Purvi Naik  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Purvi Naik: गोव्याची जलपरी पूर्वीची सुवर्णभरारी; दुखापतीत नोंदविली सर्वोत्तम कामगिरी

गोमन्तक डिजिटल टीम

National Sports Day Special

गोव्याची युवा जलपरी पूर्वी नाईक हिने ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीस ओडिशातील भुवनेश्वर येथील जलतरण तलाव गाजविला. पायाची दुखापत विसरून राष्ट्रीय सबज्युनियर मुलींच्या गट तीनमध्ये या अकरा वर्षीय मुलीने एक सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्‍यपदक जिंकले. ५० मीटर फ्रीस्टाईलमध्ये वेगवान जलतरणपटूचाही मान मिळविला. कारकिर्दीतील तिची ही दुसरीच राष्ट्रीय स्पर्धा. गतवर्षी ती रिक्त हस्ते माघारी आली होती, यंदा तिच्या गळ्यात राष्ट्रीय चार पदके होती.

हरवळे-साखळी येथील या प्रतिभाशाली मुलीचे यश गोमंतकीय जलतरणासाठी स्पृहणीय आणि आश्‍‍वासक आहे. मात्र ही यशस्वी भरारी पूर्वी हिला सहजासहजी घेता आलेली नाही. त्यासाठी कष्ट उपसावे लागले, त्याग करावा लागला. खरं म्हणजे, या वर्षी ती पदके जिंकण्याबाबत साशंकताच होती. जुलै महिन्याच्या सुरूवातीस राज्यस्तरीय स्पर्धा संपत असताना तिच्या पायाला दुखापत झाली. २१ दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला डॉक्टरने दिला. त्यामुळे राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीवर प्रतिकूल परिणाम अपेक्षितच होता, पण पूर्वी धैर्यवान बनली. पाय दुखत असतानाही ती पाण्यात उतरली आणि जलतरण सराव सुरू केला.

ओडिशातील स्पर्धेत सहभागी होतानाही पूर्वी पूर्ण तंदुरुस्त नव्हती. तरीही राष्ट्रीय संधी वाया घालवायची नाही, पदके जिंकायचीच आहेत हेच ध्येय बाळगून तिने वेगाने पाणी कापत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. यावेळच्या सबज्युनियर-ज्युनियर राष्ट्रीय जलतरणात पदके जिंकणारी ती एकमेव गोमंतकीय ठरली. काही दिवसांपूर्वी पूर्वी हिने राज्यस्तरीय सीनियर जलतरणातील महिलांच्या १५०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये तिने नवा स्पर्धा विक्रम नोंदविला. जलतरणात फ्रीस्टाईल हा तिचा आवडीचा आणि हुकमत असलेला प्रकार आहे.

‘खेलो इंडिया’ केंद्रातून उत्तुंग झेप

पूर्वी हिचे वडील रितेश नाईक हे हरवळे येथील बांधकाम साहित्य व्यावसायिक. आई नम्रता या पूर्वाश्रमीच्या पत्रकार, पण आता पूर्णतः गृहिणी. मोठी बहीण प्राची हीसुद्धा जलतरणपटू, पण तिने अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. आई-वडिलांचे पाठबळ, बहिणीकडून मिळालेली प्रेरणा यामुळे पूर्वी हिने वयाच्या चौथ्या वर्षीच पाण्यात सूर मारला. पण शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी नियमानुसार सहाव्या वर्षीपर्यंत थांबावे लागले. दोन्ही मुलींना तरबेज जलतरणपटू बनविण्याचा आई नम्रता यांचा ध्यास. त्यासाठी खूप आटापिटा करावा लागला.

रितेश नाईक हे मूळचे धामसे-सत्तरी येथील. मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी स्थलांतर केले. जलतरणासाठी साखळी येथे सुविधा नसल्यामुळे दोन्ही मुलींना स्कूटरवर बसवून हरवळे ते पेडे-म्हापसा ये-जा प्रवास हा नम्रता यांचा दिनक्रम बनला. त्यासाठी भल्या पहाटे उठून सारी आवराआवर करावी लागायची. कांपाल येथील ‘खेलो इंडिया’ राज्य उत्कृष्टता केंद्रात पूर्वी हिची निवड झाली आणि नोव्हेंबर २०२२ पासून तिच्या उपजत गुणवत्तेला धुमारे फुटले.

राष्ट्रीय पातळीवर विक्रमासह ठसा उमटवलेले सेनादलातील माजी जलतरणपटू टी. ए. सुजीत यांची कांपाल केंद्रावर प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या प्रगल्भ मार्गदर्शनाखाली पूर्वीने दोन वर्षांच्या आतच राष्ट्रीय पातळीवर उत्तुंग झेप घेतली. कांपाल येथील केंद्रात पूर्वी ही बिगरनिवारी प्रशिक्षणार्थी आहे. त्यामुळे पहाटे साडेतीन वाजता उठून प्रशिक्षणासाठी हरवळे येथून दररोज कांपालला येणे अशक्यच होते.

शैक्षणिक नुकसानही झाले असते. त्यामुळे पूर्वी हिच्या पालकांनी पणजीजवळील करंझाळे येथे मुक्काम हलविला. कुजिरा येथील मुष्टिफंड हायस्कूलमध्ये ती सध्या सहाव्या इयत्तेत शिकते. आता कांपाल येथील खेलो इंडिया केंद्र संपूर्णतः पेडे-म्हापसा येथे हलविले जाणार आहे. त्यामुळे नाईक कुटुंबीय आपले बस्तान म्हापशात हलविण्याच्या विचारात आहे.

...म्हणून केली पाण्याशी संगत

पूर्वी तरबेज जलतरणपटू बनण्याविषयी आई नम्रता हिने सांगितले की, १९९३ सालची गोष्ट. गोव्यातून पुणे येथे जाताना बस वाटेत पुराच्या पाण्यात फसली. त्यात माझी आई, आजी, बहिणीच्या मुलीस पाण्याने ओढून नेले. कुटुंबातील जीवलग अशा तिघींना एकावेळी गमावण्याची वेदना असह्य होती. तेव्हा आम्ही चारही बहिणींनी पाण्याला घाबरायचे नाही, पोहायला शिकायचे, आपल्या मुलांनाही पोहण्यास प्रेरित करण्याचा निश्चय केला. मी माझ्या दोन्ही मुलींना लहानपणीच पोहायला शिकवले. त्यात पूर्वी हिच्यासाठी पोहणे केवळ स्वरक्षण किंवा छंद ठरले नाही, तर तिने पट्टीची जलतरणपटू बनत खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय पदके जिंकली व ही भावना खूप सुखावणारी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत नाराज, गोवा विद्यापीठाचे मानांकन घसरल्यावरुन व्यक्त केली चिंता

Goa Today's News Live: अवजड वाहनांना अनमोड घाट खुला

Sahara Refund Cap: सहारामध्ये पैसे अडकलेल्या गुंतवणुकदारांना दिलासा, रिफंडबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

SCROLL FOR NEXT