Jamshedpur FC Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

ISL 2024-25: एफसी गोवाचा घरच्या मैदानावर पराभव; आता लक्ष मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्धच्या लढतीवर

FC Goa: जॉर्डन मरे याने सणसणीत फटक्यावर एफसी गोवास पराभव स्वीकारण्यास भाग पाडणारा महत्त्वपूर्ण गोल केला

गोमन्तक डिजिटल टीम

Indian Super League 2024-25

पणजी: एफसी गोवाने सामन्यात चेंडूवर बहुतांश वर्चस्व राखले, पण आक्रमणात धार दिसली नाही. जमशेदपूर एफसीने पिछाडीवरून संधींचा सुरेख लाभ उठवत २-१ विजयासह इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सामना झाला. ९०+३व्या मिनिटास बदली खेळाडू जॉर्डन मरे याने उजव्या पायाच्या सरळ रेषेतील सणसणीत फटक्यावर एफसी गोवास घरच्या मैदानावर पराभव स्वीकारण्यास भाग पाडणारा महत्त्वपूर्ण गोल केला.

यावेळी त्याला रोखण्यास एफसी गोवाचा (FC GOA) ओडेई ओनाइंडिया, तसेच इतर बचावपटू व गोलरक्षक साफ अपयशी ठरले. त्यापूर्वी, एफसी गोवासाठी ४५+३व्या मिनिटास आर्मांदो सादिकू याने गोल केला. नंतर ७४व्या मिनिटास हावी सिव्हेरियो याने पेनल्टी फटक्यावर जमशेदपूरसाठी बरोबरीचा गोल केला होता.

एफसी गोवाचा खेळ विशेष बहरला नाही. पूर्वार्धातील पिछाडीनंतर उत्तरार्धात खेळाचे स्वरुप बदलले. त्यांनी वेळोवेळी एफसी गोवाच्या क्षेत्रात मुसंडी मारत प्रतिस्पर्ध्यांवर दबाव राखला. एफसी गोवाचा पुढील सामना २१ सप्टेंबर रोजी कोलकता येथे मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध होईल. त्याचदिवशी जमशेदपूर एफसी घरच्या मैदानावर मुंबई सिटीविरुद्ध खेळेल.

सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीकडे झुकत असताना भरपाई वेळेतील दुसऱ्या मिनिटास अल्बानियाच्या आर्मांदो सादिकू याने जमशेदपूरचा गोलरक्षक आल्बिनो गोम्स याच्या गचाळ रक्षणाचा लाभ उठवत एफसी गोवास आघाडी मिळवून दिली.

यावेळी रॉलिन बोर्जिसच्या असिस्टवर सादिकू याचा विशेष ताकद नसलेल्या फटक्यासमोर आल्बिनो दक्षतेने चेंडू अडवू शकला नाही आणि त्यामुळे जमशेदपूरला पिछाडीवर जावे लागले. उत्तरार्धातील खेळ सुरू झाल्यानंतर लगेच एफसी गोवास आघाडी वाढविण्याची संधी होती, मात्र सादिकूचा हेडर जमशेदपूरचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सने कसाबसा अडविल्यामुळे एफसी गोवाच्या खाती आणखी एका गोलची नोंद झाली नाही.

सामन्यातील सोळा मिनिटांचा खेळ बाकी असताना पेनल्टी फटक्यावर जमशेदपूरने बरोबरी साधली. यावेळी एफसी गोवाच्या ओडेई ओनाइंडिया याने जमशेदपूरच्या खेळाडूस केलेल्या फाऊलमुळे रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली व ओडेईला यलो कार्ड दाखविले. स्पॅनिश खेळाडू हावी सिव्हेरियो याने गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी याचा अंदाज चुकवत संघाला बरोबरी साधून दिली. त्यापूर्वी ७०व्या मिनिटास जमशेदपूरला चांगली संधी होती, मात्र हावी हर्नांडेझ याचे हेडिंग गोलरक्षक कट्टीमणी याने व्यवस्थित अडविल्यामुळे एफसी गोवाचे नुकसान झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT