Goa VS Manipur Ranji Trophy Cricket Match
पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या २०२४-२५ मोसमातील प्लेट विभाग संघांशी तुलना करता गोव्याचा संघ निश्चितच ताकदवान आहे. त्यामुळे ते साखळी फेरीत वर्चस्व राखून पुन्हा एलिट गटात परतण्याचे निश्चित मानले जाते, त्याचवेळी अतिआत्मविश्वास घात करू शकतो याची जाणीवही त्यांना ठेवावी लागेल. यावेळच्या मोहिमेतील पहिला चार दिवसीय सामना शुक्रवारपासून पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर मणिपूरविरुद्ध खेळला जाईल.
गतमोसमात फक्त मोजक्याच खेळाडूंवर अवलंबून राहिल्यामुळे गोव्याचे भरपूर नुकसान झाले. त्यामुळेच त्यांची मणिपूरसह एलिट गटातून प्लेट गटात पदावनती झाली. यापूर्वी गोव्याच्या संघाला २०१९-२० मोसमात प्लेट गटात खेळावे लागले होते. तेव्हा नऊपैकी सात सामने जिंकून गोव्याने पुन्हा एलिट विभागात प्रवेश करताना रणजी करंडक स्पर्धेची उपांत्यपूर्व लढत खेळण्याचाही मान मिळविला होता.
आता त्यांना मणिपूरसह सिक्कीम, नागालँड, मिझोराम व अरुणाचल प्रदेश या तुलनेत कमजोर संघांवर पूर्ण वर्चस्व राखत आगेकूच राखावी लागेल. घरच्या मैदानावर तीन सामने खेळण्याचा लाभ माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्याला उठवावाच लागेल.
गतमोसमात मणिपूरवर एलिट विभागात सर्व सातही सामने गमावण्याची पाळी आली होती आणि प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्यावर पूर्ण वर्चस्व राखले होते. कॉनर विल्यम्स यांच्या मार्गदर्शनाखालील मणिपुरी संघात सर्व खेळाडू स्थानिक आहेत, मात्र त्यांच्या राज्यातील अशांत परिस्थिती, तसेच आवश्यक साधनसुविधांचा अभाव यामुळे रणजी स्पर्धेच्या तयारीसाठी त्यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनला आपले ‘घर’ बनविले आहे. दोन मोसमापूर्वी त्यांनी प्लेट गटात शानदार खेळ करत एलिटसाठी पात्रता मिळविली होती. त्या कामगिरीची पुनरावृत्ती झाल्यास गोव्याला त्रास होईल.
मणिपूरविरुद्धच्या सामन्यासाठी गोव्याने सोळा सदस्यीय संघ जाहीर केरा आहे. त्यापैकी राहुल मेहता व कीथ पिंटो यांना राखीव फळीत ठेवण्यात आले आहे. आता अकरा सदस्यीय संघात जागा मिळविण्यासाठी चौदा खेळाडूंत चुरस आहे. सुयश प्रभुदेसाई, रोहन कदम, मंथन खुटकर, स्नेहल कवठणकर, के. व्ही. सिद्धार्थ, यष्टिरक्षक समर दुभाषी, कर्णधार दर्शन मिसाळ, मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकर, हेरंब परब यांची जागा जवळपास निश्चित आहे.
बाकी एका जागेसाठी फलंदाज कश्यप बखले, वेगवान गोलंदाज शुभम तारी व ऋत्विक नाईक, अष्टपैलू दीपराज गावकर यांच्यात चढाओढ असेल. तीन वेगवान गोलंदाज खेळल्यास शुभम अथवा ऋत्विक यांच्यापैकी एकटा अकरा सदस्यीय संघात येईल. २६ वर्षीय कश्यप आणि २३ वर्षीय शुभम अजून रणजी क्रिकेट सामना खेळलेला नाही.
गोवा व मणिपूर यांच्यात यापूर्वी फक्त एकच रणजी करंडक लढत झालेली आहे. ३ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत पर्वरी येथे झालेल्या लढतीत गोव्याने डाव व ३५९ धावांनी दणदणीत विजय मिळविला होता. मणिपूरला सामन्यात अनुक्रमे १०६ व ८८ धावाच करता आल्या. गोव्याने पहिल्या डावात ५ बाद ५५३ घोषित अशी अजस्त्र धावसंख्या उभारत ४४७ धावांची आघाडी संपादन केली होती.
गोव्यात मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस संध्याकाळच्या सत्रात हजेरी लावत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार, शुक्रवारपर्यत ऑरेंज ॲलर्ट, तर १२ व १३ ऑक्टोबर रोजी यलो ॲलर्टचा इशारा आहे. या अंदाजानुसार पाऊस झाल्यास गोवा व मणिपूर यंच्यातील रणजी लढतीला पावसाचा फटका बसू शकतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.