पणजी: अगोदरच्या लढतीत पराभूत व्हावे लागले तरी अल नस्सर क्लबला झुंजविलेला एफसी गोवा संघ पुन्हा एकदा सौदी अरेबियन प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणार आहे. एएफसी चँपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेच्या ड गटातील परतीचा सामना बुधवारी (ता.५) रियाध येथे खेळला जाईल.
सध्या ड गटात तिन्ही सामने जिंकून ख्रिस्तियानो रोनाल्डोचा अल नस्सर क्लब नऊ गुणांसह अव्वल स्थानी आहे. एफसी गोवास त्यांनी पुन्हा पराभूत केल्यास त्यांची बाद फेरी जवळपास निश्चित होईल. एफसी गोवा संघाला गटातील तिन्ही सामन्यांत पराभूत व्हावे लागले आहे. मात्र, मागील लढतीत त्यांनी फातोर्डा येथे कौतुकास्पद खेळ केला होता.
ब्रायसन फर्नांडिस याच्या गोलमुळे त्यांना अल नस्सरविरुद्ध पराभवात पिछाडी १-२ अशी कमी करता आली होती. रियाधला रवाना होण्यापूर्वी एफसी गोवाने एआयएफएफ सुपर कप स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखताना त्यांनी जमशेदपूर एफसीवर २-० असा, तर इंटर काशी एफसीवर ३-० असा एकतर्फी विजय प्राप्त केला.
अखेरच्या साखळी लढतीत नवोदितांना संधी देण्यात आली. त्या सामन्यात नॉर्थईस्ट युनायटेडने २-१ असा विजय मिळविला, तरीही एफसी गोवाचेच वर्चस्व राहिले होते. या कामगिरीमुळे रियाध येथे बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध एफसी गोवा संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरणार हे निश्चित आहे.
अल नस्सर क्लब बुधवारी विजयासाठी प्रयत्नशील असेल. सौदी अरेबियातील किंग्स कप स्पर्धेतील आव्हान आटोपल्यामुळे त्यांचे सारे लक्ष आता एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेवर असेल. किंग्स कप स्पर्धेत अल नस्सर क्लबला भरपाई वेळेतील पेनल्टी गोलमुळे अल फाया क्लबविरुद्ध निसटता पराभव पत्करावा लागला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.