पणजी : पितृपक्ष संपल्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी सोमवारी २२ सप्टेंबर रोजी गोवा क्रिकेट असोसिएशनची (जीसीए) नवनिर्वाचित व्यवस्थापकीय समिती पदभार स्वीकारणार आहे, त्यानंतर चार नव्या चेहऱ्यांचा समावेश असलेली समिती गोव्यातील क्रिकेटच्या कार्याला वाहून घेईल असा मनोदय नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी पदभार करण्यास बहुसंख्या नवनिर्वाचित सदस्य इच्छुक आहेत, त्यानुसार मागील समिती आपल्याकडील सूत्रे नव्या समितीकडे बहाल करतील. मंगळवारी झालेल्या व्यवस्थापकीय समिती निवडणुकीत माजी अध्यक्ष चेतन देसाई-विनोद (बाळू) फडके गटाने बीसीसीआय संयुक्त सचिव रोहन गावस देसाई यांचे समर्थन लाभलेल्या जीसीए परिवर्तन गटाला सर्व सहाही जागांवर मात दिली.
नव्या पदाधिकाऱ्यांकडून आता राज्यातील १०७ क्लबांनी क्रिकेट विकासासाठी अपेक्षा बाळगली आहे, असे एका क्लबच्या पदाधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. ‘‘मी स्वतः माजी रणजीपटू असल्याने मला राज्य क्रिकेटमधील समस्या अधिक चांगल्याप्रकारे समजून घेता येईल, आता फक्त क्रिकेट हेच आमचे ध्येय असेल, आम्ही सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत,’’ असे नवनिर्वाचित अध्यक्ष महेश देसाई यांनी मंगळवारी विजय मिळविल्यानंतर सांगितले होते.
चार नवे चेहरे
२०२५ ते २०२८ या कालावधीसाठी निवडून आलेल्या व्यवस्थापकीय समितीत चार नवे चेहरे निवडून आले आहेत. यामध्ये अध्यक्ष महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये, संयुक्त सचिव अनंत नाईक, व सदस्य महेश बेहकी यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये महेश देसाई अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीन मतांनी, तर अनंत नाईक फक्त एका मताने पराभूत झाले होते.
यावेळी सर्वाधिक ७० मते अनंत यांना मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी ते जीसीए समितीकडे निमंत्रित सदस्य या नात्याने संबंधित होते. मावळत्या समितीत तुळशीदास शेट्ये स्वीकृत सदस्य होते, पण त्यांना बैठकीत मताधिकार नव्हते. अनंत व तुळशीदास प्रथमच मतदान प्रक्रियेतील जीसीएच्या कार्यकारिणीवर निवडून आले आहेत.
सूरज लोटलीकर यांचा विक्रम अबाधित
जीसीए निवडणुकीत सर्वाधिक मते मिळविण्याचा विक्रम माजी अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी केला होता. २०१९ मध्ये ते बिनविरोध ठरले होते, त्यापूर्वीच्या टर्मसाठी निवडून येताना त्यांनी व्यवस्थापकीय समिती निवडणुकीत १०७ पैकी ९६ मते मिळवून राज्यातील क्रिकेटमधील ‘क्लबमान्यता’ सिद्ध केली होती.
‘‘आम्ही आगामी कालखंडात निश्चितच ज्युनियर क्रिकेट विकास व प्रगतीवर, तसेच राज्यातील क्रिकेट साधनसुविधांवर भर देणार आहोत.’ - अनंत नाईक, नवनिर्वाचित संयुक्त सचिव
दोघांचे शानदार पुनरागमन
जीसीए व्यवस्थापकीय समितीत दोघांना पुनरागमन केले आहे. यामध्ये उपाध्यक्षपदी निवडून आलेले परेश फडते व खजिनदारपदी निवडून आलेले सय्यद अब्दुल माजिद यांचा समावेश आहे. २०१९ मध्ये परेश खजिनदार, तर माजिद संयुक्त सचिवपदी निवडून आले होते. या दोघांनी तीन वर्षांपूर्वी निवडणूक लढविली नव्हती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.