Goa Cricket Canva
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy: गोव्याने सामना जिंकला पण..; रणजी क्रिकेटमध्ये आठ सामन्यांत सहा पराभव, दोन अनिर्णित लढती

Goa Ranji Cricket Match: रणजी करंडक प्लेट क्रिकेट सामन्यात गोव्याने रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मणिपूरला नऊ विकेट राखून हरविले, पण विजयासाठी ७६ धावांचा पाठलाग करताना एक विकेट गमावल्यामुळे बोनस गुणाला मुकावे लागले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: रणजी करंडक प्लेट क्रिकेट सामन्यात गोव्याने रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मणिपूरला नऊ विकेट राखून हरविले, पण विजयासाठी ७६ धावांचा पाठलाग करताना एक विकेट गमावल्यामुळे बोनस गुणाला मुकावे लागले. यजमानांच्या खराब गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेत पाहुण्या संघाने दुसऱ्या डावात साडेतीनशे धावांची मजल गाठली.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर गोव्याने प्लेट गटातील मोहिमेची विजयाने सुरवात करताना विजय मिळविला खरा, पण स्वैर आणि निष्प्रभ गोलंदाजी पाहता त्यांच्यासाठी तो नैतिक पराभवच ठरला. पहिल्या डावात ९८ धावांत गुंडाळलेल्या मणिपूरने दुसऱ्या डावात ३५३ धावांपर्यंत प्रगती साधली. त्यांच्या शेवटच्या चार विकेटने धावसंख्येत १६१ धावांची भर टाकली.

दुपारच्या सत्रात गोव्याने तिसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केलेल्या मुहम्ममद अल बाशिद व जॉन्सन सिंग यांच्यासह चौघांना नऊ धावांत माघारी धाडले, तेव्हा मणिपूरची ६ बाद १९२ अशी स्थिती होती. मात्र नंतर पकड सुटली. गोव्याचे क्षेत्ररक्षणही गचाळ ठरले. प्रफुल्लोमणी हा ३७ धावांवर असताना दर्शन मिसाळच्या गोलंदाजीवर उडालेला झेल आपल्या दिशेने येतोय हे ऋत्विक नाईकला माहितच नव्हते. जीवदानाचा लाभ उठवत यष्टिरक्षक-फलंदाजाने मणिपूरची पिछाडी भरून काढण्यात मोलाचा वाटा उचलला.

पहिल्या डावात पदार्पणात पाच गडी टिपलेल्या शुभम तारी याने दुसऱ्या डावातही चार गडी बाद केले. एकंदरीत सामन्यात नऊ गडी बाद करून तो सामन्याचा मानकरी ठरला. मात्र दुसऱ्या डावात पुन्हा एकदा पाच गडी बाद करण्याच्या नादात त्याने चार बळींनंतर अतिशय स्वैर व दिशाहीन मारा केला. मणिपूरच्या प्रफुल्लोमणी सिंग व रेक्स सिंग या अनुक्रमे आठव्या व नवव्या क्रमांकावरील फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढविताना एकत्रितपणे ११ षटकार खेचले.

प्रफुल्लोमणी याने फिरकी गोलंदाज मोहित रेडकर याला दोन उत्तुंग षटकार खेचले. दोन्ही वेळेस चेंडू बदलावा लागला. रेक्स याने नवव्या विकेटसाठी अजय सिंग (८) याच्यासमवेत ६६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. प्रफुल्लोमणी (६३) व रेक्स (नाबाद ७१) यांच्यासह मणिपूरच्या एकूण पाच जणांनी अर्धशतके केली. त्याच सलामीच्या करणजित सिंग याने ५६, अल बाशिद याने ५२, तर जॉन्सन सिंगने ६२ धावा केल्या.

फॉलोऑननंतर मणिपूरने गोव्याला पुन्हा फलंदाजी करण्यास भाग पाडले. विजयी लक्ष्य एकही गडी न गमावता पार केले असते, तर गोव्याला बोनससह एकूण सात गुण मिळाले असते, परंतु सलामीला आलेला मंथन खुटकर पुन्हा एकदा अपयशी ठरल्यामुळे गोव्याला विजयाच्या सहा गुणावरच समाधान मानावे लागले. त्याचवेळी सोविमा येथे नागालँडने अरुणाचल प्रदेशला डाव व २९० धावांनी हरवून बोनससह एकूण सात गुणांची कमाई केली. गोव्याचा पुढील सामना रांगपो येथे सिक्कीमविरुद्ध १८ ऑक्टोबरपासून खेळला जाईल.

सुयश प्रभुदेसाईला दुखापत

मणिपूरच्या दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडविण्याच्या प्रयत्नात वेगाने धावलेला गोव्याचा हुकमी खेळाडू सुयश प्रभुदेसाई किंचित निसरड्या मैदानावर घसरून पडला. त्याच्या पायाचा दुखापत झाली. त्यामुळे गोव्याने सलामीला त्याच्याऐवजी मंथन खुटकरला बढती दिली. गोवा संघ सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुयशची दुखापत गंभीर नसली तरी सोमवारी वैद्यकीय चाचणी करण्यात येईल.

सहा पराभवानंतर पहिला विजय

गोव्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आठ सामन्यांत सहा पराभव आणि दोन अनिर्णित लढतीनंतर पहिला विजय रविवारी प्राप्त केला. अखेरचा विजय गोव्याने पालम-दिल्ली येथे सेनादलाविरुद्ध जानेवारी २०२३ मध्ये नोंदविला होता. तेव्हा सामना डाव व चार धावांनी जिंकला होता. एकंदरीत रणजी क्रिकेटमधील २२० सामन्यांतील गोव्याचा हा ३०वा विजय ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vinorda Theft: दरवाजा तोडला, दागिने-रोकड लंपास; दिवसाढवळ्या घरफोडीमुळे विर्नोड्यात खळबळ

Goa: शेतकऱ्यांसाठी दिलासा! ‘हजारी केळी’ बनली बागायतदारांसाठी ‘ढाल’; खेतींपासून होतोय बचाव

Goa Politics: खरी कुजबुज; भाऊ, किती खड्डे बुजविले?

Tuyem Hospital: ..अन्यथा डिसेंबरमध्ये आंदोलन! तुयेतील हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी; 8 वर्षे रखडले लोकार्पण

Ambavali Eco Tourism: आंबावलीत 1.04 लाख चौमी.जमिनीवर ‘इको टुरिझम’ प्रकल्प! IPB ची तत्त्वतः मान्‍यता; सूचना मागवल्या

SCROLL FOR NEXT