कोणकोणत्‍या अधिकाऱ्यांना ‘घरी’ जावे लागणार? याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.∙∙∙

‘मुरणाऱ्या’ पाण्याचे काय झाले?

गतवर्षी पीडब्ल्यूडीचे दोन खात्य‍ांत विभाजन झाले व पेयजलपुरवठा हे नवे खाते स्थापन केले. मुख्यमंत्र्यांनी विश्वासू मंत्री सुभाष फळदेसाईंकडे त्याचा कारभार सोपवला. फळदेसाईंनी कारभार हाती घेताच ‘मुरणाऱ्या’ पाण्याचा विषय उपस्थित करत पाणी चोरी, गळती पूर्णपणे रोखण्याचा निर्धार बोलून दाखवला. त्यामुळे आतातरी आवश्यक पाणी मिळेल, असे जनतेला वाटले होते. परंतु, अधिकाऱ्यांनी मंत्र्यांचा निर्धार किती प्रत्यक्षात उतरवला हे सर्वश्रूत आहे. मंगळवारी आमदार आमोणकर यांच्या प्रश्नांना सभागृहात उत्तर देताना फळदेसाईंनी सहा महिन्यांत अनेक प्रकल्प पूर्ण होऊन जनतेला आवश्यक तितके पाणी मिळेल असा दावा केला. पण, ‘मुरणारे'' पाणी वाचवण्यासाठी आपण काय केले? यावर त्यांनी चकार शब्दही न काढल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Transcend Goa 2026: ट्रान्सेंड गोवा- 26 चा बिगुल! कथानिर्मात्यांसाठी संधीचे द्वार; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Train Accident: काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! चालत्या ट्रेनवर कोसळले क्रेन, 22 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; युद्धपातळीवर बचावकार्य सुरु VIDEO

'RSS'वरून रणकंदन! "स्वातंत्र्यलढ्यात योगदान कुठे? पुराव्यासह चर्चेला या" आप प्रदेशाध्यक्षांचे दामू नाईकांना खुले आव्हान

Kushavati District: नवीन जिल्हा मुख्यालयासाठी केपे सज्ज, कुशावती योग्य नाव; केपेवासीयांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Pilgao Protest: खाण कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांची वज्रमूठ! पिळगावात खनिज वाहतूक ठप्पच; प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू

SCROLL FOR NEXT