प्रश्‍न आयआयटीचा, प्रवास मेळावलीचा... 
गोवा

प्रश्‍न आयआयटीचा, प्रवास मेळावलीचा...

मधू य. ना. गावकर

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनामुळे माझा पर्यावरणीय प्रवास बंद होता. नेहमीप्रमाणे सकाळी अंदाजे आठ वाजता शेजारच्या वर्तमानपत्र विक्रेत्याकडे वर्तमानपत्र आणण्यासाठी जात होतो. रस्त्यावर पोहचताच एक मोटारगाडी माझ्या पुढ्यात थांबली आणि गाडीतून आवाज आला, मधू कसे आहात? गाडीत पहाताच आपचे एल्विस गोम्स, प्रदीप पाडगावकर आणि सुनिल सिंगणापूरकर दिसले. आज सकाळी कैक दिवसांनी इकडून कुठे निघाला म्हणून चौकशी केली. म्हणाले, मेळावली - सत्तरीला जातोय. आयआयटी प्रकल्पाची जागा पाहाणी करण्यास जातो आहोत. मी त्यांना हळूच म्हटलं,  मला पण त्या ठिकाणी जायचे होते, पण कोरोना आडवा आला आहे. त्यावर एल्विस म्हणाले, आमच्या बरोबर चल, पटकन घरी जाऊन ये, मी पळत घरी जाऊन सदरा चढवला आणि परतून त्यांच्या गाडीतून सावईवेरे, वाघुर्मे खांडेपार उजगाव गुळेली, मेळावली गाठली. प्रवासात सर्वांनी तोंडाला कपड्याच्या चिंध्या बांधल्या होत्या. शिवाय मौनतपश्‍चर्या बाळगली होती. 

मेळावलीत पोहचताच प्रथम शुभम शिवलकरांचे घर गाठले, त्यांनी शशिकांत सावर्डेकर, गौतम मेळेकर, सतीश मेळेकर, कनेश गावकर, सड्यो मळेकर आणि आनंद मळेकर यांना बोलावून घेतले. प्रत्येकाने तांडाला सफेद अगर हिरवा कपडा बांधला होता. इतकी कोरोनाची भीती माणसाला झाली आहे. ते सर्वजण अंतर ठेवून शुभमच्या घराकडे हजर झाले. 

आम्ही म्हणालो आपला मेळावलीचा पठार पहायचा आहे, त्यावर शुभम म्हणाला हा पठार नाही, मेळावलीची ही एक वनराईने नटलेली जैवविविधतेची टेकडी आहे. आमच्या पूर्वजांपासून त्याला आपण सडा म्हणत आलो आहोत, पण पावसाचे दिवस असल्याने सड्यावर जाणे जरा जिकीरीचे होईल. शिवाय एक दिड कि. मी. चढाव आहे. त्यात आपल्यात मधू गावकर वृध्द आहेत, सड्यावर गच्च जंगलातून जाण्यास बरेच त्रास सोसावे लागतील. आता प्रत्येकाच्या हातात काठी पाहिजे, कारण सरपटणारे प्राणी आणि गवे, बिबटे असतात. त्यावर मी म्हटलं जमल नाही तर परतून खाली येईन, पण प्रयत्न करूया, त्यावर सर्वांचे एकमत झाले आणि सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रमाणे अंतर ठेवून आम्ही सड्यावर मार्ग प्रस्थान करण्यास सुरूवात केली. 

