Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: विद्यार्थी संमेलनाला तवडकर-गावडे नाहीत?

Khari Kujbuj Political Satire: आपले फोंड्याचे रवी पात्रांव हे एक अजब रसायन आहे. नव्वदच्या दशकापासून ते गोव्यातील राजकारणात सक्रिय आहेत व त्या काळात त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवून अनेकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्या गोष्टीला आता तिसेक वर्षे उलटली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

विद्यार्थी संमेलनाला तवडकर-गावडे नाहीत?

सहावे आदिवासी विद्यार्थी संमेलन मडगावात होत आहे. या संमेलनाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत करणार आहेत. याविषयी संमेलनाच्या कार्यक्रमाची माहिती आदिवासी कल्याण खात्याच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन दिली, पण विशेष म्‍हणजे उद्‍घाटन पत्रिकेत मंत्री गोविंद गावडे व सभापती रमेश तवडकर यांची नावे दिसत नाहीत. बहुधा त्‍यांच्‍यातील ‘सौख्‍य’ विचारात घेऊन तसा निर्णय घेण्‍यात आला असावा, पण या दोन्‍ही नेत्‍यांचे समर्थक, खंदे समर्थक मात्र तेथे उपस्‍थित राहतील. एक मात्र खरे, काहीवेळा महनीय व्‍यक्‍तींची अनुपस्‍थितीही पथ्‍यावर पडते. नाहीतर ‘उटा’ संमेलनाचे कवित्व आतापर्यंत सुरू होते. मानापमानाचा अंक संपता संपत नव्हता. आदिवासी विद्यार्थी संमेलनाला मात्र नेत्‍यांमधील रुसव्‍या फुगव्‍यांची किनार लागणार नाही हेही नसे थोडके!∙∙∙

रवी पात्रावांचा अजब सल्ला

आपले फोंड्याचे रवी पात्रांव हे एक अजब रसायन आहे. नव्वदच्या दशकापासून ते गोव्यातील राजकारणात सक्रिय आहेत व त्या काळात त्यांनी मुख्यमंत्रिपद भूषवून अनेकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्या गोष्टीला आता तिसेक वर्षे उलटली आहेत. या काळात मांडवी व झुआरीतून बरेच पाणी वाहून गेले आहे, पण रवी पात्रावांमधील मिष्किलता काही कमी झालेली नाही. आजही फोंडा मतदारसंघात ते घट्ट पाय रोवून तर आहेतच, पण त्यांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ते सोडत नाहीत. त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना अनेक विनोद करून श्रोत्यांची करमणूकही करतात. सध्या त्यांच्याकडे कृषी खाते आहे व त्या खात्याच्या फोंडा येथील एका कार्यक्रमात बोलताना लोकांना म्हणजे गोवेकरांना दिल्लीवाल्यांना जमिनी विकण्यापेक्षा शेती फुलवा असे आवाहन केले आहे. त्यांचा सल्ला ऐकून अनेकांची चांगलीच करमणूक झाली. कारण गोव्यात सगळीकडे सरकार दिल्लीतील बिल्डरांसाठी पायघड्या घालते, सरकारी कार्यालयात त्यांची कामे झटपट केली जातात असे आरोप होत आहेत, तर रवीबाब लोकांना वेगळा सल्ला देतात. त्याऐवजी त्यांनी सरकारलाच हा सल्ला दिला, तर ते योग्य ठरणार नाही का? असा प्रश्न केला जातो.∙∙∙

फोंड्यात होणार ‘पे पार्किंग’

फोंड्यात आता येत्या महिन्यापासून पे पार्किंग होणार आहे. एका अर्थाने शहराला शिस्त येईल हे मान्यच आहे, पण पार्किंगचे दर मात्र चढे ठेवता कामा नये असे वाहनचालक म्हणताहेत. पणजीसारख्या राजधानीत पार्किंगचे दर तसे चढेच आहेत. मात्र, फोंड्यात हे दर वाहनचालकांच्या आटोक्यात ठेवण्यासाठी पालिकेने प्रयत्न करावेत असेही वाहनचालक म्हणत आहेत. पे पार्किंगची योजना फोंड्यात सुरू करण्यासाठी फार पूर्वीपासून आटापिटा चालला होता. तत्कालीन नगराध्यक्ष दामोदर नाईक यांच्या कार्यकाळात ही योजना सुरू झाली होती, पण वाहनचालकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही योजना बंद करावी लागली होती, आता वाहनांची संख्या वाढली आहे, पार्किंगच्या जागाही शिल्लक नाहीत, त्यामुळे फोंडा पालिकेच्या या योजनेला वाहनचालक निश्‍चितच प्रतिसाद देतील, असे नगरसेवक सांगताहेत. ∙∙∙

हल्लेखोर मिळाले, उद्देश काय?

