Air India News: गोव्यातील आम आदमी पार्टीचे नेते अमित पालेकर यांनी ट्विटर म्हणजेच एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत एअर इंडिया या विमान कंपनीवर टीका केली आहे. या व्हिडीओमध्ये पालेकर यांनी एअर इंडिया या विमानातील गैरसोयींचा तिसऱ्यावेळा अनुभव केल्याचं सांगितलं. त्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
पूर्ण भाडे भरूनही सीट तुटलेली किंवा न झुकणारी असल्याचा आरोप पालेकर यांनी विमान कंपनीवर केलाय. पालेकर हे दिल्लीहून सेऊलला जात होते आणि एअर इंडियाकडून अशी सबब देण्याची ही त्यांची तिसरी वेळ असल्याचं त्यांनी सांगितलं. पालेकर म्हणतायत की यापूर्वी त्यांनी तक्रार केली नव्हती, पण आता DGCA वर कठोर टीका केल्याशिवाय पर्याय नाही.
त्यांना प्रवास करायचा असल्यास एका संमती पत्रावर सही करायला सांगितलं गेली आणि हा पर्याय नको असल्यास त्यांना अधिक पैसे भरून प्रवास करणं भाग होतं. पुढच्या प्रवासाचं गणित लागलेलं असल्याने मागे फिरण्याचा मार्ग उपलब्ध नव्हता अशी माहिती त्यांनी व्हिडीओमधून दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित असलेल्या अशा विमानांना उड्डाणाची परवानगी का दिली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अनेकदा झुकलेल्या सीट पुन्हा सरळ होत नाहीत, ज्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.
पालेकर म्हणतायत की दुसऱ्या दिवशी महत्त्वाची मीटिंग आणि पुढील प्रवासाची तसेच हॉटेलची बुकिंग असताना, ऐनवेळी दुसरी विमानसेवा शोधणं आणि जास्त भाडं देणं प्रवाशांना परवडणारं नाही. त्यामुळे प्रवाशांना नाइलाजाने तुटलेल्या सीटवर धोकादायक प्रवास करण्यास भाग पाडलं जात आहे.
या पोस्टमध्ये पालेकरांनी आणखीन एका प्रवाशाचा व्हिडीओ जोडला आहे. व्हँकुव्हरहून भारतात १८ तासांच्या प्रदीर्घ प्रवासादरम्यान एका अन्य प्रवाशाला पूर्ण बिझनेस क्लासचे भाडे भरूनही तुटलेल्या सीटवर प्रवास करण्यास भाग पाडलं. एअर इंडियाकडून प्रवाशांना पूर्ण परतावा घेण्यास किंवा हमीपत्र देऊन तुटलेल्या सीटवर प्रवास करण्याचा पर्याय देण्यात येत होता, यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत पालेकर यांनी राम मोहन नायडू यांना एअर इंडियाच्या या मनमानी कारभारात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. टाटा समूहाच्या व्यवस्थापनाखाली एअर इंडियाकडून प्रवाशांची अशा प्रकारे पिळवणूक होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.