Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: फातोर्डाचे बाबू प्रभारी

Khari Kujbuj Political Satire: फातोर्डा फॉरवर्डच्या स्पर्धेला केवळ फातोर्डातीलच नव्हे, तर मडगाव व परिसरातील लोक सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे भविष्याचा विचार करता ही गोष्ट आपल्याच फायद्याची ठरू शकते, या विचाराने विजयबाब खूषच झाले असतील, अशी कुजबूज सुरू होती.

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डाचे बाबू प्रभारी

भारतीय जनता पक्षाने आपल्‍या मतदारसंघातील प्रभारी नव्‍याने जाहीर केले असून मडगावचे प्रभारी म्‍हणून माजी खासदार विनय तेंडुलकर यांची नियुक्‍ती केली असून फातोर्डाचे प्रभारी म्‍हणून माजी उपमुख्‍यमंत्री बाबू कवळेकर यांना नेमले आहे. वास्‍तविक या दोन्‍ही मतदारसंघात भाजपला आपले पंख पसरायला बरीच संधी आहे. त्‍यामुळे मतदारांचा कल जाणणाऱ्यांना प्रभारी केले असते, तर भाजपला त्‍याचा फायदा झाला असता. पण ज्‍या फातोर्डाशी बाबू कवळेकर यांचे काही देणेघेणेही नाही, त्‍यांना या मतदारसंघाचे प्रभारी करणे, यामागे भाजपचे नक्‍की राजकारण काय आहे, हे मात्र कळू शकले नाही. ∙∙∙

विजय खूष हुआ

फातोर्डा फॉरवर्डने आयोजित केलेल्या कृष्णविजय उत्सव तथा नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारोच्या संख्येने लोकांची उपस्थिती सुद्धा आनंददायी होती. ही स्पर्धा यशस्वी झाली, असेच म्हणावे लागेल. सॉलिड पार्टीने आयोजित केलेल्या नरकासुर स्पर्धेला त्यामानाने कमी प्रतिसाद लाभला, असेच म्हणावे लागेल. फातोर्डा फॉरवर्डच्या स्पर्धेला केवळ फातोर्डातीलच नव्हे, तर मडगाव व परिसरातील लोक सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे भविष्याचा विचार करता ही गोष्ट आपल्याच फायद्याची ठरू शकते, या विचाराने विजयबाब खूषच झाले असतील, अशी कुजबूज सुरू होती.∙∙∙

दीपनगर-कुर्टीत अंदाधुंदी

कुर्टी-खांडेपार पंचायतीने हिंदू, ख्रिश्‍चन व मुस्लीमधर्मीयांना सोयीस्कर व्हावे, यासाठी स्मशानभूमीची सोय केली आहे. मात्र कांही नतद्रष्टांकडून या स्मशानभूमीत अंदाधुंदी व्यवहार केला जात असल्याची तक्रार आहे. अर्थातच पंचायतीने पोलिसांत तक्रार केली आहे. वास्तविक कुर्टी भागातील लोकांना अंत्यविधीसाठी फोंडा पालिकेच्या मुक्तिधामामध्ये धाव घ्यावी लागते. त्यामुळे एक चांगली सोय पंचायतीने उपलब्ध करून दिली, तरी त्याचा चांगला फायदा घेण्याची मानसिकता येथील काही नागरिकांची नाही, हेच स्पष्ट होत आहे. दीपनगर येथील अंदाधुंदी व्यवहार सर्वश्रुत आहे. मात्र सरकारी खात्यांकडून अशा प्रकारावर त्वरित कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही, अशा सूज्ञ नागरिकांच्या तक्रारी आहेत. ∙∙∙

अन्य खटल्यांबाबत सगळ्यांचीच अनास्था

आठ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर अखेर सभापतींनी निवाडा दिला आहे. आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाईल, असे संकेत मिळत आहेत. पण मुद्दा तो नाही, सभापतींनी प्रदीर्घ काळ या याचिकेवर सुनावणी घेतली नाही, असा शीण संबंधित काढत आहेत. पण महत्त्वाचे म्हणजे विलंब झालेला असला तरी याच विधानसभेच्या कार्यकाळात निवाडा झाला हेही नसे थोडके. अपात्रता याचिकेचेच कशाला विविध न्यायालयात पडून असलेल्या खटल्यांची स्थिती वेगळी नाही, असे तेथील संबंधित म्हणतात. अनेक खटले तर आता तेथे अशील म्हणून उपस्थित रहाणाऱ्यांच्या आजोबा वा पणजोबांच्या काळातील आहेत. पण त्यांचे कोणालाच काही वाटत नाही. हे खटले असे पडून का आहेत? तेही कोणी विचारत नाही. अपात्रता याचिकांवरील सुनावणीबाबत संबंधित ज्या पोटतिडकीने भावना व्यक्त करतात, तीच पोटतिडीक न्यायालयात पिढ्यान पिढ्या पडून असलेल्या खटल्यांबाबत का दाखविली जात नाही, अशी विचारणाही ही मंडळी करत असतात. एक खरे की सत्तेवर कोणीही असला तरी अशा प्रकरणांतील स्थितीत कोणताच फरक पडलेला नाही. त्यातही समाधानाची बाब म्हणजे चोडणकर यांना याच विधानसभा कार्यकाळात काय तो निवाडा मिळाला. ∙∙∙

