Cameron Green Duck Out: क्रिकेट विश्वासाठी 16 डिसेंबर 2025 ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरली. पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या मेगा लिलावात फ्रँचायझींनी आपल्या आवडत्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरुन ग्रीन याने लिलावाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नवा इतिहास रचला. मात्र, मजेची गोष्ट अशी की, ज्या खेळाडूवर संघाने 25 कोटींहून अधिक रुपये खर्च केले, तोच खेळाडू लिलावाच्या दुसऱ्याच दिवशी खातंही न उघडता शून्यावर बाद झाला.
मंगळवारी (16 डिसेंबर) झालेल्या लिलावात कॅमेरुन ग्रीनचा बोलबाला पाहायला मिळाला. केवळ 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत (Base Price) लिलावात आलेल्या ग्रीनला आपल्या संघात घेण्यासाठी अनेक फ्रँचायझींमध्ये चुरस लागली होती. बराच वेळ चाललेल्या या 'प्राईस वॉर'नंतर अखेर कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारली. शाहरुख खानच्या केकेआरने ग्रीनसाठी तब्बल 25 कोटी 20 लाख रुपये मोजले. यासह ग्रीन आयपीएल इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला.
आयपीएल (IPL) लिलावात इतकी मोठी किंमत मिळाल्यानंतर सर्वांच्या नजरा ग्रीनच्या खेळाकडे लागल्या होत्या. सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (England) यांच्यात प्रतिष्ठित 'ॲशेस' मालिका सुरु आहे. लिलावाच्या दुसऱ्याच दिवशी ग्रीन मैदानात उतरला, मात्र तिथे त्याला आपली चमक दाखवता आली नाही. ग्रीनने केवळ 2 चेंडूंचा सामना केला आणि एकही धाव न काढता तो माघारी परतला. जरी ही कसोटी मालिका असली आणि आयपीएल टी20 फॉरमॅट असला, तरी इतकी मोठी किंमत मिळालेल्या खेळाडूची अशा प्रकारे फजिती झाल्याने सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.
ग्रीनला आयपीएलचा फार मोठा अनुभव नसला तरी त्याने आपल्या फलंदाजीने यापूर्वी छाप पाडली. ग्रीनने मुंबईसाठी पदार्पण केले. 16 सामन्यांत त्याने 452 धावा केल्या, ज्यामध्ये 1 शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता. त्यानंतर तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात गेला. तिथे त्याने 13 सामन्यांत 255 धावा केल्या. दुखापत किंवा इतर कारणांमुळे तो गेल्या हंगामात खेळू शकला नव्हता.
कोलकाता नाईट रायडर्सने ग्रीनला आपल्या ताफ्यात सामील करुन संघ अधिक संतुलित करण्याचा प्रयत्न केला. मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी आणि वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता ग्रीनकडे आहे. मात्र, कसोटीतील (Test) त्याच्या या फ्लॉप कामगिरीमुळे केकेआरच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, टी20 मध्ये तो नक्कीच जोरदार पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.