पणजी: महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला २०२४-२५ मोसमात दुखापतीने सतावले, परिणामा गोव्यातर्फे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलग तिसरा मोसम खेळताना डावखुऱ्या क्रिकेटपटूस लक्षवेधी कामगिरी नोंदविता आली नाही, तरीही मुंबईच्या या ‘पाहुण्या’स संघात राखण्याबाबत गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) अनुकूल आहे.
‘जीसीए’च्या उच्चस्तरीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जीसीए मुंबईचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याला करारबद्ध करणार हे निश्चित आहे. या कसोटीपटूच्या ना हरकत दाखल्याची पूर्तता झालेली आहे.
अर्जुन तेंडुलकरबाबत व्यवस्थापकीय समितीने अजून निर्णय घेतलेला नसला, तरी त्याचा करार ही औपचारिकता आहे. तो गोव्यातर्फे निश्चितच आणखी एक मोसम खेळेल. पाहुण्या क्रिकेटपटूच्या कोट्यातील तिसऱ्या जागेसाठी गोलंदाजीत जीसीए पर्याय शोधत आहे. गतमोसमातील कर्नाटकचे दोघेही पाहुणे के. व्ही. सिद्धार्थ व रोहन कदम यांना जीसीएने मुक्त करण्याचे ठरविले आहे.
अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज व डावखुरा फलंदाज असून २०२२-२३ पासून गोव्यातर्फे खेळत आहे. १३-१६ डिसेंबर २०२२ या कालावधीत पर्वरी येथे राजस्थानविरुद्ध रणजी पदार्पणात शतक (१२० धावा) झळकाविल्यानंतर अर्जुन प्रकाशझोतात आला होता. त्या मोसमात त्याने १२ गडीही बाद केले होते, परंतु नंतरच्या दोन मोसमात अर्जुनला विशेष छाप पाडता आली नाही. गतमोसमात त्याला दुखापतीने चांगलेच सतावले.
रणजी प्लेट करंडकात तो सहापैकी चार सामने खेळला. विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) स्पर्धेत गोव्यातर्फे तो अ गटात सातपैकी तीनच सामने खेळला, तर सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत सहापैकी दोन सामन्यांना मुकला. अर्जुनला २०२५ मधील आयपीएलसाठी मुंबई इंडियन्सने अखेरच्या फेरीत करारबद्ध केले, परंतु तो यावेळच्या स्पर्धेत अजून एकही सामना खेळलेला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.