पणजी: शतकवीर अभिनव तेजराणा, शतकास दहा धावा कमी पडलेला शिवेंद्र भुजबळ आणि पाच विकेट टिपलेला हॅटट्रिकवीर मध्यमगती गोलंदाज वासुकी कौशिक गोव्याच्या परदेश दौऱ्यातील संस्मरणीय विजयाचे शिल्पकार ठरले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा भरणा असलेल्या ओमानवर त्यांनी एकदिवसीय (सराव) क्रिकेट सामन्यात सहा विकेट्स आणि २५ चेंडू राखून सहज मात केली.
गोव्याने या विजयासह ओमान दौऱ्यातील पहिला विजय नोंदविलाच, शिवाय तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या लढतीत गोव्याचे विजयाचे प्रयत्न हुकले होते व त्यांना २५ धावांनी हार पत्करावी लागली होती. अखेरचा सामना सोमवारी खेळला जाईल. आगामी रणजी करंडक स्पर्धेपूर्वी मोसमपूर्व तयारी करणाऱ्या गोव्यासाठी आत्मविश्वास उंचावण्याच्या दृष्टीने हा विजय महत्त्वाचा ठरला. आगामी एसीसी प्रीमियर कप आणि विश्वकरंडक लीग २ तयारीच्या दृष्टीने ओमानचा संघ गोव्याविरुद्ध मालिका खेळत आहे.
ओमान क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत कौशिक (५-४४) याने ओमानचा डाव भक्कम सुरवातीनंतर २८३ धावांत गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला. नंतर अभिनव (१४४ धावा, १११ चेंडू, १२ चौकार, ७ षटकार) यांनी आक्रमक फलंदाजीसह यष्टिरक्षक-फलंदाज शिवेंद्र भुजबळ (नाबाद ९० धावा, १२९ चेंडू, ३ चौकार, १ षटकार) यांनी चौथ्या विकेटसाठी २०७ धावांची भागीदारी करून गोव्याला मालिकेत बरोबरी साधून दिली. दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने ४५.५ षटकांत ४ बाद २८४ धावा करून लढाऊ बाणा प्रदर्शित केला.
ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर हसनैन उल वहाब (७९ धावा) व जीत शाह (७० धावा) यांनी त्यांना २३.४ षटकांत १२३ धावांची भक्कम सलामी दिली. ऑफस्पिन गोलंदाजीत छाप पाडलेल्या अभिनव तेजराणा याने वहाब याला पायचीत बाद करुन जम बसलेली जोडी फोडली. ४८ धावांनंतर कौशिक याने जीत याला विकास सिंग याच्याकरवी झेलबाद केल्यानंतर गोव्याने ओमानला ठरावीक अंतराने धक्के दिले. यजमान संघाच्या हम्माद मिर्झा (५१) याने अर्धशतक केले, पण इतर फलंदाज कौशिकच्या गोलंदाजीसमोर खुलून फलंदाजी करू शकले नाहीत.
कौशिकने साधली हॅटट्रिक
कौशिक याने ४९व्या षटकात दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर अनुक्रमे संजू सजीव (झेल - स्नेहल कवठणकर), मुझाहीर रझा (झेल - शिवेंद्र भुजबळ) व नदीम खान (त्रिफळाचीत) यांना बाद करून हॅटट्रिकचा मान पटकावला. ओमानच्या अवघ्या पाच धावांत अखेरच्या पाच विकेट्स गमावल्या.
२ बाद ० वरून जबरदस्त मुसंडी
गोव्याच्या डावाची सुरवात सनसनाटी ठरली. जय ओडेद्रा याने पहिल्याच षटकात दुसऱ्या व चौथ्या चेंडूवर अनुक्रमे कर्णधार स्नेहल कवठणकर व मंथन खुटकर यांना बाद केल्यामुळे गोव्याची २ बाद ० धावा अशी नाजूक स्थिती झाली. नंतर पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सुयश प्रभुदेसाई बाद झाल्यामुळे गोव्याची ३ बाद ३० अशी घसरगुंडी उडाली. त्यानंतर अभिनव व शिवेंद्र यांनी दृढनिश्चयाने फलंदाजी करत द्विशतकी भागीदारीसह गोव्याचा विजय साकारला.
संक्षिप्त धावफलक
ओमान: ४९.५ षटकांत सर्वबाद २८३ (हसनैन उल वहाब ७९, जीत शाह ७०, आर्यन बिश्त २०, मुजिबूर अली २४, हम्माद मिर्झा ५१, विनायक शुक्ला १५, संजू सजीव १५, वासुकी कौशिक १०-०-४४-५, हेरंब परब ६.५-०-४५-१, चिगुरुपती व्यंकट ७-०-५३-०, दर्शन मिसाळ ४-०-१५-०, दीपराज गावकर ५-०-३५-०, विकास सिंग १०-०-५१-१, अभिनव तेजराणा ७-०-३९-२) पराभूत वि. गोवा ः ४५.५ षटकांत ४ बाद २८४ (स्नेहल कवठणकर ०, अभिनव तेजराणा १४४, मंथन खुटकर ०, सुयश प्रभुदेसाई १४, शिवेंद्र भुजबळ नाबाद ९०, दर्शन मिसाळ नाबाद २०, जय ओडेद्रा १०-१-५७-२, मुहम्मद इम्रान ६-०-४३-१, नदीम खान १०-०-५५-१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.