CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: बाबूशना कानपिचक्या; पर्रीकर हे मोठे नेते; छोट्या लोकांनी बोलू नये : मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: महसूलमंत्री मोन्सेरात यांनी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्यावर पणजी शहराची वाट लावल्याचा आरोप केल्याच्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या विधानापासून राज्‍य सरकार व भाजपने फारकत घेतली. पर्रीकर हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर छोट्या छोट्या लोकांनी बोलू नये, अशा शब्दांत खडसावून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बाबूश यांना त्यांची जागा दाखवून दिली.

या एकूण राजकीय घडामोडींनंतर सरकार आणि भाजपने एकटे सोडलेले बाबूश विद्यमान सरकारमध्ये राहणार की, स्वाभिमानी बाणा दाखवत राजीनामा देऊन बाहेर पडणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

स्व. पर्रीकरांवर झालेल्या टीकेमुळे समाज माध्यमांवर बाबूश यांच्यावर टीकेची झोड उठली असून याविषयी निश्‍चित भूमिका घेण्यास टाळाटाळ करणारे सरकार आणि भाजपला अखेर जनमताच्या रेट्यापुढे झुकावे लागले. दिल्लीतही भाजपच्या वरिष्ठांपर्यंत हा विषय काहीजणांनी पोचवला असून त्यांचीही नजर येथील घडामोडींवर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी मंत्रिमंडळ फेररचनेचा विषय पुन्हा चर्चेला येण्याची शक्यता आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे रेंगाळल्याने पणजीतील छोट्या छोट्या व्यावसायिकांना त्यांचा फटका बसत आहे. दुकानासमोरील रस्ता खोदून सहा सहा महिने तसाच ठेवल्याने दुकानात ग्राहक येत नसल्याच्या या व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत. हा विषय उत्पल पर्रीकर यांनी उपस्थित करून या स्थितीला कुचकामी लोकप्रतिनिधी जबाबदार आहे आणि विधानसभा निवडणुकीआधी हे असे होणार असे आपण सांगत होतो, याकडे लक्ष वेधले होते.

उत्पल यांच्या या टीकेनंतर दुसऱ्या दिवशी बाबूश यांचे पुत्र महापौर रोहित मोन्सेरात यांनी शहराची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनीही १० रोजी बैठक घेत कामे ३० मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित केले. त्या बैठकीतील कामकाजाची पत्रकारांना माहिती देताना बाबूश यांनी उत्पल यांच्या आरोपांना थेट उत्तर देण्याऐवजी पणजी स्व. पर्रीकर यांनी खड्ड्यात घातल्याचा आरोप केला. पर्रीकरांनी पणजीचा २५ वर्षांत काय विकास केला, अशी विचारणाही केली. पर्रीकर आज हयात नसल्याने ते या आरोपांना उत्तर देऊ शकत नाहीत.

सर्वसाधारणपणे दिवंगत व्यक्तीवर सार्वजनिक टीका करण्याची सभ्यता पाळण्यात येते. असे असतानाही भाजपच्याच सरकारमधील मंत्र्याने स्व. पर्रीकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर टीका करणे राज्यभरातील अनेकांना आवडले नाही. काहीजणांनी चित्रफीत तयार करून, तर काहीजणांनी समाज माध्यमांवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. बाबूश यांच्यावर हा विषय बूमरॅंगसारखा उलटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांत त्यांच्या या प्रमादामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

मनोहर पर्रीकर हे आमचे मोठे नेते आहेत. त्यामुळे मनोहरभाईंचा कोणीच अशा प्रकारे राजकारणासाठी वापर करू नये. ते पक्षापेक्षाही मोठे नेते होते. त्यांनी केलेले कार्य, विकास विसरता येणार नाही. त्यामुळे छोट्या छोट्या राजकारण्यांनी त्यांचे नाव राजकारणासाठी वापरू नये.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
मनोहर पर्रीकर हे एका कुटुंबापुरते मर्यादित नाहीत. त्यामुळे पर्रीकरांसंदर्भात आपल्या वैयक्तिक राजकारणाबाबत अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य करू नये. ते आम्हा सर्वांचे आदर्श आहेत. ज्यांनी कोणी त्यांच्याबाबत असे वक्तव्य केले आहे, ते पक्षाचे विधान नसून त्यांचे वैयक्तिक मत आहे.
- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT