SADANAND SHET TANAVADE Dainik Gomantak
गोवा

मंत्री आज आहे, उद्या नसेल, पक्ष कायम राहणार; बेशिस्तीविरोधात भाजप प्रदेशाध्यक्षांचे खडे बोल

Goa Politics: राज्यभर दौरे केल्याने कोणी मुख्यमंत्री होणार नाही. भाजपने मनात आणले तर असे दौरे आम्ही एकाच दिवसात सगळीकडे करू शकतो.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कोणीतरी मंत्री काहीतरी बोलतो. तो मंत्री म्हणजे भाजप संघटना नव्हे. मंत्री आज आहे, उद्या नसेल; पण पक्ष कायम राहणार आहे. पक्ष आहे म्हणून सरकार आहे. त्यामुळे सर्वांनी पक्षशिस्त पाळणे बंधनकारकच आहे, असे खडे बोल भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेमध्ये सुनावले.

यावेळी तानावडे यांच्यासोबत वास्कोचे आमदार कृष्णा साळकर होते. सध्या आमदार-मंत्री यांच्या वक्तव्यातून सारे काही आलबेल नसल्याचा संदेश जनतेपर्यंत जात आहे, याकडे तानावडे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, पक्ष कार्य कार्यकर्त्यांच्या बळावर चालते.

पक्षाला जनसंवेदनांची दखल घ्यावी लागते. एखादा निर्णय जनतेला आवडणारा नसेल, तर तो बदलावा लागतो. लोकशाहीत जनता सर्वोच्च असते. तिचेच सर्वांना ऐकावे लागते. मंत्र्यांना काय वाटते, हा मुद्दा त्याचमुळे गौण ठरतो. कोणी एकमेकांची उणीदुणी जाहीरपणे काढू नयेत, असे संकेत आहेत आणि प्रत्येकाने ते पाळलेच पाहिजेत.

विधेयके मागे घेण्याची नामुष्की, असे म्हणता येणार नाही. एखादा विषय जनतेला अप्रिय असेल किंवा विधेयकांमधील तरतुदी या जनभावनांविरोधी असतील तर ती विधेयके मागे घेण्यात काहीच हरकत नाही. शेवटी जनतेला काय हवे, याचाच विचार सरकारला करावा लागतो. बहुमताच्या बळावर विधेयके मंजूर करणेही योग्य नव्हे. पक्षाला निवडणुकांना सामोरे जावे लागत असल्याने या भावनांची दखल घ्या, असेच पक्षाचे सरकारला सांगणे असते.

२०२७ मध्ये भाजपचेच सरकार

राज्यभर दौरे केल्याने कोणी मुख्यमंत्री होणार नाही. भाजपने मनात आणले तर असे दौरे आम्ही एकाच दिवसात सगळीकडे करू शकतो. ‘मुंगेरीलाल हे हसीन सपने’ बघण्याची सवय काहीजणांना लागली आहे. दक्षिण गोव्याची एक जागा आम्ही गमावली, याचा अर्थ २०२७ मध्ये आम्ही जिंकणार नाही, असा होत नाही. जनता २०२७ मध्ये भाजपचेच सरकार आणणार आहे, असेही तानावडे यांनी ठणकावून सांगितले.

‘त्यांचे’ कर्म पुराव्यासह उघड करू

भू-रूपांतराबाबत सरकारवर होत असलेल्या आरोपांकडे लक्ष वेधले असता तानावडे म्हणाले की, काही दिवस द्या. आरोप करणाऱ्यांनी काय कर्म केले आहे ते पुराव्यासह उघड करेन. सध्या पुरावे हातात नसल्याने त्यांचे नाव घेऊन बोलत नाही. पण यापुढे नाव घेण्यास मी कचरणार नाही. आरोप करणे सोपे असते; पण आपणही काय करून ठेवले आहे, याची माहिती प्रत्येकाने जरूर ठेवली पाहिजे.

मंत्रिमंडळ बदलाविषयी चर्चा नाहीच!

राज्य मंत्रिमंडळात लोकसभा निवडणुकीमुळे बदल होऊ शकले नाहीत. आता पक्ष नेतृत्व चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. त्यामुळे फेरबदलाचा विषय चर्चेला आलेला नाही. मंत्रिमंडळ फेरबदल हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी ते याची माहिती पक्षाला देतीलच. अजून त्यांनी पक्षाशी चर्चा केलेली नाही, असे तानावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT