Illegal Beef Trafficking: बेळगाव-गोवा सीमेवरील केरी तपासणी नाक्यावर (Keri Checkpost) गोव्यात बेकायदेशीररित्या गोमांस घेऊन येणाऱ्या एका वाहनावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एका इनोव्हा (Innova) कारमधून सुमारे 400 किलो गोमांस (Beef) जप्त केले असून, याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकच्या बेळगाव (Belgaum) येथून केए 25 बी 6719 (KA25 B6719) क्रमांकाची इनोव्हा कार गोव्यामध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होती. केरी तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या पोलिसांनी संशयाच्या आधारावर या वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान, कारमध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस आढळले. हे गोमांस बेकायदेशीररित्या आणि कोणत्याही प्रकारची आवश्यक कागदपत्रे किंवा परवाने नसताना वाहतूक केले जात होते, असे उघड झाले.
दरम्यान, या बेकायदेशीर गोमांस वाहतूक प्रकरणी पोलिसांनी सोहील मुबारक बेपारी (वय 27) या तरुणाला जागेवरच ताब्यात घेतले. सोहील हा बेळगावचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला वाहनासह ताब्यात घेतले असून जप्त केलेले सुमारे 400 किलो गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरलेली इनोव्हा कार हे दोन्ही पुरावे म्हणून ताब्यात घेण्यात आले. जप्त केलेल्या गोमांसाची बाजारपेठेतील किंमत लाखाच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बेकायदेशीर गोमांस वाहतूक केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपीविरोधात कलम 325 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी सोहील मुबारक बेपारी याची कसून चौकशी सुरु केली आहे. हे गोमांस कोठून आणले गेले आणि गोव्यात (Goa) कोणत्या ठिकाणी वितरित केले जाणार होते, यासंबंधीची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. या बेकायदेशीर साखळीत अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी कायद्यानुसार पुढील योग्य ती कठोर कारवाई केली जाईल, असे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.