FC Goa Jay Gupta
पणजी: एफसी गोवाचा बचावपटू जय गुप्ता याने गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत लेफ्ट-बॅक जागी खेळताना उल्लेखनीय खेळ केला, आता तो सेंटर-बॅक या नव्या जागी स्थिरावत आहे.
संघ रचनेत जागा बदलण्याविषयी जय याने ‘एफसी गोवा मीडिया डे’ कार्यक्रमात सांगितले, की ‘‘संघाच्या बचावफळीतील जागा बदलास मी तयार असून आता नव्या जागेवर स्थिरावण्यास प्राधान्य दिले आहे. नव्या जबाबदारीत काही वेळ लागू शकतो, पण मी आशावादी आहे.’’ एफसी गोवा संघासमवेत आणि प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली जय याचा यंदा दुसरा आयएसएल (ISL) मोसम आहे. गतमोसमात त्याने आक्रमक शैलीही प्रदर्शित करताना आयएसएल स्पर्धेत महत्त्वपूर्ण गोल नोंदविले होते.
गतमोसमातील शानदार कामगिरीची दखल घेत यावर्षी जूनमध्ये एफसी गोवाने जय गुप्ताचा करार आणखी चार वर्षांसाठी वाढविला. युवा कारकिर्दीत पोर्तुगाल व स्पेनमध्ये लक्ष वेधलेला जय २०२३-२४ मोसमापूर्वी एफसी गोवा संघात दाखल झाला होता. महाराष्ट्रातील पुण्यात जन्मलेल्या २२ वर्षीय बचावपटूने मागील मोसमात एफसी गोवाचे ३१ सामन्यांत प्रतिनिधित्व केले. अष्टपैलू कामगिरी बजावताना त्याने आयएसएल स्पर्धेत दोन गोल व तीन असिस्टचीही नोंद केली.
आयएसएलमधील शानदार कामगिरीच्या बळावर जय याने वर्षभरातच माजी प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघातही स्थान मिळविले. यावर्षी जूनमध्ये कुवेतविरुद्ध फिफा विश्वकरंडक पात्रता फेरीत कोलकता येथे त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आता नवे प्रशिक्षक मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघातून तो हैदराबाद येथे झालेल्या इंटरकाँटिनेंटल स्पर्धेतही भारतीय संघातून खेळला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.