पणजी: 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची दणक्यात सुरुवात झाली. यावर्षीच्या उद्घाटन समारंभाचे मुख्य आकर्षण ठरली ती चित्ररथांची भव्य आणि नेत्रदीपक मिरवणूक. गोव्याची समृद्ध संस्कृती आणि भारतीय सिनेमाचा वारसा यांचे दर्शन या मिरवणुकीतून घडवण्यात आले, ज्यामुळे उपस्थित देश-विदेशातील पाहुण्यांना एक अविस्मरणीय अनुभव मिळाला. यावेळी, गोव्यातील स्थानिक महिला कलाकारांनी कुणबी साडीत गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन घडवले. तसेच, कार्निव्हल आणि रोमटामेळ यांसारख्या उत्साही परंपरांचेही सादरीकरण करण्यात आले.
यंदाच्या इफ्फी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी काढलेल्या या मिरवणुकीत एकूण 23 चित्ररथ सहभागी झाले होते. या चित्ररथांची रचना कला, संस्कृती आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे महत्त्व अधोरेखित करणारी होती. या मिरवणुकीत गोमंतकीय कलाकारांचे आणि गोव्याच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारे एकूण 11 चित्ररथ होते. या चित्ररथांनी गोव्याचे पारंपरिक नृत्य प्रकार, ऐतिहासिक वास्तू, उत्सव आणि जीवनशैली यांचे सुंदर चित्रण केले. गोव्याचा सांस्कृतिक वारसा मोठ्या दिमाखाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करण्यात आला.
उर्वरित 12 चित्ररथ हे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे होते. या NFDC च्या चित्ररथांनी भारतीय सिनेमाच्या 100 वर्षांहून अधिक काळातील प्रवासाचा, विविध प्रादेशिक चित्रपटांचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलाकारांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केला. भारतीय सिनेमाचे जागतिक स्तरावरील योगदान आणि विविधतेत एकता या संकल्पना यातून प्रभावीपणे मांडण्यात आल्या.
ही चित्ररथांची मिरवणूक केवळ एक शो नसून, आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची आणि भारताची सांस्कृतिक ओळख दर्शवणारे एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरली. यामुळे देश-विदेशातील चित्रपट निर्माते आणि रसिकांना भारतीय संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. दरवर्षी इफ्फीचे उद्घाटन भव्य असते, पण यावर्षी चित्ररथांच्या मिरवणुकीमुळे सोहळ्याची भव्यता अधिक वाढली. 56व्या इफ्फीची सुरुवात या नेत्रदीपक सांस्कृतिक प्रदर्शनाने झाल्यामुळे पुढील आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवासाठी एक उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.