मडगाव: बायणा-वास्को येथे ज्या ठिकाणी दरोडा पडला त्यानंतर सागर नायक यांनी आपल्या फोनवरून पोलिसांशी संपर्क साधल्यावर काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिथे येऊन सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली. वास्तविक त्यावेळी हे दरोडेखोर त्याच परिसरात होते. त्यावेळी पोलिसांनी जवळच्या परिसरात शोध घेतला असता तर हे दरोडेखोर त्यांच्या तावडीत सापडलेही असते.
या दरोडेखोरांनी मारहाण केल्याने जबर जखमी झालेल्या नायक यांना गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्या रात्री नेमके काय घडले याची त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मी पोलिसांशी संपर्क साधल्यावर अवघ्या काही मिनिटांत तीन वाहने घेऊन पोलिस आमच्या इमारत परिसरात दाखल झाले. ते सगळेच सीसीटीव्ही फुटेज पाहत होते.
त्यावेळी त्यांनी आपली वाहने घेऊन जवळच्या परिसरात शोध घेतला असता तर दरोडेखोर सापडू शकले असते. कारण हे दरोडेखोर कुठलेही वाहन घेऊन आले नव्हते, तर पायी चालत आले होते. हे चोरटे भोजपुरी बोलत होते. कपाटाची चावी मी त्यांना द्यावी म्हणून त्यांनी माझ्यावर लोखंडी दांड्याने हल्ला केला. त्यांच्या हातात सुरी आणि कटर होता. त्या कटरने चोरट्यांनी माझ्या दंडालाही जखमा केल्या. त्यांच्या मारहाणीपासून सुटका मिळावी यासाठी मी घेरी येऊन पडल्याचे नाटक केले नसते तर त्यांनी माझा प्राण घेतला असता, असे नायक म्हणाले.
नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार सगळे मिळून सात दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुमारे ४५ मिनिटे ते घरात होते. त्यांनी घरातील सर्वांना बांधून ठेवले. कपाटाच्या आणि सेफच्या चाव्या त्यांच्या हाती लागल्यावर त्यांनी आतील पैसे आणि दागिने साफ केले आणि नंतर ते निघून गेले.
ज्यावेळी मी रक्तबंबाळ स्थितीत होतो. त्यावेळी माझी मुलगी नक्षत्रा हिने धाडस दाखवून दार उघडल्यानेच माझा प्राण वाचला असे मी म्हणेन. त्यांच्या मुलीने सर्व शेजाऱ्यांचे दरवाजे ठोठावून त्यांना जागे केले. क्षणात सगळे शेजारी उठून जागे झाले. त्यावेळीही हे दरोडेखोर आमच्या बिल्डिंगच्या परिसरातच होते, असे मला वाटते असे नायक म्हणाले.
या दरोड्यासंदर्भात पोलिसांना काही प्रमाणात माहिती प्राप्त झाली आहे; पण काही धागे व्यवस्थित जुळून येत नसल्याने पोलिस कुठलीही माहिती देण्यास तयार नाहीत. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांना याबाबत विचारले असता, आमचा तपास सुरू आहे, एवढेच ते म्हणाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी करण्यासाठी ज्या कटरांचा वापर करण्यात आला ते कटर मडगावातून विकत घेतले असावेत, असा पोलिसांना संशय वाटत असून त्याची खात्री पटविण्यासाठी काहीजणांना मडगाव येथे आणले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.