आळस नडला

गोमंतक भंडारी समाजाची निवडणूक गाजू लागली आहे. प्रत्यक्ष मतदानास अवधी असला तरी मतदार यादीतून गायब झालेली नावे चर्चेची ठरली आहेत. संघटनेकडून मतदार यादी जाहीर झाली. तेव्हा ती तपासून आपली नावे त्यात आहेत की नाहीत, हे पाहण्याची दक्षता घेण्याबाबतचा आळस अनेकांना आता नडला आहे. या प्रश्न आता कायदेशीर लढाई होणार की निवडणुकीतच लढाई होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संघटनेच्या धुरीणांकडून तेव्हा यादी का तपासली नाही असा केला जाणारा युक्तिवाद सध्या बिनतोड ठरत आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असणाऱ्यांना तो झोंबू लागलेला आहे. ∙∙∙

आमदारांची पाठ

हरमल येथे शनिवारी भू-रुपांतर विषयक बैठक झाली. वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा वाट वाकडी करून पेडण्यात पोचले, असे असले तरी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर हेही बैठकीला पोचले नाहीत. एवढेच कशाला माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनाही त्यांच्याच गावात बैठक होऊन बैठकीला जाणे शक्य झाले नाही. बैठक झाल्याची चर्चा झाली, तेवढीच चर्चा या आमदार व माजी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीची होत आहे. यांनी पाठ फिरवण्यामागे कोणते कारण दडले असावे, याची सोयीस्कर अर्थ जो तो लावू लागला आहे. बैठकीत गेल्यास आपणाला कोणाला जाब द्यावा लागेल, अशी भीती कोणाला वाटली असावी, याची रंजक चर्चा कानावर पडू लागली आहे. भू-रुपांतराविषयी या बैठकीला उपस्थिती बेताची असली तरी ती अपेक्षेनुसार गाजू मात्र लागली आहे.

नेत्यांना समजले पाहिजे ना!

सभापती व आदिवासी समाजाचे नेते रमेश तवडकर यांनी भगवान बिर्सा मुंडा गौरव यात्रेचे पेडणे ते काणकोण दरम्यान १५ ते २०नोव्हेंबर दरम्यान रॅलीचे आयोजन केले आहे. उटातर्फेसुद्धा उटा प्रेरणा यात्रेचे आयोजन केले आहे. तवडकर हे सुद्धा उटाचे एक नेते आहेत. मात्र उटाच्या कोणत्याही कार्यक्रमात ते सहभागी होताना दिसत नाही. त्याच प्रमाणे उटाचे नेतेसुद्धा तवडकर यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होताना दिसत नाही. उटाच्या अनेक मागण्या आहेत. जोपर्यंत सर्व नेते एकत्र येत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांचा जोर कमी तर पडणार नाही ना! अशी भिती व्यक्त होताना दिसत आहे. कित्येक हात एकत्र आले, की बळ वाढते, अशा आशयाच्या अनेक कहाण्या सांगितल्या जातात. मग हे या नेत्यांना समजले पाहिजे ना!∙∙∙

...युरी आहे कुठे?

एक काळ होता, ज्यावेळी ज्योकिम आलेमाव आमदार होते, तेव्हा कुंकळ्ळी मतदारसंघांत सुवर्ण काळ होता. प्रत्येक सणाला कुंकळ्ळीत कार्यक्रमाची रेल चेल असायची. सणासुदीला कार्यकर्त्यांना व गरजू मतदारांना ज्योकिम आलेमावकडून भेट मिळायची. आता ज्योकिम पुत्र मात्र वडिलासारखा वागत नाही आणि क्रियाशील नाही, असा सूर मतदारसंघात ऐकायला येतो. दिवाळीत कुंकळ्ळीत युरी आल्यापासून एकही कार्यक्रम झाला नाही. सध्या युरी मतदारसंघात येतच नाही, असे मतदार सांगतात. आमचा आमदार व्हिजिटिंग आमदार बनला आहे, अशी चर्चाही कुंकळ्ळीत रंगत आहे.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT