Aradhya Mandrekar Canva
गोवा

शिर्डी देवदर्शनावरुन परतताना झाला घात, रेल्वेनेही दिली नाही साथ; सात वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: शिर्डीतून देवदर्शन करून परत येत असताना वाटेत रेल्‍वे अपघातात जखमी होऊन मरण आलेल्‍या पेडा-मडगाव येथील आराध्‍य राजेश मांद्रेकर या सात वर्षीय मुलाच्‍या पार्थिवावर काल शोकाकूल अवस्‍थेत अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.

या अपघाताबद्दल सगळीकडे हळहळ व्‍यक्‍त केली जात असून जर त्‍याच्‍यावर वेळेत उपचार झाले असते, तर त्‍याचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली जाते. जखमी अवस्‍थेत आराध्‍यला रेल्‍वे स्‍थानकावर आणणार याची कल्‍पना देऊनही रेल्‍वे स्‍थानकावर साधी रुग्‍णवाहिकाही तैनात केली नसल्‍याने रेल्‍वेच्‍या कारभारावरही टीका केली जात आहे.

पेडा-मडगाव येथील आराध्य राजेश मांद्रेकर हा सातवर्षीय मुलगा सोमवार १६ रोजी पुण्यानजीक रेल्वेतून पडल्याने गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान इस्पितळात त्याचा मृत्यू झाला.

औंध येथील रेल्‍वे स्‍थानकावर जखमी आराध्‍यला घेऊन त्‍याचे पालक खाली उतरले. त्‍यांनी दोन इस्‍पितळात जाऊन उपचारासाठी प्रयत्‍नकेले. मात्र या दोन्‍ही इस्‍पितळांनी आपण ही केस घेऊ शकत नाही म्‍हणून उपचार करण्‍यास नाकारले.

या परिस्‍थितीत बराच वेळ गेला. शेवटी एका इस्‍पितळाने आराध्‍यला दाखल करून घेतले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मांद्रेकर कुटुंबीय अन्य दोन कुटुंबीयांसह १३ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते.

१६ रोजी सायंकाळी ते गोवा एक्स्प्रेसने मडगावात परत येत होते. शिर्डीतून गोव्यात येत असताना रात्री झोपायची तयारी करत असताना इमर्जन्सी खिडकीकडील जागा रिकामी झाली. त्या जागेवर बसण्यासाठी आराध्य धावत गेला. त्याला एमर्जन्सी खिडकीचा अंदाज न आल्याने तो खिडकीतून बाहेर फेकला गेला. आराध्यच्या आईने हे पाहताच आरडाओरड केली असता सोबतच्या मंडळींनी रेल्वेची साखळी ओढत गाडी थांबवली. रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून पुढील स्थानकावर उपचाराची सोय करतो, असे सांगण्यात आले व औंध नजीकच्या स्थानकावर त्यांना उतरवले.

गाडीतून उतरताच त्या ठिकाणी रुग्णवाहिका किंवा उपचाराची सोय नव्हती. कुटुंबीयांनी धावाधाव करत खासगी गाडीतून नजीकच्या इस्पितळात नेले. मात्र, दोन इस्पितळांनी गंभीर अवस्थेतील आराध्यला अ‍ॅडमिट करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर एका इस्पितळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करत रुग्णवाहिका देत पुण्यानजीकच्या मोठ्या इस्पितळात नेण्यास सांगितले. त्या ठिकाणी जाईपर्यंत सुमारे तीन तासांचा अवधी उलटला होता. त्या ठिकाणी उपचारादरम्यानच आराध्यचा मृत्यू झाला. गुरुवारी मांद्रे येथील मूळगावी आराध्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आराध्यच्या मृत्यूनंतर रेल्वेतील मुलांच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रेल्वेमधील इमर्जन्सी खिडकीची जागा सीटबरोबर असून ती थोड्या उंचीवर असती तर आराध्यचा तोल गेला नसता. याशिवाय चेन ओढल्यानंतर साधारणत: ७०० मीटर ते १ किलोमीटर अंतरावर गाडी थांबली. आराध्यला रात्रीच्या काळोखात शोधण्यास वेळ लागला. त्यानंतर रेल्वेस्थानकावर माहिती देऊनही उपचाराची कोणतीही सोय उपलब्ध करण्यात आलेली नव्हती. अपघात झालेल्या परिसरातील इस्पितळात योग्य सोय नसल्याने त्यांनी अ‍ॅडमिट करून घेतले नाही, अशा अनेक बाबींवर आता चर्चा होत आहे.

दुःखाचा डोंगर!

आराध्य हा मडगावातील लॉयला हायस्कूलमध्ये दुसरीत शिकत होता. १ सप्टेंबर रोजी मडगावातील एका हॉटेलमध्ये त्याचा सातवा वाढदिवस साजरा करण्यात आला. आराध्यच्या हट्टामुळे नातेवाईकांसह सर्व मित्रांनाही बोलावण्यात आले होते. मांद्रेकर कुटुंबीयांना सात वर्षांच्या कालावधीनंतर आराध्यच्या रुपाने मुलगा झाला होता. पण दुर्दैवाने देवदर्शन करून येतानाच नियतीने त्याला हिरावून घेतल्याने मांद्रेकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Today's News Live: डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग लावल्याप्रकरणी एकास अटक

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

एक देश, एक निवडणूक! पहिल्यांदाच बोलले मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ऐतिहासिक म्हणत केले निर्णयाचे स्वागत

Goa Monsoon: अति पावसामुळे सांगेत सुपारी उत्पादकांना फटका! अजूनही गळती सुरुच; शेतकऱ्यांत चिंता

SCROLL FOR NEXT