पणजी: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या क्लबला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेला शुक्रवारी ४० दिवस पूर्ण झाले. या दुर्घटनेत २५ निष्पाप जीवांचा बळी गेला, काही आगीत होरपळले तर काही गुदमरून मेले.
मात्र, इतक्या दिवसांनंतरही "या मृत्यूंना जबाबदार नेमके कोण?" या प्रश्नाचे उत्तर सरकारला मिळालेले नाही. आज परिस्थिती अशी आहे की, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याऐवजी सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासन एकमेकांवर बोट दाखवण्यातच धन्यता मानत आहेत. त्यामुळे हे 'अग्निकांड' नसून 'आरोप-प्रत्यारोप कांड' बनल्याची संतप्त भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी दंडाधिकारी समिती नेमली आणि अहवाल तयार केला. मात्र, तो अद्याप खुला केलेला नाही. तसेच ज्या विभागांनी या क्लबला परवानग्या दिल्या, त्याच विभागांचे अधिकारी चौकशी समितीत असल्याने "स्वतःची चूक स्वतःच कशी शोधणार?" असा सवाल लोक विचारत आहेत.
भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत १०५, १२५, १२५(ए), १२५(बी) आणि २८७ सह ३(५). हणजूण पोलिस स्थानकात गुन्हा नोंद.
सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुरू आहे. न्यायालयाने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेतल्याने आता तांत्रिक बाबींवर सखोल चौकशी सुरू आहे. प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर 'गोलमाल' सुरू असला तरी, न्यायालयाकडून मात्र पीडितांना न्याय मिळेल आणि खरे सूत्रधार गजाआड जातील, अशी खात्री आहे.
तारीख आणि वेळी - ६ डिसेंबर २०२५ रात्री ११.४५ वाजता
मृतांची संख्या - २५ (२० कर्मचारी आणि ५ पर्यटक)
पाडकामाच्या नोटिशीला बेकायदेशीरपणे स्थगिती दिल्याने तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर निलंबित.
पर्यावरणाचे नियम डावलून परवाना दिल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तत्कालीन सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो निलंबित.
कर्तव्यात कसूर आणि बेकायदेशीर परवान्याला सहकार्य केल्याने पंचायत सचिव रघुवीर बागकर बडतर्फ.
पंचायत सरपंच रोशन रेडकर अपात्र.
क्लबच्या तपासणीत व अहवालात त्रुटी ठेवल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोन अधिकारी निलंबित.
सरकार पक्ष, एजींचे म्हणणे
ही सर्वस्वी पंचायतीची चूक आहे. सरपंचांनी बेकायदेशीर सह्या केल्या आणि सचिवाने कारवाई केली नाही, असे म्हणत कोर्टात सरकारने पंचायतीकडे अंगुलीनिर्देश करत हात झटकण्याचे प्रयत्न केले आहेत. तूर्त पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांचे निलंबन, सरपंचाला अपात्र आणि सचिवांची बडतर्फी करण्यात आलीय.
अपात्र सरपंच रोशन रेडकर
तांत्रिक बाबी तपासणे हे सचिवांचे काम आहे. केवळ मीच नाही, तर संपूर्ण पंचायत मंडळाने ठराव घेऊन परवानगी दिली होती. मग केवळ मलाच दोषी का धरले जाते? असा सरपंचाचा प्रश्न आहे.
बडतर्फ सचिव रघुवीर बागकर
मी फक्त सरकारी अधिकारी आहे. पंचायत मंडळाने घेतलेले निर्णय अमलात आणणे हे माझे काम आहे, अन्य कोणतेही अधिकार माझ्याकडे नाहीत, असे सांगत त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. सरकारच्या योजना, लोकांचे अर्ज बैठकीत सादर करणे आणि पंचायत मंडळाची बैठक व ग्रामसभा ठरविण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत.
आमदार मायकल लोबो
पंचायतीने आपल्या अधिकाराबाहेर जाऊन 'नाईट क्लब' चालवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले. पंचायतीला केवळ रेस्टॉरंटचा परवाना देण्याचा अधिकार होता, तर नाईट क्लबसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी आवश्यक असते.
सौरभ लुथरा : क्लबचा मुख्य मालक. दुर्घटनेनंतर थायलंडला पळून गेला होता, तिथून त्याला पकडून भारतात आणले.
गौरव लुथरा : सौरभचा भाऊ आणि सह-मालक. यालाही थायलंडमध्ये ताब्यात घेऊन भारतात आणले.
अजय गुप्ता : नाईट क्लबचा तिसरा भागीदार/गुंतवणूकदार. दिल्लीत एका खाजगी रुग्णालयात लपला असताना पोलिसांनी त्याला अटक केली.
राजीव मोदक : चीफ जनरल मॅनेजर. दैनंदिन कामकाजासाठी आणि सुरक्षिततेच्या अभावासाठी जबाबदार धरले गेले.
विवेक सिंग : जनरल मॅनेजर. घटनास्थळी व्यवस्थापनात त्रुटी ठेवल्याचा आरोप.
राजवीर सिंघानिया : मॅनेजर. सध्या सशर्त जामीनावर बाहेर आहे.
प्रियांशू/रियांशू ठाकूर : गेट मॅनेजर. आपत्कालीन वेळी लोकांना बाहेर काढण्यात अपयशी ठरल्याचा आरोप. सध्या सशर्त जामीनावर बाहेर आहे.
भारत कोहली/सिंग : दिल्लीत कार्यरत असलेला कर्मचारी, ज्याचे नाव तपासात समोर आले. सध्या सशर्त जामीनावर बाहेर आहे.
विजय कुमार सिंग : ऑपरेशन्स मॅनेजर, ज्याला जानेवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात अटक करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.