आम्ही मेळावली सड्याची चढणी चढू लागलो आणि पावसाने आपली हजेरी लावली. तशात वृक्ष, वेली, झुडपे दूर करीत आम्ही सड्याच्या माथ्यावर जाण्याच्या प्रयत्नात असताना पावसाने जोर धरला, पण आम्ही थांबलो नाही. सड्याच्या उंचाकडे जाताना सुपारी, नारळ, आंबा, फणस आणि इतर झाडे आपले दर्शन देत वाऱ्याच्या झुळकेने झोलत आम्हाला वाकुल्या दाखवत होती. पडणाऱ्या पावसाचे थेंब खाली आमच्या छत्रीवर पडून टपटप असा आवाज देत होते. अंदाजे दोनशे मीटरवर असल्यावर जंगली वनराईला सुरवात झाली. एखाद्या देवराईसारख्या जंगलाला आता खरी सुरवात झाली. जाताना पुढे चालणारा माणूस दिसत नव्हता. इतकी दाट वनराई त्या परिसरात पसरली आहे. माडत, नाना, जांभूळ, किंदळ, घोटींग, मो, सिसम, कुमयो, हासण, फतरफळ, शिवाय त्या झाडावर अनेक प्रकारच्या औषधी वेली, गोडशेरा, गोडवाल, पालकाणे, झिरमुला, फागल, शिरमंडोळी, हरकली अशाप्रकारच्या अनेक वेली त्या झाडांना वेटून त्यांच्या हिरवाईत भर घातलेली पहावयास मिळत होती. शिवाय चार, करवंद, कणेर, चुरन, आममीरी, पिडकोळ हा रानमेवा दाटीने भरला आहे. त्यात सळभाजी, रानसुरण (हे रानडुक्करांचे आवडते खाद्य) ह्या सड्यावर आहे. रानआंबाडा, तिरफळ, कांगल, घागर, कुंफळ अशी औषधी वनस्पती आहे, पावलो पावली जमिनीवर अळंबी उगवणारी वारूळे दिसत होती. चालताना डुक्कर, हरण, मेरु, गवा, ससा या प्राण्यांची विष्टा मला तिथले युवक दाखवित होते. मेळावलीच्या सड्यावरील जंगलात साधारण एक दोन माणसे जाण्यास धजावणार नाहीत, इतके गच्च भरून हे जंगल आहे. जाताना वाटेत कैक वृक्ष सुकून अगर उन्मळून  पडले होते. शिवाय काही वाऱ्याच्या झोताने वाकले होते. 

माझ्या सोबत असलेले दोन युवक म्हणाले, या सड्यावर किंगकोब्रा, कोब्रा, अजगर, म्हांडोळ, धामण, फेरशे, रक्तमांडोळ, हिरवा साप भरपूर आहे. शिवाय डोंगरावरील व्हाळ परिसरात बेडुक, काळे खेकडे, लाल खेकडे, कासव, घोरपड, मुंगूस, शेकरू, खवले मांजर, खेतमाकड अशा प्रकारचे प्राणी वास्तव्यास आहेत. किटक तर न मोजण्या इतके भरले आहेत. या सड्यावरून पावसाळ्यात कैक ओहळ वळणे घेत वहात खाली पायथ्याशी येऊन मोठ्या ओहळास मिळून रगाडा नदीस मिळता. मोठ्या ओहळात पिठ्ठोक, मळ्यो, काडय, सांगळ, थिगुर अशी मासळी सापडते. वायगण शेतात कोंगे हे शंख शिंपले सापडतात. 

ही सारी माहिती घेत आम्ही वळणावळणाने तास दिड तासात सड्याच्या माथ्यावर पोहोचलो. वर चढताना प्रत्येकजण धापा टाकीत होता. मला त्यावेळी केदारनाथ गिरनार खेतलो, सिध्दनाथ, भगवती पठार आठवले. कारण मी ही स्थळे फिरलेलो आहे. शिवाय गोव्यातील बेतुलचा पठार, वेर्णा पठार, वाकवाळ पठार, बांबोळी पठार, कदंब पठार, अडकोण आटयाळ, भुतखांब पठार, सालिगाव पठार, पर्वरी पठार, मावळींगे पठार, ढवळी-तळावली पठार, आडपई पठार, फर्मागुढी पठार, उजगाव म्हारवा सडा, पाकी गिधाड सडा, नावेली मायणी धाट, कुंडणे धाट, सर्वणधाट, पडोशे कुडचिडे पठार, पिर्ण पठार, थिवी पठार तुये पठार, मोपा पठार, चोर्ला सुर्लसडा, कुंडई पठार आणि मडकई पठार ही पठारे प्रत्यक्ष पाहाणी केली आहे. आता आम्ही मेळावली सड्याच्या माथ्यावर पोहोचले. या सड्याला फार मोठा मैदानी भाग नाही. माथ्यावर दोन, तीन कप्प्यात वेगवेगळ्या प्रकारचे तृण उगवून हे कप्पे हिरवेगार दिसतात. त्यात डबक्याप्रमाणे नैसर्गिक तळी निर्माण झाली आहे. त्यात लहान बेडकं होती. मी त्या लहान डबक्यांकडे जाताच बेडके इकडे तिकडे उडू लागली. गवतावर अनेक प्रकारची फुले फुललेली पहावयास मिळाली. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेली सड्यावरील आमची यात्रा दुपार झाली तरी संपत नव्हती, तशात पावसाचा जोर वाढत होता. म्हणतात ना सत्तरीत पाऊस भरपूर पडतो, त्याचा आम्हाला प्रत्यय आला. आमच्याकडे छत्र्या असून काहीच उपयोग झाला नाही. 

