पणजी: ७ ते १७ ऑगस्टदरम्यान चीनमधील चेंगडू येथे होणाऱ्या १२ व्या द वर्ल्ड गेम्ससाठी गोव्याच्या शिखा पाठक यांची पंच म्हणून नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती विशेष ठरण्याचे कारण म्हणजे, जु-जित्सू या खेळातील भारताच्या एकमेव प्रतिनिधी आणि आशियातील पहिल्या महिला आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (ITO) म्हणून त्या या स्पर्धेत पंच म्हणून सहभागी होत आहेत.
या स्पर्धेत पंच म्हणून निवडलेल्या आठ उच्च अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. वास्को येथे राहणाऱ्या पाठक या जु-जित्सू असोसिएशन ऑफ इंडियाच्या संयुक्त सचिव असून, त्या जागतिक पंच तसेच आशियातील जु-जित्सूच्या मुख्य पंच आहेत.
दर चार वर्षांनी एकदा आयोजित होणारे द वर्ल्ड गेम्स हे ऑलिंपिक खेळांच्या कार्यक्रमात नसलेल्या खेळांसाठी आणि क्रीडा विषयांसाठी होणारे एक बहु-क्रीडा आयोजन आहे. यामध्ये जगभरातील सुमारे ५,००० खेळाडू व अधिकारी सहभागी होतात.
"जागतिक क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंना आपल्या खेळातील जागतिक क्रमवारीत (टॉप रँकिंग) स्थान मिळवणे आवश्यक असते. येथे पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते.
त्याचप्रमाणे, अधिकाऱ्यांची निवडही मागील मोठ्या स्पर्धांतील कामगिरी आणि मूल्यांकनाच्या आधारे केली जाते," असे शिखा पाठक यांनी सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, आशियातून फक्त दोन अधिकाऱ्यांचीच निवड झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.