Arambol News Dainik Gomantak
गोवा

Arambol: हरमल प्रकरणात मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न? 2 पोलिसांच्या बदलीमुळे स्थानिक संतप्त

Arambol Local Protest: हरमल येथील वेश्‍या व्यवसायाच्या विरोधात स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत १३ पीडित मुलींना पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हरमल येथील वेश्‍या व्यवसायाच्या विरोधात स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेत १३ पीडित मुलींना पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर पोलिस प्रशासनाने याप्रकरणी दोघा पोलिसांची बदली केली असली, तरी ही केवळ धूळफेक असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

याप्रकरणी हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोझा म्हणाले, की ज्या दोन पोलिसांची बदली केली, ती केवळ लोकांना शांत करण्यासाठी आहे. मुख्य दोषी अजूनही पदावर आहेत. पोलिसांचे कॉल रेकॉर्ड तपासले तर सत्य बाहेर येईल.

प्रशासनाने यावर स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू. याप्रकरणी विद्यमान सरपंच सुशांत गावडे यांनीही, आम्ही हरमलवासीयांसोबत असून २० फेब्रुवारीच्या बैठकीत या विषयावर कठोर भूमिका घेणार असल्याची माहिती दिली.

प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या हरमल परिसरात फोफावलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाने आता गंभीर वळण घेतले आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलिस प्रशासन कारवाई करत नसल्याने अखेर स्थानिकांनी स्वतःच पुढाकार घेत या दलदलीतून १३ पीडित मुलींची सुटका केली.

मात्र, या प्रकरणात केवळ दोनच कनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करून मुख्य दोषींना वाचविले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.डिसेंबर महिन्यापासून हरमलच्या ग्रामस्थांनी पोलिस महासंचालक, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक आणि पेडणे पोलिस उपअधीक्षक आणि पंचायतीला पुराव्यांसह निवेदने दिली होती.

‘अरंबोल एस्कॉर्ट सर्व्हिस’सारख्या संकेतस्थळांचा वापर करून उघडपणे हा व्यवसाय सुरू असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:

केवळ बदली नको, तर निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिस निरीक्षक आणि उपअधीक्षकांवर कठोर कारवाई व्हावी.

मोरजी ते केरीदरम्यान रात्रीच्या वेळी महिला पोलिसांसह कायमस्वरूपी गस्त वाढवावी.

मसाज पार्लरच्या नावाखाली चालणारे अड्डे आणि ऑनलाईन वेबसाईट्स चालवणाऱ्या दलालांना तात्काळ अटक करावी.

पाच विदेशी महिलांना अटक

वेश्या व्यवसायप्रकरणी ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या विदेशी पाच महिलांना मांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. मांद्रे पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ‘आयआरबीएन’च्या लेडी प्लाटूनसह खालचावाडा-हरमल येथे ही कारवाई केली. सँड्रा नामवाजे, मार्गेट क्याकुवाडे, झहारा नासांगा, फियोना मुबेझी आणि शनिता या महिला ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्याकडे वैध कागदपत्रे नव्हती. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक आणि एफआरआरओ पणजी यांची परवानगी घेतल्यानंतर त्यांना म्हापसा डिटेंशन सेंटरमध्ये पाठविले.

पोलिस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात

हे प्रकरण चिघळल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा देखावा करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल राजेश शिरगावकर आणि पोलिस कॉन्स्टेबल सर्वेश मांद्रेकर यांची पर्वरी येथील जिल्हा राखीव दलात बदली केली आहे. मात्र, स्थानिकांच्या मते हा केवळ ‘डोळ्यांना पाणी पुसण्याचा’ प्रकार आहे.

ग्रामस्थांनी पुराव्यासह पोलिसांना सांगितले होते, की ऑनलाईन संकेतस्थळांवर तरुणींचे फोटो आणि मोबाईल नंबर उघडपणे उपलब्ध आहेत. नोकरीच्या बहाण्याने परप्रांतीय आणि अल्पवयीन मुलींना येथे आणून बळजबरीने वेश्‍या व्यवसायात ढकलले जाते. रात्री ८ वाजल्यानंतर किनाऱ्यावर हा प्रकार उघडपणे चालतो, ज्याचा फटका पर्यटनाला बसत असून गावाचीही बदनामी होत आहे.

हरमलवासीयांना पडलेले प्रश्न

1.या गैरप्रकाराला संबंधित पोलिस ठाण्यातील निरीक्षक आणि उपअधीक्षक जबाबदार आहेत. विभागाच्या प्रमुखांवर कारवाई होण्याऐवजी केवळ खालच्या दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा बळी दिला जात आहे. मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई का नाही?

2. या स्कँडलमध्ये आणखी दोन पोलिस कर्मचारी सामील असल्याची खात्री स्थानिकांना आहे. जर या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले, तर दलाल आणि पोलिसांचे लागेबांधे उघड होतील, असा दावा रहिवाशांनी केला आहे. हे रेकॉर्ड तपासून ते उघड केले जाईल का, असा प्रश्न आज पोलिसांना केला जात आहे.

जे निवेदन स्थानिकांनी पोलिसांना दिले होते, ते आम्हाला हल्लीच मिळाले आहे. त्यामुळे या वेश्‍या व्यवसायासंदर्भात फारसे काही माहीत नव्हते. हरमल गावात जेथे जेथे मसाज ‘स्पा’ आहेत, अशा सर्वच ठिकाणी जाऊन तेथे काय चालते, ते आता तपासणार आहोत. २० फेब्रुवारी रोजच्या बैठकीत याविषयी कठोर भूमिका घेण्यात येईल.

- सुशांत गावडे, सरपंच, हरमल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dodamarg: दोडामार्गमध्ये ‘बाहुबली’-‘गणेश’ हत्तींमध्ये जुंपणार युद्ध? केर परिसरात 7 हत्तींचा वावर; वनविभागासमोर मोठे आव्हान

Horoscope: नव्या संधी मिळणार! 'या' राशींसाठी आजचा दिवस जगात भारी; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

SCROLL FOR NEXT