या सड्याच्या पायथ्याशी वर्तुळाकार गुळेली, धामसे, खोतोडे, आंबोली, कुंभारवाडा, साकोर्डा आहे. दक्षिण उत्तर रगाडा नदी वहाते, असे आमच्या बरोबर फिरणारे म्हणाले. आम्ही साधारण दहा पंधरा कि. मी. आलटून पालटून सड्याचा परिसर फिरलो, आमच्या अंगाला काटे टोचून कपड्यांची चाळण झाली. सड्याच्या परिसरात स्वच्छ पाण्याच्या सात आठ झरी तळी आहेत, जंगलातील एका तळीला वाघाची तळी म्हणतात, त्या तळीवर हिंस्त्र जनावरे पाणी पिण्यास येतात. सड्यावरून खाली उतरताना गव्या रेड्यांच्या कळपाच दर्शन झाले. मेळावलीचा हा सडा, म्हादई अभयारण्य, मोले महावीर अभयारण्य आणि बोंडला अभयारण्याच्या मध्यभागी असल्याने जनावरांची रहदारी वास्तव्य तिथे जास्त असते, असं स्थानिक म्हणाले. आम्ही सड्यावर जंगलात फिरताना तिटवी आणि शेकरू आपल्या शिट्टीने इतर जनावरांना सावध करीत होती. केवढा त्यांचा आपुलकीचा निसर्ग इशारा हा. बिबटा, गवे, मेरू, चितळ, काळे मांजर, रानडुक्कर, ससे, माकड अशी चार पायांची जनावरे, भूजंग, नाग, धाबण, अजगर, म्हांडोळ हिरवासाप, फुरसे, रक्त मांडोळ, मुंगूस, घोरपड, बेडुक, किटक, खेकडे आणि कैक प्रकारच्या पक्षांचे वसतीस्थान म्हणजे मेळावलीचा सडा हे आम्हाला तिथल्या युवकांनी दाखविले. मात्र, मोठ्या पावसाच्या बरसण्याने आम्ही चिंब झालो आणि खाली परतीची वाट धरली, उतरणीवेळी आम्ही सैनिक शिस्तीने वळणावळणाने खाली परतलो. 

खाली आल्यावर त्या गावच्या युवकांना प्रश्‍न केला? आपल्या मेळावली सडा परिसरात शैक्षणिक आयआयटी प्रकल्प सरकार आणते, म्हणजे आपल्या गावांचा विकास होणार, युवकांन नोकऱ्या मिळणार, सत्तरीतील मुलांना उच्च शिक्षण मिळणार. शिवाय ही दहा बारा लाख चौ. मी. जमिन सरकारी मालकीची आहे. मग आपला विरोध का? त्यावर त्यांनी माझ्यावर प्रतिप्रश्‍नांची सरबत्ती केली. 

