पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील गोव्याची एलिट ड गटातील मोहीम शनिवारपासून (ता. १४) सुरू होत आहे. प्रतिस्पर्धी बलाढ्य असल्यामुळे अभिनव तेजराणा याच्या नेतृत्वाखालील संघाचा सातही सामन्यांत कस लागेल. या गटातील सर्व सामने कोलकता येथे खेळले जातील.
गोव्याचा पहिला सामना विदर्भाविरुद्ध शनिवारी खेळला जाईल. त्यानंतर अनुक्रमे उत्तराखंड (ता. १६), मुंबई (ता. १८), हैदराबाद (ता. २०), ओडिशा (ता. २२), छत्तीसगड (ता. २४), गुजरात (ता. २६) या संघांविरुद्ध लढती होतील.
गतमोसमात चार विजय
गतमोसमातील (२०२५-२६) सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेच्या गटसाखळीत गोव्याने सातपैकी चार सामन्यांत विजय नोंदविले होते, तर तीन सामन्यांत पराभव पत्करले होते. या स्पर्धेच्या इतिहासात गोव्याने २०१३-१४ मध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदविली होती. तेव्हा गोव्याने दक्षिण विभागात पाचही सामने जिंकून सुपर लीग फेरी गाठली होती. या फेरीत चारपैकी तीन सामने जिंकले, तर एक सामना गमावल्यामुळे त्यांना अंतिम फेरी थोडक्यात हुकली होती.
स्पर्धेतील कामगिरी दृष्टिक्षेपात
डावातील सर्वोच्च धावसंख्या : ६ बाद २३७ : विरुद्ध नागालँड, हैदराबाद येथे ५ डिसेंबर २०२४
डावातील नीचांकी धावसंख्या : सर्वबाद ८२ (१५.४ षटकांत) : विरुद्ध बडोदा, बडोदा येथे ६ जानेवारी २०१६
वैयक्तिक सर्वोच्च धावा : अमित वर्मा नाबाद १०९ : विरुद्ध मध्य प्रदेश, इंदूर येथे २७ फेब्रुवारी २०१९
डावात सर्वोत्तम गोलंदाजी : शदाब जकाती ४-०-१७-५ ः विरुद्ध दिल्ली, बडोदा येथे ९ जानेवारी २०१६
एकूण सर्वाधिक धावा : डावखुरा फलंदाज सगुण कामत याच्या ५८ सामन्यांत १४३८ धावा
एकूण सर्वाधिक विकेट्स : डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ याचे ८० सामन्यांत ६३ बळी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.