पणजी: आगामी मोसमासाठी गोव्याच्या सीनियर महिला संघाची बांधणी करताना सकारात्मक मानसिकतेवर जास्त मेहनत घेण्यात आली आहे. त्याचे योग्य परिणाम प्रत्यक्ष सामन्यांत निश्चितच दिसून येतील, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जी यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केला. संघाची मोहीम खडतर आहे, पण प्रतिस्पर्ध्यांचा दबाव न घेता बिनधास्त खेळण्याचा सल्ला खेळाडूंना देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
सलामी फलंदाज आणि लेगस्पिन गोलंदाज असलेल्या पुष्पांजली यांनी झारखंडचे २००० पर्यंत नऊ वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट प्रतिनिधित्व केले. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मागील दोन दशके भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मान्यताप्राप्त प्रशिक्षक या नात्याने त्या कार्यरत आहेत. गोव्यात येण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर झारखंडचे तब्बल आठ वर्षे प्रशिक्षकपद सांभाळले. याशिवाय हिमाचल प्रदेश, मणिपूर, छत्तीसगड, ओडिशा, चंडीगड या संघांच्या प्रशिक्षक या नात्याने त्यांनी छाप पाडली. पुष्पांजली या गतवर्षी भारत अ संघाचे प्रशिक्षक असताना या संघाने टी-२० चॅलेंजर स्पर्धा जिंकली होती.
‘‘आता मला गोवा क्रिकेट असोसिएशनने संधी दिली आहे, त्याबद्दल मी संघटनेप्रति आभारी आहे. गोव्याचा मजबूत संघ तयार करण्याचे उद्दिष्ट बाळगून काम सुरू आहे. मोसमपूर्व कालावधीत आम्ही काही स्पर्धांत खेळलो, त्याची मला संघ बांधणीत मदत झाली आहे. याकामी संघटनेचे सहकार्य मोलाचे ठरले,’’ असे पुष्पांजली म्हणाल्या.
पुष्पांजली यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याचा महिला संघ एलिट गटात खेळणार आहे. टी-२० स्पर्धेत २६ ऑक्टोबरपासून खेळणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, बंगालसारखे बलाढ्य, तसेच जम्मू-काश्मीर, चंडीगड, छत्तीसगड, आसाम आदी संघ एलिट अ गटात आहेत. त्यानंतर सीनियर महिला संघ १९ डिसेंबरपासून एकदिवसीय स्पर्धेत खेळेल. एलिट अ गटात गोव्यासमोर दिल्ली, मुंबई, बंगाल, झारखंड, जम्मू-काश्मीर, हैदराबाद, तमिळनाडू या संघांचे आव्हान असेल.
शिखा पांडे, सुनंदा येत्रेकर, विनवी गुरव, श्रेया परब, पूर्वा भाईडकर, तसेच इतर खेळाडूंचा अनुभव, शिवाय मिताली गवंडर, तनया नाईक आदी नवोदितांची कामगिरी संघासाठी मौल्यवान असेल. दुखापतीतून सावरलेली पूर्वजा वेर्लेकर, तेजस्विनी दुर्गड परतल्यामुळे संघाच्या फलंदाजीस बळकटी प्राप्त झाल्याचे पुष्पांजली यांनी सांगितले. २३ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील खेळाडूंच्या कामगिरीकडेही आपण लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘स्ट्राईक रेट’नुसार फलंदाजी आवश्यक
तुलनात्मक विचार करता, गोलंदाजीच्या तुलनेत गोव्याची फलंदाजी काहीप्रमाणात कमजोर भासते. याविषयी पुष्पांजली यांनी सांगितले, की ‘‘बिनधास्त क्रिकेट खेळत फलंदाजीत स्ट्राईक रेट वाढविणे आवश्यक आहे. या रणनीतीनुसार फलंदाजी झाल्यास दबाव अजिबात येणार नाही. संघात निश्चितच समतोल साधला जाईल.’’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.