ते म्हणतात, आम्हा परिसरातील लोकांना सरकार विश्‍वासात न घेता एवढा मोठा प्रकल्प कसे काय आणू शकते? गावची ग्रामसभा नाही अगर जनसुनावणी न घेता सरकार शैक्षणिक प्रकल्प आणू शकते काय? सडा पठाराच्या परिसरातील लोक म्हणजे भटकी जमात आहे काय? आमचे पूर्वज शेकडो वर्षांपूर्वी इथे आले आणि सड्याच्या परिसरातील जमीन शेती, बागायती निर्माण केली. आज कैक पिढ्यांनी इथे घाम गाळला, रक्त आटवले आणि पुढील पिढ्यांकडे या जमिनीचा ताबा देवून इहलोकी गेले. आज या जमिनी आम्ही कसत आहोत. आमचे वडील, आजोबा शिकले नाही म्हणून या जमिनी आमच्या नावे सर्व्हे नोंदणी झाली नाही. जे शिकलेले होते, त्यांनी आपल्या नावे सर्व्हे नोंद केली. आमचे पणजोबा, आजोबा, वडिलांनी ही जमीन कसून भात, नाचणी, पाकड, वरी, कांज, कुळीथ, उडिद पिकवून त्या अन्नावर आम्ही मोठे झालो. काराना, कणगी, अळुमाडी, भोपळा, भेंडी, काकडी, टरबूज आम्ही खाल्ले. सड्यावरून पायथ्याशी वाहणारे ओहोळ, झरी, तळीच्या पाण्यावर वायंगण शेती, कुळागरे वसवून सुपारी, नारळ, केळी, मिरी, अननस, फणस, आंबा लागवड करून त्या उत्पन्नावर कुटुंबाचा संसार चालवला. आज हा प्रकल्प इथे आला आणि त्यावरील वनराई कापून तो खणला तर त्याचा वाईट परिणाम इथल्या पाणी साठ्यावर होणार नाही का? हा सडा जैवविविधतेने भरलेला हे आपण आता बघितले नाही काय? त्यात मारट, किंदळ, नाना, जांभा, शिसम, शिवण, हेद, घोटींग आणि इतर अनेक प्रकारचे मोठमोठे वृक्ष आहेत. त्यावर अनेकप्रकारच्या औषधी वेली, रानआंबाडा, घागर, कांगल, नागुलकुडा, त्रिफळ, करवंद, कणेर, चार, चुरन, आंबट मिरी, हरकूली नाही काय? पावलोपावली वारुळे दिसतात ना? त्यांना पावसाळ्यात अळंबी फुलतात. भूजंग, साप, धामण, अजगर, घोणस, फुरसे, हिरवा साप, पट्टेरीसाप, घोरपड, मुंगूस, खवले मांजर नाही काय? कैक पक्षांचे दर्शन घेऊन त्यांच मधुर आवाज ऐकला नाही का? गव्यांचे दर्शन झाले ना, बिबटा, मेरू, चितळ, डुक्कर, काळे मांजर, शेकरू आहे, त्यांचं काय करणार? हिंस्त्र प्राण्यांना शत्रूपासून सावध करणारे शेकरू आणि आम्ही पठारावर फिरत असताना टिटवी पक्षी बाकी साऱ्यांना सावध करीत होता हे आपण ऐकले  आहे ना? 

हे सारे त्यांच प्रश्‍न ऐकून शेवटी मी म्हटलं इथे बाकी गोमंतकीय आल्यावर बाहेरचे संबोधले जाते हे खरे काय? त्यावर ते म्हणाले काश्मीर ते कन्याकुमारी आणि अरुणाचल प्रदेश ते कच्छचे रणपर्यंत आपण भारतीय आहोत. आमच्या देशाची घटना एक, शिवाय अंदमान निकोबार भारताचा भाग आहे. येणारा आयआयटी प्रकल्प हा केंद्र सरकारचा आहे. प्रत्येक भारतीयाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. शेवटी एकजण म्हणाला, गेल्या वर्षी म्हादई बचाव आंदोलन झाले. त्या आंदोलनात सत्तरीचेच लोक उतरले होते काय? म्हादई आपली म्हणून सर्व गोमंतकीयांनी भाग घेतला होता ना? सरकारने डिचोली तालुक्यातील सुर्ल गावातील सात आठ हजार जमीन देवराई म्हणून घोषित केली, तशाच प्रकारे हा सडा ठेवता येत नाही का? कैलास पर्वतात सोनं आहे म्हणून तो आपण खणावा का? आमची सरकारकडे मागणी आहे, हा प्रकल्प शैक्षणिक आहे हे जरी खरे असले, तरी तो एखाद्या उघड्या जमिनीवर उभारावा तो मेळावलीच्या सड्यावर आणू नये, या सड्यात (डोंगरात) जैवविविधतेचे विद्यापीठ आहे. हे त्यांचे म्हणणे ऐकून एल्विस, प्रदीप, सुनिल आणि मी घरचा रस्ता धरला. मात्र, तिथले लोक जे काही बोलले हे विचार डोक्यातून जाणारे नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

Goa CM Meet Fadanvis: मुख्यमंत्री सावंतांनी गळाभेट घेऊन फडणवीसांना दिल्या विजयाच्या शुभेच्छा

IFFI Goa 2024: चित्रपट महोत्सवाला तुडुंब गर्दी; मात्र फोंड्याच्या ‘मूव्ही मॅजिकला’ अजूनही प्रेक्षक मिळेना

SCROLL FOR NEXT