Bhoma-Khorlim National Highway: भोम खांडेपार येथील ग्रामस्थानंतर आता ओल्ड गोवा खोर्लीच्या येथील ग्रामस्थांकडूनही महामार्गाच्या विस्तारीकरणाला विरोध सुरू झाला आहे. रविवारी खोर्ली येथे झालेल्या सभेत खोर्लीतील स्थानिकांनीदेखील घरे पाडण्यापासून बचावली जावीत, यासाठी पुढाकार घेतला.
त्यांनीही बायपास रस्त्याची मागणी करत गावातून महामार्ग विस्तारीकरण प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.
स्थानिकांचे म्हणणे आहे की, आम्ही 2010 पासून बायपासची मागणी करत आहोत आणि हायवे विस्तारीकरण प्रकल्पाला विरोध करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापुर्वीच संबंधित अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवले आहेत.
कुंडई येथे शेतातून बायपास काढल्यास तो मुख्य रस्त्याला जोडला जाऊ शकतो. त्यामुळे खोर्ली तसेच भोम येथील रूंदीकरणात जाणारी सर्व घरे वाचू शकतात. त्यामुळे सरकारने गावातून महामार्गाचा विस्तार करण्याऐवजी हा पर्याय पाहावा.
महामार्गाच्या रूंदीकरणामुळे मालमत्तांना धोका आहे. त्यातून स्थानिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान, नुकतेच ग्रामसभेत या विषयावर चर्चा झाली होती. त्यातही या प्रकल्पाला विरोध केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
शनिवारी पहाटेच एक लॉरी ट्रक एका शेडवर आदळून अपघात झाला होता. त्यात चार कामगार सुदैवाने बचावले होते. महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर असे अपघात अनेक पटींनी वाढतील आणि आपला जीव आणि मालमत्ता धोक्यात येईल, असेही ग्रास्थांना वाटते.
दरम्यान, भोम येथे रस्ता रुंदीकरणाला होणाऱ्या विरोधाची धार कमी करण्यासाठी सरकारने या प्रकल्पाच्या अंतिम अधिसूचनेतून 75 बांधकामांच्या मालकांची नावे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, मंत्री गोविंद गावडे यांनी ग्रामस्थांच्या पाठीशी राहू असे म्हटले आहे तर मंत्री सुदिन ढवळीकर यांनी मात्र भोम येथे बगल रस्ता करणे शक्य नाही, असे म्हटले होते. ढवळीकर म्हणाले होते की, उड्डाण पुलाची शक्यता पडताळून पाहिली होती.
उड्डाण पुलाला सर्वसाधारण रस्त्याच्या दुप्पट खर्च येतो, हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ठाऊक असते. असे असतानाही त्यांनी ही शक्यता पडताळून पाहिली आणि तेही शक्य नाही म्हणून अखेरीस रस्ता रुंदीकरणाचा निर्णय कायम ठेवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.