पणजी: हिमांशू राणा (१०१) आणि अंकित कुमार (नाबाद १२८) यांनी झंझावाती शतके ठोकताना गोव्याच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे हरियानाने विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील सामना आठ विकेट आणि ३२ चेंडू राखून सहज जिंकला.
स्पर्धेच्या अ गटातील सामना सोमवारी जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झाला. हरियाणासाठी २७२ धावांचे आव्हान कठीण ठरले नाही. त्यांचे सलामी फलंदाज हिमांशू आणि अंकित यांनी सुरवातीपासूनच गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले या दोघांनी संघाला २७.३ षटकांत १९२ धावांची दणदणीत सलामी दिली. हिमांशू याने ८० चेंडूत १२ चौकार व चार षटकार मारले. या २६ वर्षीय फलंदाजाचे लिस्ट ए क्रिकेटमधील हे चौथे शतक ठरले.
अंकित याने कर्णधार अशोक मेणारिया याच्या समवेत तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची अभेद्य भागीदारी करून हरियाणाला ४४.४ षटकांतच विजय मिळवून दिला. लिस्ट ए क्रिकेट कारकीर्दीतील दुसरे शतक झळकावलेल्या अंकित याने १४० चेंडूत १५ चौकार व एका षटकारासह नाबाद शतक केले. अशोक १२ धावांवर नाबाद राहिला. हरियानाच्या आक्रमणावर नियंत्रण राखण्यासाठी गोव्याला तब्बल आठ गोलंदाजांचा वापर करावा लागला.
पहिल्या लढतीत ओडिशाला नमविल्यानंतर गोव्याचे या पराभवामुळे दोन लढतीनंतर चार गुण कायम राहिले. त्यांचा पुढील सामना मणिपूरविरुद्ध होईल. अगोदरच्या लढतीत गुजरातकडून पराभूत झालेल्या हरियानाला विजयामुळे चार गुण मिळाले.
संक्षिप्त धावफलक ः गोवा ः ५० षटकांत ७ बाद २७१ (स्नेहल कवठणकर २६, ईशान गडेकर ८३, के. व्ही. सिद्धार्थ १९, सुयश प्रभुदेसाई १८, दीपराज गावकर ४, दर्शन मिसाळ ७५, अर्जुन तेंडुलकर १४, विकास सिंग नाबाद १३, मोहित रेडकर नाबाद ७, अमित राणा २-३८) पराभूत वि. हरियाना ः ४४.४ षटकांत २ बाद २७५ (हिमांशू राणा १०१, अंकित कुमार नाबाद १२८, पार्थ वत्स २७, अशोक मेणारिया नाबाद १२, अर्जुन तेंडुलकर ५-१-३५-०, शुभम तारी १०-०-५२-१, दीपराज गावकर ३-०-१७-०, फेलिक्स आलेमाव ५-०-४३-०, विकास सिंग ७-०-२८-१, मोहित रेडकर ८.४-०-७०-०, दर्शन मिसाळ २-०-९-०, सुयश प्रभुदेसाई ४-०-१८-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.