पणजी: यंदाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पाचव्या फेरीअंती एलिट विभागात सर्वाधिक धावा करणारा गोव्याचा डावखुरा फलंदाज अभिनव तेजराणा याने आयपीएल फ्रँचायजींना आकर्षित केले असून आगामी लिलावापूर्वी त्याने निवड चाचणी दिल्याची माहिती आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत २४ वर्षीय अभिनव याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ६५१ धावा केल्या आहेत. पाच सामन्यांतील आठ डावात त्याने ९३च्या सरासरीने या धावा केल्या. पर्वरी येथे चंडीगडविरुद्ध रणजी स्पर्धेतील पहिल्याच डावात द्विशतक (२०५) केले. रणजी पदार्पणात द्विशतक नोंदविणारा तो गोव्याचा पहिला फलंदाज ठरला आहे.
गोव्याकडून पाहुणा या नात्याने खेळणारा दिल्लीचाच ललित यादव याच्यासमवेत अभिनवने चंडीगडविरुद्ध चौथ्या विकेटसाठी ३०९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर शिमोगा येथे कर्नाटकचा संघ विजयासाठी प्रयत्नशील असताना अभिनव नाबाद ७३ धावा करताना मंथन खुटकर याच्यासमवेत खिंड लढवत सामना अनिर्णित राखला.
पंजाबविरुद्ध न्यू चंडीगड येथे १३१ धावा केल्यानंतर मध्य प्रदेशविरुद्ध पर्वरी येथे दुसऱ्या डावात ६९ धावांची खेळी केला. राजकोट येथे सौराष्ट्राविरुद्ध त्याने ११८ धावांची खेळी करून बहारदार फॉर्म कायम राखला.
प्राप्त माहितीनुसार, रणजी करंडक स्पर्धेत धावांचा रतीब टाकलेल्या अभिनवला काही फ्रँचायजींनी निवड चाचणीस बोलावले असून आयपीएलमधील एका माजी विजेत्या संघासाठीही त्याने गतआठवड्यात निवड चाचणी दिलेली आहे. २६ नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात होत आहे. या स्पर्धेतील अभिनवच्या फलंदाजीकडे आयपीएल फ्रँचायजी लक्ष ठेवून असतील. कदाचित तो आयपीएल स्पर्धेसाठी एखाद्या फ्रँचायजीकडून निवडला जाऊ शकतो, असे सूत्राने सांगितले.
मूळ दिल्लीचा, पण आता गोव्यात ‘स्थानिक’
अभिनव तेजराणा हा मूळ दिल्लीचा. १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत त्याने दिल्लीचे प्रतिनिधित्व केले, पण नंतर तो तेथे दुर्लक्षित राहिला. त्यामुळे त्याने स्पर्धात्मक क्रिकेट सोडण्याचा विचारही केला होता, पण वडील अनिल कुमार यांनी त्याला धीर दिला. अनिल कुमार हे दिल्लीतील सरकारी कर्मचारी. त्यांची गोव्यात मालमत्ता आहे.
साधारणतः साडेतीन वर्षांपूर्वी या मालमत्तेतील घराची निगराणी करण्याचा उद्देशाने अभिनव आपल्या आईसह गोव्यात दाखल झाला. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या स्थानिक स्पर्धांत खेळू लागला.
विपुल फडके जीसीएचे अध्यक्ष असताना त्यांनी अभिनवची गुणवत्ता हेरली. गोव्यात वास्तव्य असल्याने दोन मोसमांपूर्वी त्याची गोव्याच्या २३ वर्षांखालील क्रिकेट संघात स्थानिक या नात्याने निवड झाली. २०२३-२४ मधील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेतील सहा सामन्यांत अभिनवने १२ डावांत ४७.५८च्या सरासरीने ५७१ धावा करताना दोन शतकेही ठोकली, पण २०२४-२५ मधील रणजी करंडक प्लेट विभागीय स्पर्धेसाठी त्याला संधी मिळाली नाही. अभिनवला यंदा संधी मिळाली, त्याने त्याचा पूरेपूर लाभ उठवत संघातील स्थान भक्कम केले.
जीसीएच्या नव्या कार्यकारिणीचे पाठबळ
रणजी मोसम सुरू होण्यापूर्वी महेश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जीसीए व्यवस्थापकीय समितीने सूत्रे हाती घेतली. संघटनेने निव्वळ गुणवत्तेला प्राधान्यक्रम देताना प्रतिभावान अभिनवला पाठबळ दिले. संघटनेचा हा निर्णय सध्यातरी गोमंतकीय क्रिकेटसाठी फलदायी ठरल्याचे अभिनवच्या फलंदाजीतील सातत्यपूर्ण कामगिरीने दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.