Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Goa Crime News: प्रत्येक माणसात थोड्याफार प्रमाणात हिंस्र पशू असतो हे जरी खरे असले तरी त्यावर नियंत्रण ठेवण्याकरता कायदा अस्तित्वात आला आहे हेही तेवढेच खरे आहे.

Sameer Panditrao

मिलिंद म्हाडगुत

परवा धारगळ इथे झालेले अ‍ॅसिड हल्ला प्रकरण हे कोणत्याही सुज्ञ माणसाला हादरवून टाकेल असेच आहे. आता या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली असली तरी मूळ मुद्दा तिथेच राहतो. कायदा हातात घेणे कितपत योग्य, हा तो मूळ मुद्दा.

या प्रकरणाला प्रेमप्रकरणाची किनार असल्याचे स्पष्ट झाले आहेच. आपल्या मुलीच्या मृत्यूला तो सतरा वर्षांचा युवक जबाबदार असल्याचे गृहीत धरून त्याच्यावर मुलीच्या पित्याने भर रस्त्यात अ‍ॅसिड फेकले.

आता मुलीच्या आईने तो मुलगा व त्याची आई आपल्या मुलीला ’ब्लॅकमेल ’करत असल्याचा आरोप करून त्यामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाला अशी तक्रार पोलीस स्टेशनात केली आहे. या तक्रारीबरोबर तिने काही पुरावेही जोडले आहेत. आता प्रश्न असा निर्माण होतो, की त्यांनी हीच तक्रार आधी का केली नाही? आधी केली असती तर कदाचित त्या युवतीचा जीव वाचू शकला असता आणि असे अघोरी कृत्य झालेही नसते.

एका बाजूला त्या युवकाला धडा शिकवण्याकरता किंवा बदला घेण्याकरता म्हणा; कायदा हातात घ्यायचा आणि दुसर्‍या बाजूला नंतर तक्रार करून कायद्याच्या आडोशाला जायचा प्रयत्न करायचा, हे सगळेच विसंगत वाटते. यातून आता दुसरा मुद्दाही पटलावर यायला लागला आहे. तो म्हणजे प्रेमप्रकरणातून काय होऊ शकते याचा.

युवकांनी प्रेम करणे ही जरी प्रकृती असली तरी या प्रेमापोटी भलत्याच गोष्टी करणे ही मात्र विकृती ठरते. आणि या विकृतीपोटी अशी प्रकरणे घडायला लागतात. आपला तो बाब्या असे म्हणत आपल्या मुलांना पदराआड घ्यायची पालकांची प्रवृत्तीही अशा अमानवी कृत्यांना खतपाणी घालायला लागली आहे.

यातूनच मग प्रियकराने प्रेयसीवर हल्ला करणे, प्रेयसीने प्रियकराला दगा देणे अशी प्रकरणे ऐरणीवर यायला लागली आहेत. याला अमुक एक असा मापदंड नसतो. ती तत्कालीन मानसिकता असते. काही दिवसानंतर आपण जे केले ती चूक होती असे त्यांना वाटायला लागू शकते. पण अशा तत्कालीन मानसिकतेतून किंवा प्रतिशोध घेण्याच्या ईर्ष्येतून जे काही घडते ते मात्र भयानक असते. जसे परवा धारगळ येथे घडले.

हा एक प्रकारचा प्रतिशोधच म्हणावे लागेल. पण यातून कोणाचाही फायदा झालेला नाही आणि होणारही नाही. मात्र यातून समाजातली विघातक प्रवृत्ती अधोरेखित झाली आहे एवढे नक्की. आपल्यावर अन्याय झाला किंवा झाला असे वाटले तर राग येणे साहजिकच आहे. पण याचा अर्थ कायदा हातात घेणे असा होत नाही.

त्याकरता पोलीस आहेत, न्यायालये आहेत. कायद्याचे राखण करण्याकरता या यंत्रणा अस्तित्वात आल्या आहेत. आपल्यावर अन्याय झाला म्हणून जर प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर देशात वा राज्यात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. म्हणूनच तर कायद्याने नागरिकावर अनेक बंधने घातली आहेत. एखाद्याला शिवी देणे वा अश्लील हावभाव करणे हासुद्धा कायद्याने गुन्हा मानला जातो.

प्रत्येक माणसात थोड्याफार प्रमाणात हिंस्र पशू असतो हे जरी खरे असले तरी त्यावर नियंत्रण ठेवण्याकरता कायदा अस्तित्वात आला आहे हेही तेवढेच खरे आहे. पण असे जर आपल्या मनात भ्रामक समीकरणे बांधून एखाद्याचा बदला घेण्याकरता अनिष्ट गोष्टींचा आसरा घ्यायला लागले तर मग संस्कृतीच नष्ट होऊन जाईल.

खरे तर आजच्या तरुण पिढीपुढे मोहाची अनेक आकर्षणे उभी आहेत. या आकर्षणापोटी कितीतरी युवक-युवती वाईट मार्गाला लागल्याचे दिसून येत आहे. अशावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांना योग्य दिशा दाखवणे हे पालकांचे कर्तव्य ठरते. आज प्रत्येकाला एक वा जास्तीत जास्त दोन मुले असल्यामुळे ही गोष्ट असाध्य म्हणता येत नाही.

पण आपण तसे करतो का, हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःलाच विचारायला हवा. खरे तर मुलांना मार्गदर्शन करणे हे पालकांबरोबर शिक्षकांचेही कर्तव्य असते. पण शिकवायलाच वेळ नाही मार्गदर्शन आणखी काय करणार असे म्हणत आजचे बरेच शिक्षक आपले हात झटकून घेताना दिसतात. मग मुलांच्या चुकीपोटी कधी कधी पालकातला पशू जागा व्हायला लागतो.

मुलांवर प्रेम असणे हे साहजिकच आहे. पण ते प्रेम जागृत असायला हवे, विधायक असायला हवे. मृत्यूचा बदला घेणे याला प्रेम म्हणता येत नाही. या धारगळच्या प्रकरणात पालकांनी जर विधायक प्रेम केले असते तर अशा प्रकारचे अघोरी कृत्य घडलेच नसते. जे घडले ते वाईट घडले यात शंकाच नाही, पण यातूनही बोध घेता येतो हेही तेवढे सत्य आहे.

‘डॉक्टर जॅकेल आणि मिस्टर हाइड’ या प्रख्यात इंग्रजी कादंबरीत माणसाच्या दोन प्रवृत्ती दाखविल्या आहेत. त्यातल्या बर्‍या प्रवृत्तीला म्हणजे डॉक्टर जॅकेलला ऊर्जा देऊन वाईट प्रवृत्ती म्हणजे मिस्टर हाइडला कसे दाबायचे याची शिकवण दिली आहे. या कादंबरीची शिकवण घेऊन प्रत्येक माणसाने आपल्यातला मिस्टर हाइड संपविण्याचे ठरविले तर धारगळला घडलेली घटना परत कधीच घडू शकणार नाही हे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale: रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळली महिला पर्यटक, भाषेच्या अडचणीमुळे स्थानिकांशी संवाद कठीण; कोलवाळ हायवेवरील धक्कादायक प्रकार

Viral Video: रील्स बनवणाऱ्या तरुणीला माकडानं शिकवला चांगलाच धडा; व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘सस्त्यात सुटली’

Goa Politics: राज्यात राजकीय घडामोडी, मुख्यमंत्री सावंतांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; गोवा भेटीचं दिलं निमंत्रण

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये शतकांचा दुष्काळ! टी20 फॉरमॅटमध्ये दोनच फलंदाजांनी केली कमाल; एक किंग कोहली, दुसरा कोण?

Goa London Flight: अहमदाबाद क्रॅशनंतर बंद झालेली एअर इंडियाची गोवा - लंडन विमानसेवा पुन्हा सुरु होणार, बुकिंग सुरु; वाचा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT