होय .. निसर्गरम्य परिसराने नटलेल्या सुंदर अशा माझ्या सासरच्या गावचे नाव ‘जांबावली’, जे सांगे तालुक्यात वसले आहे. माझ्या शांत, सुदंर अशा जांबावली गावचा लौकीक गोमंतकांतच नव्हे तर भारतात आणि साता समुद्रापार ही पसरला आहे, तो केवळ आणि केवळ श्री दामोदर देवांच्या विराजमान असण्याने.
श्री दामोदर देव मठग्राम नगरीतून(मडगाव) जाबांवलीला कसे पोहोचले या बद्दल एक आख्यायिका आजही जनमानसात प्रसिद्ध आहे. तात्पर्य अन्याय आणि अत्याचार यांनी भरलेल्या त्या पोर्तुगीज राजवटीच्या काळात हिंदू धार्मियांना ख्रिश्चन धर्मांतरित करण्याचे सत्र पाखल्यांनी चालवले होते. तेव्हा आपल्या लाडक्या आराध्य दैवतांला सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या हेतूने मडगाव शहरांपासून लांब जांबावली गांवात आणून त्यांची विधीवत स्थापना केली.
अशा तऱ्हेने श्री दामोदर जांबावली गावात स्थित झाला आणि हा जांबावली गाव या ईश्वर रूपांमुळे नांव लौकीकास आला. या मंदिर परिसरात अनेक देवी देवतांची छोटी छोटी मंदिरे आहेत. श्री रामनाथ तसेच मुळवीर देव या शिवाय श्री चामुंडेश्वरी, महाकाली आणि श्री महेश एकाच मंदिरात विराजमान आहेत आणि निराकार देवांचेही मंदिर आहे.
जांबावली गावात श्री दामोदर देवांच्या चरणी वर्षाच्या बाराही महिने सण उत्सवांची पर्वणी असते. त्यात प्रामुख्याने श्री दामोदर देवांचा फाल्गुन मासातील शिमगोत्सव आणि त्या अनुषंगाने येणारा दामबाबांचा गुलालोत्सव भक्तासाठी रंगाचा आनंदोत्सव. या गावातून वाहणारी कुशावती नदी म्हणजे गावची मायच जणू.या गांवात खिचन आणि हिंदू बांधव अगदी पुर्वापारपासुन गुण्यागोविंदाने आणि आनंदाने नांदत आहेत.
गांवच्या सिमेनजदीक बाणशी येथे असलेली मनोहारी चर्च हेही गावकऱ्यांचे श्रध्दास्थान आहे. या गांवात नारळ,आंबा, फणस,काजू, केळी यासारखी फळ फळावळे भरपूर प्रमाणांत पिकतात.‘पाडादेगेर’ या वाड्यावर स्थित मातीपासून मूर्ती, तसेच वस्तू बनविणारे कारागीर आमच्या गावची शान आहेत. पेडामळ येथे डोंगरांवर वैशाखात भरपूर रानमेवा खायला मिळतो, शिवाय तेथे एक छोटेसे साईबाबा मंदिर हल्लीच निर्माण केलेले आहे.
गावात प्रत्येक सण, उत्सव आजही उत्साहाने साजरा केला जातो.माझ्या गावाने कितीतरी जागतिक कीर्तीचे कलाकार या देशाला दिले आहेत. गावची माणसे कनवाळू, समाधानी, निसर्गावर आणि मुक्या प्राण्यांवर माया करणारी आणि नेहमीच पै-पाहुण्यांचे आदरातिथ्य करणारी आहेत.हल्लीच सौ.रुपा आणि श्री. रूपेश जांबावलीकर या दाम्पत्याने याच गावात अगदी निसर्गाचा समतोल सांभाळत , सुंदर अशा निसर्गाच्या सान्निध्यात ‘एस.व्ही.आर.फार्मस्’ नामक हॉलीडे फार्म विकसित केले आहे.
सुट्टीच्या दिवसांत, निसर्गाच्या सानिध्यात आनंदात वेळ घालवायला हे एक रम्य ठिकाण आहे.पर्यटक सुट्टीच्या दिवसांत येथे भेट देतात आणि श्री दामोदरांचा आशीर्वाद व भरपूर आनंद, समाधान घेऊन आपल्या गावी परततात.असा हा माझा निसर्गसंपन्न जांबावली गाव...
शर्मिला विनायक प्रभू
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.