Indian Super League 2024-25
पणजी: प्रतिस्पर्धी कोणीही असो, घरच्या मैदानावर खेळत असलो, तरीही स्पर्धेतील पहिला सामना खडतरच असतो, अशी सावध प्रतिक्रिया एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी सोमवारी दिली.
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी गोवा यावेळच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पहिली लढत खेळणार आहे. त्यावेळी त्यांच्यासमोर जमशेदपूर एफसीचे आव्हान असेल. आयएसएलमधील मागील चार सामन्यात एफसी गोवा संघ जमशेदपूर एफसीविरुद्ध अपराजित आहे, पण त्यास महत्त्व देण्यास ५६ वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शक तयार नाहीत.
सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मार्केझ यांनी सांगितले, की ``मी नेहमीच प्रत्येक सामन्यागणिक नियोजन करतो. निश्चितच उद्याचा सामना कठीण आहे. आता स्पर्धा वेगळी आहे. त्यांची शैली, खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदललेला आहे. त्यांच्यापाशीही चांगले अनुभवी खेळाडू आहेत. त्यांच्या प्रशिक्षकाचाही मी आदर करतो.``
भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आणि एफसी गोवाचा हुकमी बचावपटू संदेश झिंगन अजूनही पूर्ण तंदुरुस्त नसल्याची माहिती मार्केझ यांनी दिली. ``आयएसएलमधील पहिल्या चार सामन्यांसाठी त्याचा विचार होणार नाही. त्यानंतर तो उपलब्ध होऊ शकेल,`` असे ते म्हणाले. या वर्षीच्या प्रारंभी आशिया करंडक स्पर्धेत झालेल्या दुखापतीनंतर संदेश आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत फुटबॉलपासून दूर आहे.
एफसी गोवा संघ घरच्या मैदानावर पहिला सामना खेळत असल्याने त्यांची बाजू किंचित जड आहे. हल्लीच या मैदानावर ओडिशा एफसीला पेनल्टी शूटआऊटमध्ये नमवून एफसी गोवाने भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी पटकावली होती. या पार्श्वभूमीवर मार्केझ म्हणाले, की ``मला वाटते की आम्ही सर्व सामने जिंकू शकू. त्याचवेळी खराब खेळलो, तर पराभव निश्चित आहे.`` गतमोसमात एफसी गोवा संघ आयएसएल स्पर्धेत सलग १२ सामने अपराजित होता, नंतर दुसऱ्या टप्प्यात प्रमुख खेळाडूंच्या दुखापती, तसेच इतर कारणास्तव खेळ घसरला आणि एफसी गोवा संघाला लीग शिल्डपासून दूर राहावे लागले होते, त्यांना साखळी फेरीत तिसरा क्रमांक मिळाला होता.
पत्रकार परिषदेस एफसी गोवाचा मध्यरक्षक बोरिस सिंग उपस्थित होता. एफसी गोवातर्फे त्याचा हा दुसरा मोसम आहे. त्यापूर्वी तो जमशेदपूर एफसीचा सदस्य होता. गतमोसमात त्याने तीन गोल केले होते, यंदा भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल स्पर्धेत त्याने छाप पाडली. नव्या मोसमाविषयी २४ वर्षीय खेळाडू म्हणाला, की ``यावेळी जास्त एकाग्रपणे खेळताना अधिकाधिक गोल करण्यावर आणि असिस्ट पुरविण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. गोलनेटसमोर निर्णायक टप्प्यावर संयम बाळगून अचूक वेळी गोल करण्याचा निर्धार आहे.`` आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाविरुद्ध गोल केल्यास जल्लोष खास अनोख्या शैलीत करणार असल्याचे सांगण्यास मणिपूरमधील इंफाळ येथील हा फुटबॉलपटू विसरला नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.