खांडोळा: बाणस्तारीचा चतुर्थीचा पारंपरिक माटोळी बाजार ४ आणि ५ सप्टेंबर रोजी भरविण्यात येणार असल्याची माहिती भोम-अडकोण पंचायतीचे सरपंच दामोदर नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी सरपंच सुनील भोमकर, पंच आदम खान उपस्थित होते.
या बाजाराला शेकडो वर्षांची परंपरा आहे. गोव्यातील कानाकोपऱ्यातून घाऊक व्यापारी येथील बाजारात येत असतात. बागायतदार व शेतकरी सावईवेरे, बेतकी, खांडोळा, तिवरे, भोम, कुंडई, वेलिंग, कुंकळ्ळी भागातून मोठ्या प्रमाणात बागायती साहित्य विक्रीस आणतात. विशेषतः केळीची पाने, केळ्यांचे घड, सुपारी, खाण्याचे पान शिवाय बागायती फळे, रानफळे, फुलेदेखील मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध असतात.
रानफळांनाही मोठी मागणी आहे. गावठी फळांबरोबर पालेभाज्या, कपडे, सर्व प्रकारचे मसालेही विक्रीस उपलब्ध करण्यात येतात. शिवाय नवीन लग्न झालेल्या नववधूच्या ओझ्यासाठी लागणारे सर्वप्रकारचे साहित्य विक्रीस आणतात. दोन दिवस प्रचंड गर्दीत बाणस्तारी बाजार भरत असतो. रात्री उशिरापर्यंत हा बाजार सुरू असतो, असे सरपंच दामोदर नाईक यांनी स्पष्ट केले.
पूर्वी ग्राहकांना पावसात भिजत खरेदी करावी लागत असे. तसेच पूर्वीचा मार्केट प्रकल्प लहान होता, जागा अपुरी होती. परंतु आता प्रशस्त नूतन मार्केट प्रकल्पात चांगली सोय झाली आहे. आता जागा अपुरी पडणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.