लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय पातळीवर स्थापन झालेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत आम आदमी पक्षाचा (आप) सहभाग होता. पण निवडणुकीनंतर काहीच महिन्यांत आपने ‘इंडिया’तून माघार घेत, विविध राज्यांतील निवडणुका स्वत:च्या ताकदीवर लढण्याचा निर्णय घेतला. आगामी जिल्हा पंचायत, पालिका आणि विधानसभा निवडणुकाही स्वतंत्ररीत्या लढण्याचा निर्णय घेत, पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल गोव्यात आले आहेत. ते जेथे जेथे सभा घेत आहेत, तेथे तेथे काँग्रेसवर तुटून पडत आहेत. बलाढ्य भाजपला गोव्यात टक्कर द्यायची असेल तर विरोधकांच्या एकीशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात आल्यामुळे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे (आरजी) अध्यक्ष मनोज परब राजी झाले असताना आणि गोव्यातील ‘आप’च्या नेत्यांनाही ते माहीत असताना केजरीवालांनी ‘एकला चलो’ची भूमिका का घेतली असावी? असा प्रश्न त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत. ∙∙∙
‘अन्न, वस्त्र आणि निवारा’ या माणसाच्या तीन मूलभूत गरजा असे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. आता आपल्या गरजा वाढल्या, मात्र आजही आपल्या समाजात मूलभूत गरजांपासून वंचित असलेले अनेक लोक आहेत. केंद्र सरकारने निराधारांसाठी ‘अटल आसरा’ नावाची योजना सुरू केली होती. कदाचित राज्यात ती यशस्वी झाली नाही. म्हणून माजी सभापती व विद्यमान मंत्री रमेश तवडकर यांनी ‘श्रमधाम’ ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत अनेक बेघरवाल्यांचे घराचे स्वप्न पूर्ण केले. केवळ काणकोण तालुक्यातच नव्हे तर गोविंद गावडे यांच्या मतदारसंघात आणि आता नीलेश काब्राल यांच्याही मतदारसंघात तवडकर यांनी श्रमधाम योजना सुरू केली. श्रमधामातून समाजकारण आणि समाजकारणातून राजकारणापर्यंत तवडकरांचा प्रवास उल्लेखनीय असाच म्हणावा लागेल. ∙∙∙
शब्द हे धारदार शस्त्रासारखे असतात. शब्दांमध्ये एकाला कापण्याची शक्ती असते तसेच जोडण्याची क्षमता असते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परवा गोव्यात येऊन गेले. त्यांच्या हस्ते ‘माझे घर’ योजनेचे लोकार्पण झाले. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात शहा यांचे भाषण गाजले ते एका वाक्यामुळे व ते म्हणजे ‘‘गोमंतकीयांना संध्याकाळी जास्त वेळ थांबविणे योग्य नाही. श्याम के वक्त गोवा के लोगों का मूड बनता है’’. विरोधकांनी शहा यांच्या वाक्याचा भलताच अर्थ काढला. संध्याकाळी मूड बनतो म्हणण्याचे धाडस शहा यांना कसे झाले? एवढेच नव्हे तर माजी खासदार रमाकांत खलपांच्या मुलाने सोशल मीडियावर या वक्तव्याचा निषेध केला. ‘माझे घर’पेक्षा ‘मूड बनता है’ हेच सोशल मीडियावर गाजले व गाजत आहे. आता शहा यांना काय म्हणायचे होते हे कदाचित विरोधकांना समजले असणार म्हणूनच ते गोमंतकीय संस्कृतीचे दाखले देऊन त्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र शहा यांनी जे वक्तव्य केले ते भाजप समर्थकांना उद्देशून केले होते. त्यावर विरोधकांना उत्तेजित होण्याची काय गरज? ती शनिवारची सांज होती. शहा यांना माहीत असणार की आपल्याकडे ‘सॅटर्डे नाईट कल्टुर’ आहे. काही का असेना, शनिवारचा खराच मूड बनला बुवा. ∙∙∙
सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत हे सिनेप्रेमीही आहेत. सिनेमा पाहण्याची आपली आवड त्यांनी रविवारी मडगावात मल्टिप्लेक्स थिएटर उद्घाटनावेळी उघड केली. पूर्वीच्या ‘सिने विशांत’ थिएटरमध्ये आता दोन मल्टिप्लेक्स थिएटर्स सुरू करण्यात आली आहेत. रविवारी त्यांचे लोकार्पण झाले. यावेळी कामत यांनी बोलताना, ‘‘ज्या दिवशी पहिल्यांदा सिने विशांतचे उद्घाटन झाले होते, त्यावेळी ‘कश्मीर की कली’ हा हिंदी सिनेमा लावला होता. रात्रीचा शो आपण बघितला होता. मडगावच्या दिंडी उत्सवावेळी पूर्वी आपण ‘सिने लता’मध्ये जाऊन सिनेमा बघत होतो’’ असे सांगून आपल्या पूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला. आमचे बाबा ग्रेटच हो...अशी चर्चा नंतर कामत कार्यक्रम आटपून गेल्यानंतर उपस्थितांमध्ये सुरू होती. ∙∙∙
एखाद्या राजकीय पक्षावर किंवा नेत्यावर टीका केली म्हणजे जनतेचे मत परिवर्तन होईलच असे नाही. विश्वासार्हता महत्त्वाची असते. परंतु अशी विश्वासार्हता किती नेत्यांमध्ये आणि किती पक्षांमध्ये दिसून येते, हा संशोधनाचा विषय. ‘आप’चे संयोजक तथा राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात आल्यावर भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिहल्ला चढविला. अशा आरोप-प्रत्यारोपांमुळे केवळ जनतेची करमणूक होऊ शकते. त्यामुळे नेत्यांना कोठे टीका करायची, कोठे काय बोलायचे हे लक्षात असले पाहिजे, तरच तो राजकारणात पाय रोवून उभा राहू शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांना केजरीवालनी मार्गदर्शन केले असते तर बरे झाले असते. ते निश्चित पक्षासाठी फायदेशीर ठरले असते. काँग्रेसवर म्हणजे विरोधी पक्षातील एक घटकावर टीका करून त्यांना काय साध्य करायचे आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईलच. ∙∙∙
खरा स्वयंसेवक कसा असतो, हे उत्पल पर्रीकरांनी दाखवून दिले. संघाच्या कार्यक्रमात संघाचा गणवेश घालून अगदी सामान्य स्वयंसेवकांसोबत ते जमिनीवर बसले होते. कसलाही बडेजाव नाही, कसला व्हीआयपी कट्टा नाही. त्यांना गणवेशात बघितल्यावर ‘हा माणूस आपला आहे, संघाचा आहे’ असे स्वयंसेवक बोलू लागले. नुसतं ‘मी संघाचा आहे’ असं बोलून होत नाही तर प्रत्यक्ष आचरण आणि सहभाग महत्त्वाचा असतो. उत्पल यांनी ते दाखवून दिलं. या कार्यक्रमात तेच खरे स्वयंसेवक शोभून दिसले. ∙∙∙
गुलालोत्सवाला आझाद मैदानात कोणते नेते आले, याची चर्चा काही काळ चालते. परंतु आता आझाद मैदान काही काळ चर्चेत राहणार आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विजयादशमी उत्सवामुळे. कारणही तसेच...आरएसएसचा कार्यक्रम आणि त्यास मंत्री बाबूश मोन्सेरात यांची उपस्थिती म्हटल्यावर अनेकांचे डोळे विस्फारले जाणारच. शिवाय मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी संघाच्या गणवेशात संचालनाला लावलेली उपस्थिती. दोन्ही राजकीय विरोधक आरएसएसच्या कार्यक्रमानिमित्त आझाद मैदानावर उपस्थित होते. त्यांना आरएसएसच्या विचारांचा वारसा आहे, परंतु बाबूश यांची उपस्थिती मात्र आश्चर्याचा धक्का देणारीच ठरली. ∙∙∙
मंत्रिपद म्हणजे गाजर असल्याचे उद्गार माजी सभापती तथा विद्यमान मंत्री रमेश तवडकर यांनी काढले. आपण जेव्हा सभापती झालो त्यावेळी कार्यकर्ते हिरमुसले. पण आपण दिलेल्या पदाचा योग्य वापर करताना या पदाला शान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला, असे फोंड्यातील एका कार्यक्रमावेळी बोलताना रमेशबाब म्हणाले. आता मंत्रिपद कोणत्या अर्थाने गाजर आहे हे सर्वांना माहीत आहे, पण मंत्रिपदाचा वापर केवळ स्वहितासाठी न करता सर्वांना त्याचा लाभ व्हावा यासाठी करावा, असे जनतेचे म्हणणे आहे. रमेशबाबना ते चांगले जमते, बरोबर ना! ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.