मांद्रे पंचायतीचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावरील खुनी हल्ल्यामागे राजकारण असल्याची जोरदार चर्चा मांद्रेमध्ये सुरू आहे. त्याचा संदर्भ धारगळ येथे होणाऱ्या सनबर्न ईडीएम महोत्सवाशी जोडून मूळ प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा हल्ला राजकीयप्रेरित असल्याचा संशय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आहे. मात्र, त्यासंदर्भात सरकार किंवा वरिष्ठ पोलिस अधिकारीही त्याचा पर्दाफाश करण्याचे धाडस करत नाहीत. हे प्रकरण गंभीर असूनही सरकारने पोलिसांवर ते सोपवून त्याकडे बघ्याची भूमिका घेत आहे. हल्लेखोरांना मांद्रे पोलिसांनी गोव्याबाहेर जाऊन गजाआड केले. मात्र, त्यामागील मूळ उद्देश काय? तसेच त्यामागे कोण राजकारणी आहे ते समोर येईल की पोलिस ते दडपण्याचा प्रयत्न करतील हे तपासातच उघड होईल. आमदार मायकल लोबो यांनी या प्रकरणामागील राजकारण्याचा पर्दाफाश करण्यासाठी कंबर कसली आहे. पोलिस चौकशीतून कितपत यशस्वी ठरतात व कोनाडकर यांना न्याय मिळतो की नाही हे पुढील दिवसांत स्पष्ट होईल. यासाठी मांद्रे पोलिसांची कसोटी लागणार आहे हे मात्र निश्चित. ∙∙∙

साखळीचे रवींद्र भवन प्रेक्षकांविना!

सध्या साखळीच्या रवींद्र भवनात कला अकादमीची ‘ब’ गट नाट्यस्पर्धा सुरू आहे, पण नाट्यगृहात गर्दीच नसल्यामुळे कलाकारांना आपली कला रिकाम्या खुर्च्यांना दाखवावी लागत आहे. आत्तापर्यंत झालेल्या बहुतेक नाटकांना याच परिस्थितीशी सामना करावा लागला आहे. गेल्यावर्षी पार पडलेल्या कला अकादमीच्या ‘अ’ गट मराठी नाट्य स्पर्धेचाही असेच झाले होते. कलाकार हा प्रेक्षकांचा भुकेला असतो हे आयोजक विसरले असावेत किंवा हे भवन मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात येत असल्यामुळे कला अकादमी या गोष्टीकडे कानाडोळा करत असावी. हे आम्ही नाही बोलत हो, स्पर्धेकरता साखळीबाहेरून आलेल्या संस्थांचे कलाकारच असे बोलत आहेत. ∙∙∙

मडगावात नवा भंगारअड्डा!

गोव्यात विविध भागांत भंगारअड्डे दृष्टीस पडतात, लोक त्याविरुद्ध आवाज उठवितात. ग्रामसभांत तर अशा अड्ड्यांचा मुद्दा असतोच असतो. सरकारने तर भंगारअड्डे लोकवस्तीबाहेर हटविले जातील, त्यांच्यासाठी औद्योगिक वसाहतीत जागा दिली जाईल अशी घोषणा विधानसभेत देखील केलेली आहे, पण अजून त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे आरोप होत आहेत. आता तर केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागांतही असे अड्डे उभे राहिलेले पाहायला मिळतात. मडगावात तर प्रत्येक प्रभागात भंगारअड्डे आढळतात. अशा अड्ड्यांत आगी लागून स्फोटही झालेले आहेत.भर लोकवस्तीत असे अड्डे कोणाच्या आशीर्वादाने उभे राहतात याचे उत्तर मात्र कधीच मिळत नाही. मडगावलगतच्या रुमडामळ-दवर्लीत संतोष चषक विजेत्यांना सरकारने दिलेल्या भूखंडातही म्हणे भंगारअड्डे चालतात, पण लोकांच्या तक्रारी असतानाही यंत्रणा त्यांना हात लावण्यास धजावत नाही ही वस्तुस्थिती आहे. आता तर पूर्व बगल रस्त्यावर आके येथे मारुती मंदिराजवळ गुजराती विशेष मुलांच्या शाळेच्या मागच्या बाजूला एक नवा भंगारअड्डा उभा राहिला आहे. हा परिसर फातोर्डा मतदारसंघात मोडतो खरा व म्हणून कदाचित संबंधित यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करत असावी. तेथे प्रथम जुनी वाहने ठेवण्यात आली व आता भंगारमाल मोठ्या प्रमाणात साठविला गेला आहे व तेथे केबल जाळून त्यातील धातू काढून घेतला जातो. त्यामुळे त्या प्रदूषणाचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. ∙∙∙

पैसे गेले कुठे हो..?

बँकेत येणाऱ्या ज्येष्ठ ग्राहकांना गोड-गोड बोलून टोप्‍या घालणाऱ्या तन्‍वी वस्‍त हिने जी सुमारे दीड कोटींची माया जमवली तिचे नेमके काय झाले? याचा सुगावा अजूनही पोलिसांना लागलेला नाही. काहीजण म्‍हणतात, तन्‍वीने हे पैसे आपल्‍या छानछोकीच्या जीवनावर उधळले, तर काहीजण म्‍हणतात, या घोटाळ्यात बँकेतील आणखी काही कर्मचारी सामील असल्‍याने त्‍या सर्वांनी हे पैसे वाटून खाल्‍ले. वास्‍तविक मागचे दहा दिवस तन्‍वी आणि बँक व्‍यवस्‍थापक आनंद जाधव हे दोघेही कुडचडे पोलिसांच्‍या ताब्‍यात आहेत. तन्‍वीने हे पैसे काय केले हे दहा दिवस उलटून गेले तरीही पोलिसांना तिच्‍या तोंडून वदवून घेता येत नाही का? ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT