Dhaloustav In Goa: पौष महिना सुरू झाला की गोमंतकीय महिलांना धालोत्सवाचे वेध लागायला सुरुवात होते. पौष महिन्यात पौर्णिमेला गोव्यात धालो उत्सवाला प्रारंभ होतो. या धालो उत्सवात महिलांच्या अनेक कलागुणांना वाव मिळतो. यावेळी गोव्यातील पारंपारिक कला सादर केल्या जातात, धालो उत्सवात तुम्हाला काय काय पहायला मिळणार जाणून घ्या.
धालोनृत्य: धालोनृत्य हे गोमंतकीय लोकनृत्याचा एक प्रकार म्हणून प्रसिध्द आहे. यात महिलांच्या दोन आडव्या रांगा केल्या जातात. महिला सोबतच्या सखीच्या कंबरेत हात घालून एक रांग गाणे म्हणत पाच पावले पुढे येते. नंतर कंबरेत वाकून मागे जाते. त्यानंतर दुसरी रांग गाण्याची दुसरी ओळ म्हणत तशीच पुढे येऊन वाकत मागे जाते. धालो गीताचे गायन करत या महिला हे धालो नृत्य खेळत असतात.
धालो गीते: धालो गीते ही लोकगीताचा प्रकार आहे. ही गीते मौखिक स्वरुपात असल्यामुळे कुठेही लिखित स्वरुपात उपलब्ध नाहीत. ही लोक गीते स्वरचित आहेत. धालो गीताचा उगम निरक्षर असला तरी ही लोक गीते बोली भाषेतून म्हणजेच कोकणी व मराठीतून आहेत.. गीतातून सामाजिक एकता, निसर्ग, देवदेवतांच्या कथा, धर्म, भाषा, संस्कृतीचे दर्शन घडते.
शिकार: शिकार करणे हाही धालो खेळण्याचा प्रकार आहे सावज मिळावे म्हणून बायका मांडातल्या गुरूला प्रदक्षिणा घालतात. शिकार करण्याचा अभिनय बायकाच करतात. हे काम ब्राह्मण पती-पत्नीने करावयाचे असते. भिल्ले भिल मोरा, पादरी माझा भुकेला, पादरीच्या गळ्यात सरपळी, पादरी नाचता गोंयच्या हारीर
सावजा मारली एकशें बारा असे म्हणत पाच प्रदक्षिणा काढल्यानंतर सावज मिळते. यात सावज बनण्याचे काम मात्र एखादा पाच सहा वर्षांचा अशक्त मुलगा करतो. त्याला कांबळीत लपवून ठेवतात. सावज मिळाले म्हणून बायका आनंदाने धुंद होऊन नाचत नाचत मांडात घेऊन येतात. संपूर्ण धालोत्सवाशी पुरुषाचा संबंध एवढाच आहे.
अभिनय: धालोत्सवातून महिलांना त्याच्या अभिनय कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. या अभिनयातून महिला समाजप्रबोधनाचे काम देखील करतात. धालोत्सवात होणारे अभिनय पुढील प्रमाणे. मोरुला - मोराचा अभिनय करते व मोरासारखी नाचते., घोणीचा - घोणी हा एक पक्षी आहे. तिची पिल्ले हरवतात. यात आई पिल्लांना शोधत बायकांच्या घोळक्यात येते व विचारते माझी घोणाची पिल्ले आहेत का? व ती आई शोधते. बायका तिला चकवा देतात. अखेर आईला तिची पिल्ले मिळतात व ती आनंदाने घरी जाते.
नवरानवरीचा अभिनय - लग्नप्रकारात एक स्त्री नवरा होते तर दुसरी स्त्री नवरी होते. मुंडावळ्या बांधून नवरा नवरीची वरात सगळीकडे फिरते अन्य लोक त्यांना आहेर देतात. वरात तुळशीपाशी येते देवाला नमस्कार केला जातो. अशाप्रकारे लग्नसोहळा साजरा केला जातो याचा उद्देश घरातील नववधूने सासरच्या लोकांची काळजी घ्यावी व सुखाने नांदावे हा उद्देश त्या मागे असतो. पिंगळी अभिनयात प्रमुख मांडकरी बाई डोक्याला फेटा बांधून पिंगळी बनून येते. तिच्या एका हातात मुसळ तर दुसर्या हातात तांब्या असतो. ती वाड्यावर गाणे म्हणत फिरते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.